मुंबई : (Ajit Pawar Death) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवार, दि. २८ जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या भीषण विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा विमान अपघातांचा काळा इतिहास प्रकाशात आला आहे. विमान दुर्घटनांमध्ये देशातील अनेक दिग्गज नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांचे अकाली निधन झाल्याच्या घटनांची नोंद आहे. संजय गांधींपासून ते जनरल बिपिन रावत आणि आता अजित पवारांपर्यंत... या घटनांनी पुन्हा एकदा हवाई सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
या आधीही अनेक दिग्गज नेत्यांनी अशाच दुर्घटनांमध्ये प्राण गमावले आहेत-
२०२५ : विजय रुपाणी
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे गेल्या वर्षी अहमदाबादजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. शांत, सौम्य नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या रुपाणी यांच्या मृत्यूने गुजरातचे राजकारण हेलावून गेले.
२०२१ : जनरल बिपिन रावत
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचा कुन्नूरमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. भारतीय लष्करासाठी ही अत्यंत मोठी हानी ठरली. त्यांच्यासह पत्नी माधुलिका रावत आणि ११ जवानांनीही प्राण गमावले.
२०११ : दोरजी खांडू
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांचे तवांगजवळ हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले होते. सीमावर्ती प्रदेशातील विकासकामांवर भर देणारे खांडू यांच्या जाण्याने उत्तर-पूर्वेतील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.
२००९ : वाय.एस.आर. रेड्डी
आंध्र प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी हेलिकॉप्टर अपघातानंतर नल्लामला जंगलात मृत अवस्थेत सापडले. त्यांच्या अकाली निधनाने आंध्रचे राजकारण ढवळून निघाले.
२००१ : माधवराव सिंधिया
मध्य प्रदेशातील दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे मैनपुरीजवळ विमान कोसळून निधन झाले.
१९८० : संजय गांधी
भारताचे तरुण आणि महत्त्वाकांक्षी काँग्रेस नेते संजय गांधी यांचे दिल्लीतील सफदरजंगजवळ विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यांच्या अकाली मृत्यूने काँग्रेसचे नेतृत्व समीकरणच बदलले.
१९६६ : होमी भाभा
भारतीय अणुकार्यक्रमाचे जनक आणि जागतिक कीर्तीचे अणुभौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी एअर इंडिया फ्लाइट १०१ च्या अपघातात निधन झाले. जिनेव्हा हवाई नियंत्रणातील चुकीच्या संपर्कामुळे विमान माँट ब्लँक पर्वतरांगांवर कोसळले.
हवाई सुरक्षेवर पुनर्विचाराची गरज
देशातील या अपघातांचा मागोवा घेतला असता अनेकदा हवामान, तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुका हे घटक समोर आले आहेत. मात्र, सर्वच घटनांचा एक समान धागा म्हणजे अनुभवी, परिणामकारक आणि देशहितासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना अकाली गमावणे.अजित पवार यांच्या निधनानंतर या मुद्द्यावर पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. हवाई सुरक्षा, उपकरणांचे आधुनिकीकरण आणि व्हीआयपी उड्डाणांसाठीच्या प्रोटोकॉलचे पुनर्मूल्यांकन करण्याची गरज निर्माण झाल्याचं बोलले जात आहे.