अजित पवारांचे सिनेविश्वाशी होते खास संबंध, नव्या फिल्मसीटीसाठीही दिली होती जागा

    29-Jan-2026
Total Views |

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. तर त्यांच्यावर अंत्य संस्कार २९ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे करण्यात आले. यावेळी प्रचंड जनसागर उसळला होता. बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. राजकीय, सामाजिक तसेच मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजांनी साश्रु नयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

प्रामाणिकपणे काम करणारा, जनतेसाठी झटणारा नेता अशी अजित पवार यांची ओळख होती. विशेष म्हणजे, आपल्या अखेरच्या काळातही त्यांनी महाराष्ट्राला आणि सिनेविश्वाला मोठी भेटच दिली होती. नाशिक जिल्ह्यात फिल्म सिटी उभारण्यास त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मंजुरी दिली होती. अनेकांना माहिती नसेल, पण अजित पवार यांचे चित्रपटसृष्टीशी जुने नाते होते.

अजित पवार यांचे वडील अनंतराव गोविंदराव पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे थोरले बंधू होते. अनंतराव पवार यांचा चित्रपटसृष्टीशी थेट संबंध होता. त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्यासोबत राजकमल स्टुडिओमध्ये काम केले होते. कौटुंबिक मतभेदांमुळे ते पुण्याहून मुंबईत स्थायिक झाले आणि भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळातील दिग्गज व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये असिस्टंट सिनेमॅटोग्राफर म्हणून रुजू झाले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील एक महान नाव असलेले व्ही. शांताराम यांनी १९४२ साली राजकमल स्टुडिओची स्थापना केली होती. याच स्टुडिओमध्ये ‘झनक झनक पायल बाजे’, ‘अमर भूपाळी’, ‘नवरंग’ आणि ‘दो आंखें बारह हाथ’ यांसारखे अजरामर चित्रपट तयार झाले. या चित्रपटांनी भारतीय सिनेमाला नवी दिशा आणि सामाजिक आशय दिला.

राजकमल स्टुडिओमध्ये काम करत असताना अनंतराव पवार यांना तांत्रिक आणि प्रोडक्शन प्रक्रियेचे सखोल ज्ञान होते. कॅमेरा, शूटिंग मॅनेजमेंट आणि चित्रपट निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया त्यांनी जवळून अनुभवली. त्या काळात राजकमल स्टुडिओ हा चित्रपट निर्मितीचा एक मोठा केंद्रबिंदू होता. नंतर अनंतराव पवार यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जात कृषी आणि सहकारी संस्थांमध्ये कार्य करण्यास सुरुवात केली.

अजित पवार यांची सिनेविश्वाला शेवटची भेट

वडील लहानपणीच हरपले असले, तरी त्यांच्या कामाचा आणि विचारांचा प्रभाव अजित पवार यांच्या जीवनावर दिसून येतो. जरी ते पूर्णतः राजकारणात सक्रिय होते, तरी चित्रपटसृष्टीशी असलेले हे जुने नाते त्यांनी नेहमीच जपले होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे नव्या फिल्म सिटीसाठी शासकीय जमीन मंजूर केली. या प्रकल्पासाठी आवश्यक ते आदेशही त्यांनी दिले होते. गोरेगाव येथील मुंबई फिल्म सिटीवरील ताण कमी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता.

मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेल्या इगतपुरीतील निसर्गरम्य परिसरामुळे या फिल्म सिटीमुळे स्थानिक रोजगार, पर्यटन, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांना मोठा फायदा होणार होता. अशा प्रकारे राजकारणासोबतच चित्रपटसृष्टीशीही नाते जपणारे अजित पवार कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहतील.