विकृत अंजली

29 Jan 2026 11:24:42
Amruta Fadnavis
 
अंजली भारतीपेक्षा देहविक्री करणार्‍या भगिनी सच्च्या, नीतिमान वाटतात. कारण, त्या त्यांच्याकडे येणार्‍या वासनांधांना सांगत नाहीत की, जा तू अमुकतमुकवर बलात्कार कर. इतकी नीतिमत्ता, माणुसकी त्यांच्याकडे आहे. चार-दोन टाळ्या आणि पैसे मिळवण्यासाठी अंजली भारती हिने अमृता फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. अमृता या कुणाची तरी मुलगी, पत्नी, आई आहेत. ‘लोकांनी त्यांच्यावर बलात्कार करावा,’ असे म्हणणारी अंजली ही समाजावर लागलेला कलंकच. अंजली भारती महिला असूच शकत नाही. नव्हे... नव्हे, ती माणूस म्हणण्याच्याही लायकीची नाही.
 
असो, ज्याला ‘घाणेरडा उन्माद’ म्हणता येईल, तो वाढवण्यासाठी प्रयत्न करणे ही विकृतता सध्या वाढत आहे. आक्षेपार्ह, माणुसकीला काळीमा फासणारे, घाणेरडे, हिंसात्मक बोलणे आणि कर्कश, अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन बीभत्स हातवारे करत आरडाओरड करण्याला ‘गाणे’ म्हणते, असे भासवणारी विकृत अंजली. तिच्या गाण्याचे विषय काय असतात? तर हिंदू विरोध, भाजपविरोध, मोदी आणि फडणवीस यांच्यावर अत्यंत खालच्या स्तराची टीका. बरे, टीका करण्याचे विषयही खरे नसतात. टीका करताना ती मधेच दारुड्यासारखी झोकांड्या देत उठते. मान, डोळे गरागरा हलवते. विकृत आवड असणार्‍यांना हे तिचे ध्यान पाहून मजा येते. मग, अंजलीला आणखीन चेव येतो आणि ती जास्तीच विकृत मानसिकतेचे प्रदर्शन करते. समाजमान्यता मिळावी म्हणून ती धूर्तपणे स्वतःला बाबासाहेबांची अनुयायी म्हणते. पण, आज बाबासाहेब असते तर? एका महिलेवर लोकांना बलात्कार करावा म्हणून आवाहन करणार्‍या या अंजलीला त्यांनी चांगला धडा शिकवला असता. तिच्या विधानावर टाळ्या, शिट्ट्या वाजवणार्‍या त्या विकृतांनाही बाबासाहेबांनी वठणीवर आणले असते. यावर वाटते की, खैरलांजी आणि कोपर्डीसह अनेक बलात्काराच्या घटना घडल्या. त्यातले गुन्हेगार जसे समाजाला कलंक आहेत, तसेच महिलेवर बलात्कार करा म्हणून सांगणारी अंजली ही समाजाला कलंक आहे. गुन्हेगारी विकृत विचार तिच्या मनात होतेे, ते ती बोलली. नुसती बोललीच नाही, तर इतरांना तिने गुन्हा करण्यासाठी आवाहन केलेे. समाजात विकृतता वाढू नये, यासाठी विकृत अंजलीवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचेच!
‘लाल सलाम’ची स्थिती
 
राज्यात भाजपचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. ‘चला, उठा. आता आंदोलन-मोर्चे काढायची वेळ झाली,’ असे म्हणत २०१४ सालापासून वेगवेगळ्या माध्यमातून त्याच-त्याच संस्थांनी आणि माणसांनी आंदोलनाचा सुकाळ केला. आंदोलने व्हायची, तेच-तेच लोक भाजप, मोदी, फडणवीस यांच्याबद्दल उगीचच टीका करायचे. ज्या पूर्ण करता येणारच नाहीत, अशा मागण्या करायच्या आणि सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न करायचा, हेच धंदे होते. पण, त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.
आताही ‘अखिल भारतीय किसान सभा’, ‘सीटू’ कामगार संघटना, ‘अखिल भारतीय शेतमजूर युनियन’, ‘अखिल भारतीय जनवादी महिला संघटना’, ‘डीवायएफआय’ ही युवक संघटना व ‘एसएफआय’ ही विद्यार्थी संघटना यांनी शेतकरी-आदिवासी बांधवांचा मोर्चा काढला आहे.
 
त्यांच्या मागण्या काय - तर शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार-संहितेत बदल रद्द करा, वनजमीन तथा पडीक, बेनामी जमीन कसणार्‍यांच्या नावे करा आणि ‘महात्मा फुले कर्जमुक्ती योजने’ची अंमलबजावणी करून सर्व शेतकर्‍यांना लाभ द्या वगैरे... यात महिला, बालक आणि वृद्धही आहेत. याअनुषंगाने त्यांच्या आरोग्याची हेळसांड झाली, तर जबाबदार कोण? या मोर्चाचे आयोजन करणार्‍यांना शेतकरी-आदिवासी बांधवांची इतकी कणव होती, तर त्यांनी या बांधवांना पायी चालत-चालत नाशिकहून मुंबईला का आणले? मागे २०१८ साली असाच मार्चा निघाला होता. त्यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या, डोळ्यात फूल पडलेल्या व पाय रक्तबंबाळ झालेल्या आजोबांना विचारले होते की, ‘बाबा तुम्ही का पायी चालत आलात?’ तर ते म्हणाले, "मोर्चात आलात, तर जमीन नावावर होईल असे सांगितले, म्हणून आलो.” मोर्चामध्ये यावे म्हणून या भोळ्या, गरीब, गरजू वृद्धाला फसवले गेले होते. याअनुषंगाने आता हाल, अपेष्टा आणि त्रास सहन करत मुंबईला पायी चालत आलेल्या मोर्चातील लेाकांना काय सांगितले गेले असेल, याचे उत्तर काहीही असले; तरीसुद्धा अंतरंगी अर्थ एकच आहे, तो म्हणजे लोकांना फसवून विचारधारा, पक्ष आणि संस्था टिकत नसते. यानुसार, ‘लाल सलाम’वाल्यांची सध्याची स्थिती काय आहे?
Powered By Sangraha 9.0