नियतीच्या मनात काय असते, हे आपल्याला कधीच समजू शकत नाही. आपल्या झंझावाती दौऱ्यांनी सतत कार्यरत असण्याच्या वृत्तीने प्रसिद्ध असलेले अजितदादा काळाच्या पडद्याआड निघून गेले.
महाराष्ट्राचे राजकारण इतके विचित्र वळणांनी भरले आहे की, कोण कुणाबरोबर केव्हा कसे उभे राहील, हे सांगता येत नाही. अजितदादाही अशाच प्रवासाचे प्रवासी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घेतली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. वक्तशीरपणा हा अजितदादांचा प्रख्यात गुण. त्यासाठी ते प्रसिद्धही होते. सकाळी 6.30 वाजता ते त्यांच्या भेटीची पहिली वेळ देत. मात्र, त्या भेटीसाठी ते स्वतः 6.25ला हजर असत. वेळ देण्याच्या बाबतीत त्यांनी कधीही गरीब-थोर असा भेदभाव केला नाही. प्रशासनाची उत्तम जाण, लोकसभा, विधानसभेचा गाठीशी असलेला अनुभव, त्याचा उपयोग त्यांनी स्वत:ची राजकीय कारकीर्द विस्तारण्यासाठी पुरेपूर केला. अजितदादांवर प्रसंगी विविध आरोपही झाले. मात्र, त्यापलीकडे जाऊन ‘कामाचा माणूस’ अशी त्यांनी स्वत:ची प्रतिमाही निर्माण केली.
अजितदादांना वारसाही लाभला आणि आडनांवही! त्यांच्या एकूणच राजकारणाला एका घरंदाज राजकारण्याचा बाज होता. महाराष्ट्रात काका-पुतण्यांचे राजकीय अस्तित्व आणि बंड तसे प्रसिद्ध. या सगळ्या पुतण्यांमध्ये अजितदादा अत्यंत वेगळे ठरले. त्याचे कारण त्यांच्या कामाच्या उरकात होते. कमालीचा स्पष्टवक्तेपणा, ‘हो’ला ‘हो’, ‘नाही’ला ‘नाही’ म्हणणे, हा अजितदादांचा स्थायीभाव होता. महायुती सरकारमध्ये आल्यानंतर युतीचा धर्मही त्यांनी पुरेपूर पाळला. आपल्याला राजकीयदृष्ट्या जे मिळाले, त्यावर ते आनंदी होते. अशा प्रकारे आघाड्या आणि युत्यांची सरकारं स्थापन होतात, त्यावेळेस राजकीय हेवेदावे व त्यातून निर्माण होणाऱ्या सहयोगी पक्षांविषयीच्या टीका-टिप्पण्या या अपरिहार्य असतात. अनेकदा या टीका-टिप्पण्यांना ओंगळवाणे स्वरूपही येते. सर्वसामान्य मतदारांचा लोकशाहीवरून विश्वास उडावा, अशी स्थितीदेखील या टीका-टिप्पण्यांमुळे उद्भवते. आगळीक केल्यानंतर युती-आघाड्यांमध्ये आपल्यासोबत आलेल्या सर्व सहकाऱ्यांना हवे तेच मिळते, असेही नसते. मात्र, अशा परिस्थितीत स्वत:चे स्वत:च्या पक्षाचे व त्या युती-आघाड्यांचे संतुलन कायम राखणे, ही मोठी जबाबदारी असते. अजितदादांनी ती चांगल्या प्रकारे पार पाडली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांनी सरकारातील असे प्रसंग कौशल्याने हाताळले व वाक्संघर्ष टाळले. अंतर्गत तक्रारी नसतीलच, असे मुळीच नाही; मात्र त्या त्यांनी चव्हाट्यावर येऊन मांडल्या नाहीत, हे ‘मित्रपक्षाचा नेता’ म्हणून त्यांचे वेगळेपण होते. शरद पवारांचा कामाचा उरक, किमान आमदारांचा पक्ष चालविण्याची त्यांची हातोटी, त्यासाठी लागणारा वकूब व दरारा अजितदादांना शरद पवारांकडून वारशात मिळाला होता. मात्र, स्वतंत्र मत मांडून फडणवीसांच्या सोबत उभं राहण्याची वेळ आली, त्यावेळी अजितदादांनी आपला बाणा दाखवूनही दिला. एका पक्षाचे बहुमत नसल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण हे सदैव चौकोनी, पंचकोनी व षट्कोनी राहिले आहे. अशी परिस्थिती राजकारणी तर अनेक निर्माण करते. मात्र, इंग्रजीत ज्याला ‘स्टेट्समन’ म्हणतात, ते निर्माण होऊ देत नाही. अशा प्रकारचा अनुभवी, दिलदार व शब्दाचा पक्का नेता पुन्हा होणे अवघड आहे.
महाराष्ट्राने आजवर आपले असे अनेक ‘स्टेट्समन’ अकाली गमावले आहेत. त्यात अजित पवारांचे नाव जोडले जावे, याहून मोठा दैवदुर्विलास कोणता! त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात एक पोकळी तर निर्माण झालीच आहे; परंतु त्यांनी उभ्या केलेल्या पक्षासमोरही नेतृत्वाचे मोठे संकट उभे राहिले आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर अजित पवार यांच्या कुटुंबीयांना या संकटसमयी परिस्थितीशी लढण्याचे बळ देवो, ही दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे विनम्र श्रद्धांजली!