‘केळद’चे भाग्यविधाते

29 Jan 2026 11:12:34
Prakash Bhavalkar
 
गावाचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवापाड मेहनतीच्या जीवावर सात गावे स्वयंपूर्ण करणार्‍या केळद ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तुकाराम भावळेकर यांच्याविषयी...
 
प्रकाशरावांचा जन्म वेल्हे तालुक्यातील निगडे खुर्द या गावात झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतचे शिक्षण तीन किलोमीटर असणार्‍या केळद या गावी झाले. गावात वाहतुकीची साधने नसल्याने, शाळेसाठीची पायपीट नित्याचीच. पुढे त्यांना घरच्या नाजूक परिस्थितीमुळे, वेल्हे येथील ‘तोरणा-राजगड परिसर समाजोन्नती न्यास’ येथे शिक्षणासाठी जावे लागले. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर, प्रकाशरावांनी पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. जेधे महाविद्यालयात शिकताना आर्थिक गरजा भागवण्यासाठी त्यांनी, मार्केटयार्ड परिसरातील फूलांच्या मंडईमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पुढे ‘बी.कॉम’ होईपर्यंत त्यांनी हे काम सुरुच ठेवले.
 
स्वमेहनतीने गावातील एक युवक शिक्षण घेतो, यामुळे तो निश्चितच गावाला काहीतरी विकासाचा मार्ग दाखवू शकेल असे गावकर्‍यांना वाटले. परिणामी त्यांनी २०१७ मध्ये गावकर्‍यांनी, त्यांना बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून दिले. परिणामी प्रकाशराव यांना गावाकडे परतावेच लागले. गावाकडे आल्यानंतर जरी सदस्य असले, तरी कुटुंबाच्या उदरभरणाचा प्रश्न होताच.
याचदरम्यान, माध्यमिक शिक्षण घेतलेल्या ‘तोरणा-राजगड परिसर समाजोन्नती न्यासा’तर्फे, मुलींच्या शिक्षणासाठी मोफत बससेवेचा उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले. पण, बस उपलब्ध झाल्या तरीही, चालकपदासाठी योग्य उमेदवार संस्थेला भेटेना. प्रकाशरावांना हे समजल्याबरोबर त्यांनी चौकशी करताच, निधी तत्त्वावर चालणारे काम असल्यामुळे सहा रुपये पगारावर काम करावे लागेल, अशी माहिती मिळाली. यावर प्रकाशरावांनी किमान यातून ग्रामीण भागात कुटुंबाचा उदरनिर्वाह तरी चालेल, याचा विचार करून ही नोकरी पत्करली. उरलेल्या वेळात गावाची जबाबदारी पार पाडण्याचा त्यांचा विचार होता.
 
त्यानंतर त्यांनी जीवापाड मेहनत करायला सुरुवात केली. केळद या ग्रामपंचायतीमध्ये आजूबाजूच्या सात गावांचा समावेश होतो. त्यामुळे ते सदस्य एका गावचे असले, तरीही सात गावांचे कार्य त्यांना करायचे होते. कत्यांनी ‘घरकुल’ योजनेपासूनच कार्याला केली. साधारण ४५ जणांचे अर्ज भरून, त्यातील सुमारे ३५ कुटुंबाना घरकुल मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यानंतर सरकारच्या प्रत्येक योजना, गावात राबवण्याचा त्यांनी सपाटाच लावला. ‘उज्ज्वला गॅस योजने’साठी तर त्यांनी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण करुन, अनेक घरांना गॅसही उपलब्ध करून दिला. या कार्यासाठी गावातील महिला आजही प्रकाशराव यांचे आभार मानतात.
 
तसेच कर्नवडी गावातही पाण्याच्या समस्येने डोके वर काढले होते. ते गाव मढे घाटाच्या पायथ्याशी दोन डोंगरांच्या मध्यभागी असल्याने, ग्रामपंचायत असलेल्या केळद गावातून तिथे पाच किलोमीटर पाईपलाईनच्या माध्यमातून पाण्याची सोय करण्यात आली. प्रकाशरावांनी सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ च्या माध्यमातून सततच्या पाठपुराव्याच्या आधारे, या गावापासूनच दीड किलोमीटर अंतरावर ग्रामस्थांना विहीरीची सोय करुन दिली. याकामी त्यांना शेकडो वेळा प्रशासनाचे उंबरे झिजवावे लागले. परंतु, गावकर्‍यांच्या विश्वासाखातर त्यांनी हे केलेही. वेल्हे तालुक्यात पाऊस भरपूर असला, तरी उन्हाळ्यात मात्र दुष्काळ् सदृष्यस्थिती असे. यासाठी पुण्यातील काशीबाई नवले महाविद्यालयामार्फत बंधारे-उभारणी केली. पुण्यातीलच ‘ज्ञानप्रबोधिनी’ आणि ‘तोरणा-राजगड परिसर समाजोन्नती न्यासा’च्या अंतर्गत विहिरी बांधल्यामुळे, या गावांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.
 
गावात चांगले रस्ते असावेत, यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करुन, गावात चांगले रस्ते बांधले. निगडे येथील शाळेतील मुलांसाठी एका संस्थेच्या माध्यमातून ‘टॅब’ घेऊन दिले, जेणेकरून ग्रामीण भागातील मुलेही तंत्रज्ञानात अग्रेसर होतील. सात गावातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात मोतीबिंदूचे आणि विविध आरोग्य शिबिरांचे आयोजनही त्यांनी केले. त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे आज केळद ग्रामपंचायत तालुक्यात नावारूपाला आली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत, आज गावकर्‍यांनी त्यांच्याच भावाच्या पत्नीची निवड सरपंचपदी केली आहे. यातून नुकतेच त्यांनी सुमारे १८५ कुटुंबांना ‘घरकुल’ही मंजूर केले. ग्रामीण भागात शिकलेला युवा जर गाव सांभाळत असेल, तर निश्चितच त्या गावाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही, हेच प्रकाशरावांच्या प्रवासातून अधोरेखित होते.
 
ते या कार्याचा श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देतात. प्रकाशराव म्हणतात की, "तोरणा-राजगड वसतिगृहात शिकताना तिथे रा.स्व.संघाची शाखा भरवली जायची. त्या शाखेतूनच आपण समाजाचे काही देणे लागतो, हा विचार पक्का झाला. त्यातूनच प्रेरणा घेत ’स्वयंपूर्ण ग्राम’ करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी प्रयत्न केले.” या समाजकार्यामध्ये प्रकाशरावांच्या पत्नीचीही त्यांना खंबीर साथ लाभते. त्यांच्या धर्मपत्नी घराचा गाडा उत्तम संभाळतात, म्हणूनच प्रकाशराव हे कार्य करू शकतात. दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांच्या कार्याला शुभेच्छा.
 
 
Powered By Sangraha 9.0