मराठी सिनेविश्वात अभिमानाचा क्षण, दशावतारची घोडदौड आता ऑस्करच्या शर्यतीत

03 Jan 2026 16:43:52

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अत्यंत गौरवास्पद आणि ऐतिहासिक बातमी ठरत आहे. प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळवणारा ‘दशावतार’ हा चित्रपट थेट ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेत दाखल झाला आहे. मराठी सिनेइतिहासात पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला ‘मेन ओपन फिल्म कॅटेगरी’ मध्ये स्थान मिळाल्याने चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या दशावतारला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. यशानंतर हा चित्रपट मल्याळम भाषेतही डब करण्यात आला. आता जागतिक व्यासपीठावर पोहोचत, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाची दखल घेतली जात असून मराठी सिनेमासाठी हा क्षण निश्चितच अभिमानाचा मानला जात आहे.

त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांसह प्रेक्षकांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुन सिनेमाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवतानाच कलात्मक आणि आशयाच्या पातळीवरही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मराठी प्रेक्षकांसह अमराठी रसिकांनीही या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी दशावतार कलाकार बाबुली मेस्त्री यांची भूमिका साकारली असून, त्यांच्या संयत आणि प्रभावी अभिनयाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा मिळाली आहे. याशिवाय महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे, रवी काळे, विजय केंकरे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर यांच्यासह कोकणातील स्थानिक कलाकारांनीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत कथेला अधिक वास्तववादी आणि सशक्त रूप दिलं आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकॅडमी अवॉर्ड्सच्या मुख्य स्पर्धेसाठी जगभरातून १५० हून अधिक चित्रपटांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये दशावतार हा एकमेव मराठी चित्रपट आहे. विशेष बाब म्हणजे अकॅडमीच्या स्क्रीनिंग रूममध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी सिनेमा ठरणार आहे.







View this post on Instagram
















A post shared by Subodh Khanolkar (@subodhkhanolkar)


या निवडीची अधिकृत पुष्टी म्हणून सुबोध यांनी निर्मात्यांना आलेल्या ई-मेलचा स्क्रिनशॉटही शेअर केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं की, अनेक वर्षांची मेहनत, प्रामाणिक प्रयत्न आणि मोठी स्वप्नं पाहण्याची हिंमत आज मान्यता मिळवत आहे. दशावतारचं हे यश केवळ एका चित्रपटापुरतं मर्यादित नसून, मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर सक्षमपणे उभा राहू शकतो, याचं ठोस उदाहरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.


Powered By Sangraha 9.0