भद्रलोकांचे अभद्र विचार!

29 Jan 2026 11:00:14
Mamata Banerjee
 
मोठ्या नेत्यांच्या अपघाती मृत्यूवर शंका घेणे स्वाभाविक असते; माधवराव शिंदे, राजेश पायलट यांसारख्या काँग्रेस नेत्यांच्या अपघाती मृत्यूवरही शंका उपस्थित केली गेली. पण, त्यात काही तथ्य नव्हते. आताही ममता बॅनर्जी यांनी अजितदादांच्या मृत्यूला भाजपला जबाबदार धरण्याचे केलेले सूचक वक्तव्य हे त्यांची सारासार विवेकशक्ती नष्ट झाल्याचे द्योतक आहे.
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाचा धक्का देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनाही बसला आहे. अजित पवार यांचा दिलखुलास आणि बेधडक स्वभाव आणि ‘राखावी बहुतांची अंतरे’ ही वृत्ती, यामुळे त्यांनी असंख्य लोकांना जोडले होते. अजितदादांनी आता राज्यातील राजकारणात आपला प्रभाव निर्माण करण्यास प्रारंभ केला होता. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सारी सूत्रे हाती घेतली, तेव्हाच त्यांच्यातील कसलेल्या नेतृत्वाचे दर्शन जनतेला झाले. त्यांच्या पक्षाला महापालिका निवडणुकांमध्ये फारसे यश मिळाले नसले, तरी आता अजितदादा गेल्यावर निर्माण झालेल्या पोकळीवरून दादांचे राज्याच्या राजकारणातील स्थान लक्षात येते.
 
अजितदादा जिवंत होते, तोपर्यंत त्यांच्या राजकीय मर्यादांवर चर्चा झाली. आता त्यांच्या निधनानंतर अजितदादांच्या पक्षाचे महायुतीतील स्थान किती मोक्याचे होते, त्याची कल्पना येते. या आकस्मिक अपघातामुळे राज्यातील राजकारणावर जे परिणाम होतील, ते होतील; पण या परिस्थितीतही काही भाजपविरोधी नेत्यांना आपला ‘राजकीय कंडू’ शमविण्याचा मोह आवरता आला नाही. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, नेहमीप्रमाणेच आततायी वक्तव्य करण्याचा आपला वसा कायम ठेवला. अजितदादा यांचा मृत्यू केवळ अपघाती नसल्याचे सुचवीत त्यांनी या अपघाताची चौकशी व्हावी इतकीच मागणी केली असे नव्हे; तर ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, असेही सांगितले. कारण ‘सीबीआय’सारख्या केंद्रीय तपास संस्था या भाजपने विकत घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
अजितदादा आता जिवंत नाहीत या वस्तुस्थितीचा स्वीकार करणेच अजून अनेकांना जमलेले नाही, तेथे त्यांच्या डोक्यात हा अपघात आहे की, घातपात ही कल्पनाही येणे शक्य नाही. अजितदादांच्या कोणत्याही नातेवाईकाने किंवा त्यांच्या चाहत्यांनी-कार्यकर्त्यांनी, अशी कसलीही शंका अजून व्यक्त केलेली नाही. पण, सर्वज्ञानी ममतांना हा घातपातच आहे, हेही उमगले. अजितदादा लवकरच शरद पवार यांच्या गटात सहभागी होणार होते, तत्पूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू कसा झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. थोडक्यात, अजितदादांनी आपली साथ सोडू नये म्हणून, भाजपच्या नेत्यांनीच हा घातपात केला असावा, असेच त्यांना सुचवायचे आहे. ममतांच्या राजकारणाची पातळी पूर्वीच घसरली होती पण, अशा वक्तव्यांनी त्यांनी स्वत:ला चिखलात किती बरबटून घेतले आहे, ते दिसते.
 
मोठ्या नेत्यांच्या अपघाती निधनावर अनेकदा शंका उपस्थित केली जाते. यापूर्वीही, हे घडले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ, तडफदार नेते माधवराव शिंदे यांचा मृत्यूही विमान अपघातातच झाला होता. तेव्हाही ते राजीव गांधींना आव्हान देणार असल्याची अफवा पसरविण्यात आली होती. राजीव गांधी यांना आव्हान उभे राहू नये म्हणून त्यांचा काटा काढण्यात आला, अशी कुजबुजही होत होती. पण, यापैकी कशातच तथ्य आढळले नाही. पुढे माधवरावांचे सुपुत्र ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसमध्येच सहभागी झाले आणि अगदी आतापर्यंत राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारीही होते. तीच गोष्ट काँग्रेचे दुसरे नेते राजेश पायलट यांचा मृत्यूही, दौसाजवळ एका मोटार अपघातात झाला. तेसुद्धा राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी होते आणि तेही काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले जात होते. पण, या आरोपातही तथ्य आढळले नाही, त्यांचेही पुत्र सचिन पायलट आजही काँग्रेसमध्येच आहेत.
 
बड्या नेत्याच्या आकस्मिक मृत्यूचे वरकरणी कसलेही कारण दिसत नसल्याने, नियतीच्या या अगम्य खेळामुळे मागे राहणार्‍यांपुढे नवी आव्हाने उभी राहतात. त्यामुळे दोष कोणाला द्यायचा, या भावनेतूनच अशाप्रकारच्या ‘कॉन्स्पिरसी थिअरी’ निर्माण होतात. पण, त्यांना वास्तवाचा तसूभरही आधार नसतो. अजितदादा यांच्या मृत्यूमागे काहीतरी कट आहे, असे बोलून आपण आपले राजकीय प्रतिस्पर्धी भाजपच्या नेत्यांबाबत संशय निर्माण करू शकतो, अशी ममतांची समजूत असावी. पण, शरद पवार यांनीच अजितदादांचे निधन हा शुद्ध अपघात असून, यात राजकारण करु नये असे म्हणत ममतांच्या सर्व सुप्त आकांक्षावरच बोळा फिरवला.
 
तथापि, अजितदादा यांना मारून नक्की कोणत्या पक्षाचा लाभ होणार होता? तसे पाहिले, तर कोणाचाच काही लाभ होणार नव्हता. पण, अजितदादा हे लवकरच शरद पवार यांच्याशी हातमिळवणी करणार असल्यानेच, भाजपने अजितदादांचा काटा काढला, हे ममतांचे गर्भित प्रमेय आहे. पण, त्याचाही वस्तुस्थितीशी सुतराम संबंध नाही. अजितदादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घ्यायची होती आणि राज्यात सत्तेत वाटेकरी व्हायचे होते, म्हणूनच अजितदादा यांनी पक्ष फोडला होता. आता शरद पवार यांचा गट केंद्रात आणि राज्यात विरोधी बाकांवर आहे, तर अजितदादांचा पक्ष सत्तेत आहे. राज्यात अजितदादांच्या पक्षाकडे इतके आमदार नाहीत की, त्यांनी पाठिंबा काढला तर सरकार कोसळेल. भाजपही ही बाब ओळखून आहे. त्यामुळे ते अजितदादांना अडविण्याचा प्रयत्नही करणार नाहीत. या स्थितीत दादा भाजपची साथ का सोडतील आणि पवार यांच्याशी हातमिळवणी का करतील? इतका साधा विचारही ममतांनी केलेला नाही की, ममतांच्या मनात दुसर्‍याच कोणा जवळच्या नेत्याचे नाव होते?
 
अजितदादा असोत की, शरद पवार यांनी आपले दोन्ही गट लवकरच एकत्र येतील, अशा आशयाचे स्पष्ट किंवा सूचक विधान आजपर्यंत केलेले नाही. भाजप किंवा शिंदेसेनेचीही अजितदादांविषयी कोणतीही तक्रार नव्हती. त्यामुळे अजितदादांचा मृत्यू हा शुद्ध अपघात आहे, हे दिसून येते. पण, ममतांसारख्या काही नेत्यांच्या मनातील सत्तेची आसक्ती इतकी तीव्र झाली आहे की, त्यांना सर्वजण आपल्याला सत्तेपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेच भास होतात. प. बंगालमध्ये आपल्या सत्तेला ग्रहण लागले आहे, हे ममतांना निश्चितपणे ठाऊक आहे. भाजप येत्या निवडणुकीत सत्तेच्या जवळपास पोहोचू शकतो, याची जाणीवही त्यांना आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात केव्हाही आणि काहीही बोलण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. आजचा दिवस काय, महाराष्ट्रातील परिस्थिती काय आणि आपण बोलतोय काय यापैकी कशाचाही सारासार विवेक ममतांनी केलेला नाही. काँग्रेसचे दुसरे ज्येष्ठ आणि बोलभांड नेते दिग्विजय सिंह यांनीही या विमानाच्या तांत्रिक सुदृढतेवर शंका उपस्थित केली आहे. एकंदरीतच, आपल्याकडे सारासार विवेक संपुष्टात आलेल्या नेत्यांची कमतरता नाही. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच आपल्या हाती आहे.
 
- राहुल बोरगांवकर
Powered By Sangraha 9.0