navi mumbai - 'या' पाणथळीवर पांढऱ्या बाकचोच तुतारी पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन

    28-Jan-2026
Total Views |
navi mumbai wetland


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
नवी मुंबईतील टी.एस.चाणक्य पाणथळीवर पांढऱ्या बाकचोच तुतारी (कल्यु सॅण्डपायपर) पक्ष्याचे दुर्मीळ दर्शन घडले आहे (navi mumbai wetland). शनिवार दि. २४ जानेवारी रोजी पक्षीनिरीक्षण करताना पक्षीनिरीक्षक सचिन राणे यांना हे दर्शन घडले (navi mumbai wetland). बाकचोच तुतारी हा मुंबईत सायबेरियामधून हिवाळ्यात येणारा स्थलांतरी पक्षी असून तो ४,५०० किलोमीटरचा प्रवास करुन याठिकाणी येतो. (navi mumbai wetland)
 
 
हिवाळ्यात अनेक पक्षी उत्तर आशियाई भागामधून मुंबईतील किनारी आणि स्थलीय पाणथळ प्रदेशात स्थलांतर करुन येतात. यामधील दरवर्षी येणारा आणि अगदी सहजपणे दिसणारा पक्षी म्हणजे बाकचोच तुतारी. तुतारी म्हणजेच सॅण्डपायर पक्ष्यांच्या अनेक प्रजाती या महाराष्ट्रात स्थलांतर करुन येतात. मात्र, बाकचोच तुतारी हा पक्षी त्याच्या लांब, काळ्या आणि खालच्या दिशेने वळलेल्या चोचीमुळे ओळखता येतो. हे पक्षी प्रामुख्याने सायबेरियाच्या आर्क्टिक टुंड्रा प्रदेशात प्रजनन करतात. प्रजनन हंगामात त्यांच्या शरीरावरील पिसांचा रंग बदलतो. साधारण आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ज्यावेळी ते महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांचा रंग हलका राखाडी-तपकिरी आणि पांढरा असा असतो. मात्र, मार्च-एप्रिल महिन्यात परतीच्या प्रवासावेळी त्यांच्या रंग लालसर झालेला असतो. मात्र, आता पांढऱ्या म्हणजेच ल्युकिस्टिक असणाऱ्या बाकचोच तुतारी पक्ष्याचे निरीक्षण पक्षीनिरीक्षक सचिन राणे यांनी नवी मुंबईतील पाणथळीवरुन केले आहे.
 
याविषयी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना राणे यांनी सांगितले की, "२४ जानेवारी रोजी टी.एस.चाणक्य पाणथळीवर पक्षीनिरीक्षणासाठी गेलो असता बाकचोच तुतारी आणि टिलवा पक्ष्यांचा थवा बसलेला आम्हाला दिसले. त्याचे छायाचित्र टिपत असताना त्या थव्यामध्ये हा पांढऱ्या रंगाचा बाकचोच तुतारी पक्षी दिसला." १८ ते २३ सेमी लांबीचा हा पक्षी पूर्व आशियाई-ऑस्ट्रेलियन स्थलांतर मार्गाचा वापर करुन महाराष्ट्रात येतो. बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीकडून मुंबईत टॅग केलेल्या या पक्ष्यांची चीनमधून नोंद करण्यात आली आहे.
 
 
पांढऱ्या रंगामुळे प्रजननामध्ये बाधा ?
वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. गुणसूत्रांमधील हे बदल त्याचे शारीरिक स्वरूप, वागणूक किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात. यामुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येऊ शकतो. शरीराचे रंग ठरवणारे 'मेलेनिन' रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णत: काळे होतात म्हणजेच मेलेनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो. 'ल्युकिस्टिक' प्रकारात शरीर काळे किंवा पांढरे असले तरी, वन्यजीवांचे डोेळे नियमित रंगाचे असतात. प्रजनन हंगामात बाकचोच तुतारी पक्ष्याचा रंग बदलत असल्याने रंग महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, या पांढऱ्या रंगामुळे या विशिष्ट बाकचोच तुतारी पक्ष्याच्या प्रजननामध्ये काही बाधा निर्माण होत आहे का, हे अभ्यासण्याजोगे असेल.