मुंबई : (Arvind Patkar passed away ) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असतानाच, दि. २९ जानेवारी रोजी मनोविकास प्रकाशनचे संस्थापक, ज्येष्ठ प्रकाशक अरविंद पाटकर यांचे पहाटे ३ वाजता ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी २.३० वाजता पुण्याच्या नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानाभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनामुळे साहित्यविश्वावर शोककळा पसरली असून, समाजमाध्यमांवर अनेक मान्यवरांनी दिलगिरी व्यक्त केली.
मागच्या तीन दशकांहून अधिक काळ मनोविकास प्रकाशनाच्या माध्यमातून सकस आणि दर्जेदार साहित्य वाचकांच्या हाती येत आहे. मराठी प्रकाश विश्वात स्व:ताची वेगळी ओळख निर्माण करणारे या संस्थेचे संस्थापक अरविंद पाटकर हे मूळचे मुंबईचे. गिरणी कामगार चळवळीत ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते. प्रगतीशील विचारांची बांधिलकी जपत त्यांनी प्रकाशन व्यवसायाला नवीन आयाम मिळवून दिला. काळाच्या ओघात वाचकांकडून वाचकांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे त्यांचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढला. या अनुभवाच्या आधारे त्यांनी मुंबईतील आकाशवाणी आधार निवासच्या परिसरात स्वतःचे पुस्तकांचे दुकान सुरू केले जे लवकरच 'मनोविकास पुस्तक केंद्र' म्हणून प्रसिद्ध झाले. हे पुस्तक केंद्र आज मुंबईतील निवडक वाचकांचे एक योग्य ठिकाण बनले आहे.
पुस्तक चळवळ पोरकी झाली! : अॅड आशिष शेलार, सांस्कृतिक कार्यमंत्री
अरविंद पाटकर यांच्या मृत्यूवर प्रतिक्रीया देताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार प्रतिक्रीया देताना म्हणाले की " मनोविकास प्रकाशनाचे संस्थापक अरविंद पाटकर यांच्या निधनाचे वृत्त समजले आणि मन अधिकच सुन्न झाले. गेली ३५ वर्षांहून अधिक काळ दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण मराठी साहित्याची निर्मिती करणारे एक अग्रगण्य प्रकाशन म्हणून मनोविकास प्रकाशन आज नावारुपाला आले आहे. अरविंद पाटकर यांच्या नेतृत्वाखाली, हे प्रकाशन चरित्र, आत्मचरित्र, विज्ञान, समाज-राजकारण आणि बालसाहित्यासाठी ओळखले जाते. उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी या प्रकाशनाला नावाजलेले पुरस्कारही मिळाले आहेत.पाटकर हे कार्यकर्ते असल्याने मराठी प्रकाशक परिषदेमध्ये अध्यक्षासह विविध पदावर ते सक्रिय सहभागी होते. मराठी पुस्तके वाचकापर्यंत पोहचली पाहिजेत यासाठी ते सातत्याने प्रयत्न करीत होते. मी पुणे येथे जाऊन तसेच मंत्रालयात ही बैठक घेऊन त्यांच्यासह प्रकाशकांचे प्रश्न समजून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले होते त्यातूनच अरविंद पाटकर यांचा स्नेह जुळला होता. आज अचानक त्यांच्या निधनाचे वृत्त आले आणि मन सुन्न झाले. त्यांच्या जाण्याने पुस्तक चळवळ पोरकी झाली आहे."