चित्रकलेपासून ते शिल्पकलेपर्यंत विविध क्षेत्रांत मुक्तपणे मुशाफिरी करणार्या अतुल आचरेकर यांचा जीवनप्रवास...
मुंबईला ‘स्वप्नांची मायानगरी’ म्हणतात. कामगार, कष्टकरी आणि कलाकार या तीनजणांच्या विलक्षण संगमातून मुंबईचे वैभव उभे राहिले. कारण, कष्टकर्यांनी जरी मुंबई घडवली असली, तरी तिला सजवण्याचे काम इथल्या कलाकारांनी केले. कलाकारांच्या याच मांदियाळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे अतुल आचरेकर. अतुल आचरेकर म्हणजे अस्सल मुंबईकर! दादरच्या प्लाझा सिनेमासमोर, रामभुवन येथे त्यांचे बालपण गेले. विविध क्षेत्रांतील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना घडवणार्या छबिलदास शाळेचे ते विद्यार्थी. त्यांच्या लहानपणी पावसकर सरांकडून त्यांनी चित्रकला आत्मसात केली. लहानपणी दिवाळीला घराबाहेरची रांगोळी बघताना त्यांचे मनसुद्धा त्या ठिपक्यांच्या आणि रंगांच्या दुनियेत हरवून जात असे. हळूहळू ते स्वतः रांगोळी काढू लागले.
गणेशोत्सवाच्या काळामध्ये मखराचे, मूर्तीचे काम बघताना त्यांना जी रंगांची गोडी लागली, ती कायमचीच. हातात कुठलेही काम नसल्यावर आई अर्थात, काहीतरी करायला सांगायची. अशा वेळी अतुल चित्र काढत बसायचे. त्यांच्यातील कलाकाराने त्यांचे संपूर्ण भावविश्व व्यापून टाकले होते. परंतु, घरच्या परिस्थितीमुळे दहावी पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, नोकरी स्वीकारल्यानंतरसुद्धा त्यांनी आपले शिक्षण थांबवले नाही. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोर असलेल्या भरडा हायस्कूलमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. रूढार्थाने ते कुठल्याही आर्ट स्कूल किंवा आर्ट कॉलेजला गेले नाहीत. मात्र, ते ‘टेक्सटाईल डिझायनिंग’चे काम शिकले आणि फॅक्टरीमध्ये कामाला लागले. इथे टेक्सटाईलचे काम करता-करता त्यांनी आपली चित्रकलेची आवड जोपासली. त्यांच्या कामाचे लोकांकडून कौतुकसुद्धा होत होते.
प्रत्येक कलाकाराच्या जीवनामध्ये काही असे प्रसंग येतात, ज्यातून तावून-सुलाखून बाहेर पडायचे असते आणि स्वतःची नवीन वाट निर्माण करायची असते. अतुल यांच्या आयुष्यातसुद्धा असे संघर्षाचे टप्पे आले. १९८०च्या दशकात गिरण्यांचा संप झाला. या संपामुळे लाखो मराठी कामगार देशोधडीला लागले. अशाच एका मिलच्या संपामध्ये अतुल आचरेकर यांना आपली रोजीरोटी गमवावी लागली. नंतरच्या काळात एका खासगी ठिकाणी त्यांनी काहीकाळ काम केले. अशातच त्यांना ‘बेस्ट’मध्ये काम करण्याची संधी चालून आली. त्यांनी ती संधी स्वीकारली आणि जीवनाची गाडी पुन्हा एकदा रुळावर आली. मात्र, हातात कुंचला धरून रंगांच्या दुनियेत वावरणार्या या कलाकाराला टायर खात्यात काम मिळाले. मात्र असे असले, तरी त्यांनी रंगपेटी कायमची बंद केली नाही. जीवनाचा सारा कोलाहल सांभाळत ते चित्रकलेत प्रावीण्य मिळवतच राहिले.
या कलाप्रवासात त्यांना साथ लाभली, ती रांगोळी सम्राट गुणवंत मांजरेकर यांची. त्यांच्यासोबत भंडारी मंडळ, रानडे रोड अशा अनेक ठिकाणी रांगोळी प्रदर्शने बघण्यासाठी, प्रक्रिया समजून घेण्यासाठी ते फिरायचे. एकाच वेळेला रांगोळी, चित्रकला, सजावट अशा सर्व आघाड्यांवर अतुल आचरेकर यांची रंगयात्रा सुरू झाली. अशातच समाजाला दिशा देण्यासाठी वृत्तपत्रातील कात्रणांच्या माध्यमातून त्यांनी आगळेवेगळे ‘कोलाज-चित्र’ तयार केले. काही वर्षांपूर्वीच दादरच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे त्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. आपल्या कामाविषयी माहिती देताना ते सांगतात की, त्यांच्या चित्रांवर चित्रे, दलाल, मूळगावकर, एस. एम. पंडित अशा मान्यवरांचा प्रभाव होता. या मान्यवरांना गुरुस्थानी ठेवून एकलव्याप्रमाणे मी साधना केली, असे ते सांगतात.
कलेची तपस्या करताना कधी रंग, तर कधी शाई यांची परवड सुरू होती. मात्र, आपापल्यापरीने ते नवनवीन गोष्टींचा शोध लावत जायचे आणि निर्मिती करत राहायचे. काही असो वा नसो, आपल्या खिशामध्ये एक पेन मात्र हमखास असतो. यातूनच ‘पेनपेंटिंग’ची आगळीवेगळी संकल्पना त्यांनी कागदावर उतरवली आणि बघता-बघता त्यांनी तयार केलेल्या या चित्रांचे प्रदर्शनसुद्धा वरळीच्या ‘नेहरू आर्ट गॅलरी’मध्ये भरवण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धांपासून ते ‘यूएस आर्ट गॅलरी’च्या पारितोषिकांपर्यंत अनेक सन्मान त्यांच्या वाटेला आले. मात्र, त्यांचे काम आणि शिकण्याची जिद्द कमी झाली नाही. गुळगुळीत दगडांपासून ‘स्टॅच्यू’ बनवणे असो किंवा कंदील तयार करणे, त्यांचा कलाप्रवास अजूनही अविरत सुरूच आहे. अशा या आगळ्यावेगळ्या रंगयात्रीला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा.