Ajit Pawar Death : महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काळा दिवस; अजित पवारांच्या निधनावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

28 Jan 2026 12:10:01

Sanjay Raut

मुंबई : (Sanjay Raut on Ajit Pawar Death)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. बारामती येथे विमानाचे लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला. या अपघातात हे विमान जळून खाक झाले. परिणामी अजित पवारांसह या विमानात असलेल्या पाचही प्रवाशांचा करुण अंत झाला. अजित पवारांच्या अशा अकाली जाण्याने महाराष्ट्रातून आता हळहळ व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(Sanjay Raut on Ajit pawar Death)
 
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काळा दिवस
 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना संजय राऊत म्हणाले, "आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काळा दिवस आहे. अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम आणि रोखठोक नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण आता 'बेचव' आणि 'अळणी' होईल. त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच राहिले."(Sanjay Raut on Ajit pawar Death)

अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव आणि अळणी

संजय राऊत म्हणाले, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाच्या अपघाताची बातमी कळली, तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजित पवार सहीसलामत अपघातातून बाहेर यावेत. पण दुर्दैवाने धक्कादायक आणि दुःखद बातमी आमच्या कानावर आली. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण बेचव आणि अळणी होईल. त्यांचे व्यक्तिमत्व दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता असे होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.(Sanjay Raut on Ajit pawar Death)

बारामतीतच त्यांना मृत्यू यावा हा विचित्र योगायोग

अजित पवारांच्या कामाची पद्धत, प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचे एक नाते होते आणि त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा, हा विचित्र योगायोग आहे. अजित पवारांना कधी श्रद्धांजली वाहावी लागेल, असे कधीही मनात आले नाही. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणले आणि नंतर गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रात शरद पवारांशिवाय राजकारण सुरू केले. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल, असे कोणच्याही ध्यानीमनी नव्हते.(Sanjay Raut on Ajit pawar Death)
Powered By Sangraha 9.0