हिंद-दी-चादर

28 Jan 2026 12:51:31
Devendra Fadnavis
 
भारताच्या इतिहासात धर्मरक्षणासाठी तलवार उचलण्याइतकेच महत्त्व मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाला आहे. जेव्हा श्रद्धा धोक्यात येते, जेव्हा समाज फुटू पाहतो, तेव्हा अशा बलिदानांची आठवण समाजाला दिशा देते. शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते; तर भारतीय संस्कृतीतील सर्व धर्म, परंपरा आणि जीवनमूल्यांच्या संरक्षणासाठी होते. त्यांच्या ३५०व्या शहिदी वर्षानिमित्त नांदेडमध्ये महाराष्ट्र शासन आयोजित ‘हिंद-दी-चादर’ शहिदी समागम हा त्याच व्यापक विचारांचा, सामाजिक समरसतेचा आणि राष्ट्रीय एकतेचा साक्षात्कार ठरला त्याविषयी....
 
नांदेडमधील ऐतिहासिक ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५०व्या शहिदी समागमाची आठवण सजीव केली. दोन दिवसांच्या या भव्य धार्मिक व ऐतिहासिक समारंभाने केवळ भक्तीच नव्हे, तर सामाजिक समारसतेचा संदेशही मोठ्या प्रमाणावर दिला. लाखो शीख भाविक, साधुसंत, स्वयंसेवक आणि विविध समाजांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले, ज्यामुळे संपूर्ण नांदेड शहरसहित देशाचे वातावरणात गुरु गोविंदसिंग यांच्या ऐतिहासिक शौर्याच्या स्मरणात न्हाऊन गेले. महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने आयोजित ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची सुरुवात नगरकीर्तनाने झाली. मुख्य पालखीमध्ये श्री गुरु ग्रंथ साहिबजी विराजमान होते. ‘बोले सो निहाल सत् श्री अकाल’ या जयघोषाने शहरातील वातावरण भक्तिमय बनवले. नगरकीर्तनात मुख्य जत्थेदारांनी मार्गदर्शन केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भाविकांनी उभ्या राहून पालखीचे स्वागत केले. शालेय विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी फुलांची उधळण केली, तर लेझीम व ढोल-ताशांच्या तालबद्ध आवाजाने उत्साह दुपटीने वाढवला. तसेच, ‘एनसीसी’च्या विद्यार्थ्यांनी ‘मानवता की सच्ची मिसाल’ आणि ‘हिंद-दी-चादर’ असे संदेश घेऊन समाजात धार्मिक सहिष्णुतेचा संदेश दिला. यानंतर मुख्य कार्यक्रमस्थळी गुरुग्रंथ साहिबजींचे विधिवत विराजमान झाले. यानिमित्ताने भाविकांनी शांतता व श्रद्धेने गुरुबाणीचे पठण, अरदास व कीर्तन ऐकले. कार्यक्रमात लंगर सेवेचा विशेष ठसा उमटला. धर्म, जात, भाषा, प्रांत यांचा भेद न करता, हजारो भाविकांना एकत्र बसवून भोजन दिले गेले. स्वयंसेवकांनी स्वच्छता, अन्न शिजवणे, पंगतीत सेवा अशा प्रत्येक कार्यात भक्तिभाव ठेवला. सहभागी म्हणतात, "विविध धर्म व समाजांतील लोक एकत्र बसून जेवण घेत आहेत; हे पाहून खरी मानवता अनुभवायला मिळाली.”
 
आरोग्य शिबीर व नेत्रसेवा या उपक्रमांमुळे उपस्थित नागरिकांना उच्च प्रतीची वैद्यकीय सेवा मिळाली. २५० हून अधिक डॉक्टरांच्या पथकाने मोफत तपासणी व औषधोपचार केले. मोफत चष्मावाटप व कर्करोग तपासणीने वृद्ध व गरीब नागरिकांची अत्यंत मदत केली. या दोन दिवसांत नांदेडमध्ये उपस्थितांना सामाजिक समरसतेचा विशेष अनुभव घेता आला. बंजारा, सिकलीगर, लबाना, मोहयाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन व भगत नामदेव समाज अशा समाजांनी या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात सहभाग घेतला. धार्मिक व सामाजिक भेद न भासता समाजातील ऐक्य येथे स्पष्ट दिसून आले. ‘विरासत-ए-सीख’ प्रदर्शनाने शीख धर्माच्या स्थापनेपासून गुरू गोविंदसिंग यांच्यापर्यंतचा इतिहास, योद्ध्यांचे शस्त्रास्त्रे व महापुरुषांचा जीवनप्रवास चित्रे व माहितीद्वारे दर्शनास आणला, ज्यामुळे युवक व भाविकांना शिक्षण व प्रेरणा मिळाली.
 
कार्यक्रमात बाबा हरिनामसिंग, बलविंदर बाबाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण, महंत रघुमुनी, दिल्लीचे कॅबिनेटमंत्री मनिंदर सिरसाणी, बाबूसिंग महाराज, ‘विश्व हिंदू परिषदे’चे शरदराव ढोले, कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, अतुल सावे, माजी मुख्यमंत्री तथा ख. अशोक चव्हाण, खा. डॉ. अजित गोपछडे, आ. मेघना बोर्डीकर, आ. तुषार राठोड, आ. श्रीजया चव्हाण, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अनेक आमदार, संत, महंत, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व आणि भव्यता अधिक दृढ झाली.
 
या दोन दिवसांच्या भव्य शहिदी समारंभाने नांदेडच्या ऐतिहासिक भूमीला पावन केले. धार्मिक भिन्नता आणि सामाजिक भेद न बघता सर्व समाज एकत्र येऊन भक्ती, सेवा व समतेचे आदर्श साकारले गेले. प्रशासनाने भाविकांसाठी सुरक्षा, स्वच्छता, पाणी व भोजनाची सुव्यवस्थित व्यवस्था केली, ज्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. ‘हिंद-दी-चादर’ समागमाने नांदेडमध्ये समाजात बंधुता, मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेचा अमूल्य संदेश दिला. भव्य नगर कीर्तन, लंगर सेवा, आरोग्य व नेत्रसेवा, तसेच ‘विरासत-ए-सीख’ प्रदर्शनाद्वारे भक्ती आणि शिक्षण यांचा संगम अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमातून राज्यातील विविध समाजांमध्ये ऐय व सामाजिक समरसतेची भावना अधिक दृढ झाली.
 
नांदेडमधील ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाने गुरू गोविंदसिंग यांच्या आदर्शानुसार भक्ती, शौर्य आणि समाजसेवेचा मार्ग दाखवला. शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी, उदासीन आणि भगत नामदेव संप्रदायांनी शीख धर्मासाठी अपूर्व योगदान दिले. या कार्यक्रमातून ऐय, मानवता आणि धार्मिक सहिष्णुतेचा संदेश समाजास स्पष्ट झाला.
 
- संत ज्ञानी बाबा हरनाम सिंगजी खालसा
 
नांदेडमधील ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाने गुरू गोविंदसिंग यांच्या शौर्य, आदर्श आणि बलिदानाचा संदेश प्रसारित करत समाजातील बंधुत्व, समरसता व मानवतेचा अन्मोल संदेश दिला. विविध धर्म, जात, भाषा व प्रांतांतील लोक एकत्र येऊन भक्ती, सेवा आणि समतेचे आदर्श साकारत दिसले. नगरकीर्तन, लंगर सेवा, आरोग्य व नेत्रसेवा यांसह उपक्रमांनी भक्तिशिवाय समाजसेवेचा संदेश स्पष्ट केला. युवकांसाठी प्रेरणा, सामाजिक ऐक्य व धार्मिक सहिष्णुतेचा संदेश या भव्य समागमातून दिला गेला. प्रत्येक भारतीयाने गुरू गोविंदसिंग यांचा आदर्श आत्मसात करावा, असा संदेश गाजला.
 
- डॉ. अजित गोपछडे, राज्यसभा खासदार
 
 
- सागर देवरे
 
 
 
Powered By Sangraha 9.0