बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात. बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान टीव्हीवर अशी एक धक्कादायक कानावर पडली आणि लगेच पुढच्या काही मिनिटांत या अपघातात अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली. सुरुवातीला तर ही बातमी अविश्वसनीय वाटत होती. मात्र, जसजशी अपघाताची माहिती पुढे येत गेली तसतसं चित्र स्पष्ट झालं. कुणाच्याही हाकेला धावून जाणारे, तडफदार, स्पष्टवक्ते, शिस्तप्रिय आणि समर्पित भावनेने काम करणारे नेते अशी अजितदादांची ओळख. खरंतर, अजूनही या अजितदादांच्या अचानक जाण्यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. मात्र, हा अपघात नेमका कसा घडला? विमानात आणखी कोण कोण होतं? जाणून घ्या सविस्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमाान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी बारामतीमध्ये त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ते विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. मात्र, सकाळी ९ ते सव्वानऊ वाजताच्या दरम्यान बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचं विमानावरचं नियंत्रण सुटलं. तसेच तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोरात आदळलं. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमान आकाळात घिरट्या घालत होतं आणि त्यातून आवाजही येत होता. धावपट्टीजवळ विमानाने घिरट्या घातल्या. पण विमान खाली उतरु शकलं नाही.
लँडिंगला अवघी काही मिनिटं शिल्लक असताना घडला. विमानाला आग लागली होती. मदतीला अनेक जण धावत आले. परंतू, सर्वत्र आग पसरली असल्याने मदत करणं शक्य झालं नाही. विमान कोसळताच काही वेळातच त्याने भीषण पेट घेतला आणि घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट उठू लागले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. परंतू, अपघात इतका भीषण होता की, यात अजितदादांसह ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. हे विमान अजित पवार यांचं खाजगी विमान असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : Ajit Pawar Death : विमान अपघातांचा काळा इतिहास पुन्हा समोर; आतापर्यंत देशाने गमावलेले 'हे' दिग्गज नेते
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विदिप जाधव, पिंकी माळी, क्रृ मेंबर सुमीत कपूर, शांभवी पाठक यांच्यासह आणखी काहीजण या विमानात होते. हे विमान क्रॅश झाल्यानंतरची काही दृश्य समोर आली आहेत. ही दृश्य पाहिल्यानंतर हा अपघात किती भीषण होता ते लक्षात येतं. अपघाताच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये विमानाचे अक्षरश: तुकडे होऊन ते सर्वत्र विखुरल्याचं दिसतंय. तसेच अपघात स्थळावर सर्वत्र धुराचे लोट दिसताहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा घडला, याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्या पत्नी खा. सुनेत्रा पवार आणि बहीण खा. सुप्रिया सुळे या दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाल्या आहेत. बारामती रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड मोठी गर्दी केली आहे. कधीही भरून न निघणारे हे नुकसान असून पवार कुटुंबावर मोठा आघात असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीये. अजितदादांच्या निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होतीये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.
कुणाच्याही हाकेला धावून येणारे नेते अशी अजितदादांची ओळख होती. महाराष्ट्रात ७ वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे आहे. शिवाय ते महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे नेते आहेत. राजकारणातील त्यांचा दबदबा आणि प्रशासनावर असलेला वचक यामुळे ते कायम लोकांच्या स्मरणात राहतील. अजितदादांच्या जाण्याने कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. दै. मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.