भारतीय संस्कृतीत अन्नदानाला सर्वोच्च स्थान दिले असून त्याला प्राणदान मानले जाते. अन्न हे पूर्णब्रह्म मानून भुकेल्याला अन्न देणे, हे सर्वांत मोठे पुण्यकर्म मानले जाते. ही परंपरा 'अतिथी देवो भव' या तत्त्वावर आधारित असून निस्वार्थपणे गरजूंना अन्न देणे, हे मानवी कर्तव्यात येते. असेच मानवी कर्तव्य कल्याणातील काही संवदेनशील नागरिक 'रोटी डे'च्या माध्यमातून निभावत आहेत. त्यांच्या 'एव्हरी सडे रोटी डे'च्या कार्यावर टाकलेला हा प्रकाश...
'भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी’ या शिकवणीचा धागा पकडून कल्याणातील संवेदनशील नागरिक ‘रोटी डे’च्या माध्यातून गरिबांचे पोट भरत आहेत. वीटभट्टी, झोपडपट्टी परिसरात राहणार्या गरिबांचे आणि त्यात ही लहान मुलांचे पोट भरण्याच्या उद्देशाने कल्याणातील काहीजण एकत्र आले. कल्याणातील ४७ वर्षीय नितील चंदेया यांच्यासह त्यांच्या अन्य काही मित्रांनी या अनोख्या अशा ‘रोटी डे’ उपक्रमाची २०१८ मध्ये मुहूर्तमेढ रोवली. ‘कोविड’ टाळेबंदीच्या काळात हा उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली. ‘खाना खिला के देखो, अच्छा लगता हैं,’ हे ब्रीदवाक्य घेऊन ही स्वयंसेवी संस्था काम करत आहे. आपल्या समाजात उपाशीपोटी असलेल्या मुलांना किमान एक दिवसतरी पोटभर जेवण मिळावे, मुख्य प्रवाहातील मुलांप्रमाणेच या मुलांना ही वेगवेगळे पदार्थ खाण्याचा आनंद मिळावा, या उद्देशाने आठवड्यातील प्रत्येक रविवारी ‘रोटी डे’ उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
या उपक्रमात मुलांना स्वच्छ आणि ताजे जेवण मिळावे, याकडे विशेष लक्ष दिले जाते. या उपक्रमाची कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. केवळ मौखिक प्रसिद्धीद्वारे या उपक्रमाची माहिती इतरांना मिळते आणि ते या उपक्रमाला साहाय्य करण्यासाठी पुढे येतात. महाराष्ट्रातच नव्हे, तर सातासमुद्रापार असलेले देणगीदार आणि प्रायोजक या उपक्रमाला मदत करतात. गेल्या सात वर्षांपासून एकही खंड न पडता ‘रोटी डे’च्या माध्यमातून गरिबांच्या वस्तीतील चिमुरड्यांच्या चेहर्यावर आनंद फुलवला जात असल्याची माहिती या ग्रुपचे सदस्य नितील चंदेया यांनी दिली.
कल्याण शहरातील आसपास असलेल्या कोनगाव, वाडेघर, बापगाव आदी भागांत मोठ्या प्रमाणात गरिबांची वस्ती आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून दर रविवारी वेगवेगळ्या भागांतील गरजू मुलांना नाश्ता व जेवण दिले जाते. त्यामध्ये सकाळी ७५० व संध्याकाळी ७५० अशा १ हजार, ५०० गरजूंना अन्नवाटप केले जाते. त्यासोबतच थंडीमध्ये ब्लॅकेट, पावसाळ्यात छत्री-रेनकोट यांच्यासह शालेय साहित्याचे वाटपही ‘रोटी डे’च्या माध्यमातून केले जाते. नितीन चंदेया यांनी झोपडपट्टीतील वंचित मुलांना दर रविवारी एक वेळेचा नाश्ता देण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या स्वयंपाकघरातून बनवलेली रोटी आणि भाजी देण्यास सुरुवात केली. या उपक्रमाला समाजातील अनेक दानशूर व्यक्तिमत्त्वांची मदत मिळते.
केवळ कल्याण परिसराच नव्हे, तर सुरत, राजस्थान आणि दिल्ली या परिसरांतूनही दानशूर व्यक्तिमत्त्वे या उपक्रमासाठी साहाय्य करत आहेत. या उपक्रमाचे फेसबुकवर एक पेजही उपलब्ध आहे. त्या वेबसाईटवर मुलांना जेवण मिळाल्यानंतर चेहर्यावर दिसणारा आनंद फोटोमधून दिसून येते. त्यांनी वेबसाईटवर शेअर केलेले फोटो अनेकांना पुढे येऊन योगदान देण्यास प्रेरित करतात. या उपक्रमाची सुरुवात कल्याणमधील काही नागरिकांनी एकत्र येऊन केली असली, तरी मागील सात वर्षांच्या काळात यांच्याशी अनेक परिसरांतील लोक जोडले गेले. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील सदस्यांचा सहभाग आहे. डोंबिवलीसह भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर येथील मिळून ‘रोटी-डे’ उपक्रमाची सदस्य संख्या आजच्या घडीला २५०च्या घरात पोहोचली आहे. या उपक्रमाचे कौतुक करताना भाजपचे माजी आ. नरेंद्र पवार यांनी "रोटी डे’ अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये संवदेनशीलता वाढीस लागते,” असे सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना पुरी-भाजी, तिळगुळ, फळे, मिल्कशेक, वडापाव, भात, वरण, बिस्कीट, वेफर्स, चॉकलेट, पोहे, उपमा, केक, मसालाभात, डोसा, फरसाण, इडली, वडा, ढोकळा, समोसा, चिक्की, चिवडा, गुलाबजामुन असे विविध प्रकारचे पदार्थ मुलांना दिले जातात, जेणेकरून या गरीब मुलांचे एक दिवसासाठी पोट भरेल. झोपडपट्टी वस्तीत राहणार्या मुलांमध्ये अनेकदा पोषणमूल्यांची कमतरता जाणवते. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक व्याधीही दिसून येतात. या मुलांना एक दिवस जरी पौष्टिक जेवण मिळाले, तरी त्यांचे शरीर तंदुरस्त राहण्यासाठी मदत होणार असल्याचे चंदेया यांनी सांगितले. ही संस्था केवळ विद्यार्थ्यांच्या सदृढ आरोग्याची काळजी न करता, त्यांना शिक्षणाच्या दिशेने जाण्यासाठीदेखील मदत करते. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी नागरी संस्था आणि रुग्णालयांशी करार करण्याची योजना ते आखतात, असे ही चंदेया यांनी सांगितले.