प्रजासत्ताक भारताचे क्रीडाविश्व...

    27-Jan-2026
Total Views |
Republic Day
 
आज भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन. भारतीय प्रजासत्ताकाची वाटचाल १९५० पासून सुरु झाली. या प्रजासत्ताक दिनाला एक इतिहास आहे. देशाने प्रजासत्ताक स्वीकारले त्याचवर्षी देशाच्या क्रीडा इतिहातही अनेक ठळक घडामोडी घडत होत्या. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने क्रीडाविश्वातील या घटनांचा घेतलेला आढावा...
 
सर्वप्रथम आपण आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या एकमेकांना शुभेच्छा देऊ. दि. २६ जानेवारी १९५० पासूनचा आपला प्रजासत्ताक भारत ७७वा सोहळा साजरा करत आहे. त्यानिमित्त राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या सोहळ्याचे वर्णन दूरदर्शनवर बघत, ‘नभोवाणी’वर ऐकत त्याचा आनंद घेत आहोत. जेव्हा राजधानीत राष्ट्रगीत गायले जाते, तेव्हा आपणही उभे राहून राष्ट्रध्वजाला प्रणाम करत असतो. आपल्या देशाचे पंतप्रधान दि. १५ ऑगस्टला, तर राष्ट्रपती दि. जानेवारी रोजी ध्वज फडकावत असतात.
प्रजासत्ताक म्हणजे काय : प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसाहक्काने निवडला न जाता, लोकनिर्वाचित पद्धतीने निवडला जातो अशी व्यवस्था. या व्यवस्थेतील सर्व शासकीय कार्यालये, पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी खुली असतात. आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली, तो दिवस म्हणजेच प्रजासत्ताक दिन होय!
 
ध्वजारोहण अन् ध्वज फडकावणे : अनेकांना या ध्वजसोहळ्यातील एका फरकाची कल्पना नसते. दि. १५ ऑगस्टला पंतप्रधान ध्वजारोहण करतात, तर दि. २६ जानेवारीला राष्ट्रपती झेंडा फडकावतात. यातील फरक जाणून घेऊ. दि. १५ ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो, त्याला ध्वजारोहण म्हणतात. आणि दि. २६ जानेवारी रोजी झेंड्याची बंद घडी करून गाठ बांधून झेंडा आधी वर नेला जातो आणि मग तो फडकावला जातो. दि. १५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला गेला आणि भारताचा झेंडा वर चढवला गेला, म्हणून याला ‘ध्वजारोहण’ म्हटलं जातं. तर दि. २६ जानेवारी १९५० रोजी भारताचा झेंडा तर होताच; पण भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडी करून, तो बांधून वरच्यावर गाठ सोडून हवेत मोकळा केला जातो. याला ‘झेंडा फडकावणे’ असं म्हटलं जातं.
 
ध्यानचंद स्टेडियम : हॉकीच्या मेजर ध्यानचंद यांच्या नावाने आज आपण ओळखतो त्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर, भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत झाला होता. त्याकाळी ते ठिकाण ‘आयर्विन अ‍ॅम्फी थिएटर’ या नावाने प्रसिद्ध होते. त्याआधी याच मैदानाच्या मोकळ्या जागेत, गांधी-आयर्विन करार झाला होता. त्यानंतर सन १९५४ पर्यंत किंग्जवे, लाल किल्ला आणि रामलीला मैदान अशा वेगवेगळ्या ठिकाणी हा सोहळा झाला. १९५५ मध्ये राजपथावर पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाचे संचलन आयोजित करण्यात आले होते.
 
राष्ट्रध्वजाचा राखू मान : राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांना, प्रजासत्ताकदिनी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलनाचा कार्यक्रम आयोजित करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, व्यायामासाठी प्रेरित करणे हा त्यामागील उद्देश. आज अनेक पालक आपल्या पाल्याला शाळेत ने-आण करण्यासाठी ‘स्कूल व्हॅन’ लावतात. अनेक ‘स्कूल व्हॅन’चे चालक त्या दिवशी सुटी घेत असल्याने, पालकच आपल्या पाल्याला त्या दिवशी शाळेत सोडण्याचे काम करतात. त्या दिवशी शाळेच्या बाहेर झेंडे वगैरे विकायला विक्रेते उभे असतात. पालकांनी विकत घेऊन दिलेले झेंडे मिळाल्याने, मुलेही खुशीत घरी आल्यावर त्या झेंड्याशी खेळतात. तो आनंद संपल्यावर त्या झेंड्याकडे त्यांचे अजाणतेपणाने दुर्लक्ष होते. मात्र, घरची मोठी मंडळीही त्या झेंड्याचं आपण काय करतो? याचा विचार करताना आढळत नाहीत.
 
हे ध्यानात घेऊनच पुण्यातील प्रसिद्ध झेंडेविक्रेत्यांनी पालकांना केलेले आवाहन मला भावले. दि. १५ ऑगस्ट आणि दि. २६ जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर सर्वत्र पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पाहावी लागते; तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे, हे कायदाबाह्य ठरते. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी ‘भारत फ्लॅग फाऊंडेशन’ने पुढाकार घेतला असून, गिरीश मुरुडकर हे संस्थापक आणि राहुल भालेराव कार्यकारी अध्यक्ष असलेल्या पुण्याच्या ‘भारत फ्लॅग फाऊंडेशन’चे हे २४वे वर्ष आहे. मुरुडकर झेंडेवाले यांनी सर्वांना कळकळीचे आवाहन केले आहे की, असे राष्ट्रध्वज आमच्याकडे द्या.
 
विदेशी प्रमुख पाहुणे : १९५० पासून भारत नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी, दुसर्‍या देशाच्या राष्ट्रप्रमुखांना किंवा सरकारप्रमुखांना राज्याचे सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित करत आहे. भारताच्या पहिल्या १९५०च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकार्नो हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तेच भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे पहिले विदेशी प्रमुख पाहुणेही ठरले. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आजवर जगभरातील अनेक देशांना, भारताने हा सन्मान दिला आहे. सर्वाधिक म्हणजे एकूण सहावेळा, फ्रान्सचे नेते प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आहेत. अगदी पाकिस्तानचे नेतेही, दोनवेळा प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहिले होते. १९५५ मध्ये पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मोहम्मद आणि १९६५ मध्ये पाकिस्तानचे कृषिमंत्री राणा अब्दुल हामिद हे, प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे होते. भारताने आतापर्यंत आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडातूनही प्रमुख पाहुणे बोलावले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष २०१५ला या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आले होते.
 
पाहुणे कोण हे कसे ठरते : प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला निमंत्रण द्यायचे, याचाही एक शिष्टाचार ठरलेला असतो. प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या सहा महिने अगोदर ही प्रक्रिया सुरू केली जाते. परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने ही संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते. सर्वांत आधी राजकीय आणि राजनैतिक संबंध, आर्थिक आणि संरक्षण सहकार्य, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंध आणि वैश्विक संदर्भानुसार एक यादी बनवली जाते. प्राथमिकतांच्या आधारावर ही यादी, विविध मापदंड लक्षात घेऊन तयार केली जाते. म्हणजे कधी एखाद्या देशाशी अतिशय चांगले संबंध असल्याकारणाने तेथील नेते प्रमुख पाहुणे बोलावले जातात, तर कधी एखाद्या देशाशी संबंध चांगले नसले, तरीही निमंत्रण दिले जाते. जेणेकरून भविष्यात दोन्ही देशांमधील संबंध चांगले होतील, असा होरा त्यामागे असतो. तसेच कधी एखाद्या विशिष्ट हेतूनेदेखील प्रमुख पाहुणे निश्चित केले जातात. प्रमुख पाहुण्यासाठी प्रस्तावित देशांची नावे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडे पाठवली जातात. यानंतर संबंधित प्रमुख पाहुण्यांची उपलब्धता तपासली जाते. जर ते उपलब्ध असतील, तर परराष्ट्र मंत्रालय निवडलेल्या देशासोबत अधिकारीस्तरीय संपर्क साधला जातो.
 
कर्तव्यपथावर आजपर्यंत हीच प्रथा सुरु आहे. युरोपियन काऊन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅण्टोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन, हे २०२६च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. आजचे अतिथी हे कोणा एका राष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निमंत्रित नसून, हे दोन्ही नेते पहिल्यांदाच एकत्ररित्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. यामुळे भारत आणि युरोपियन युनियनमधील संबंध दृढ होतील. या राजनैतिक माहितीनंतर आपण आता प्रजासत्ताक भारताच्या क्रीडाक्षेत्राकडे वळू. भारताच्या दृष्टिकोनातून १९५० हे वर्ष जसे प्रजासत्ताक म्हणून महत्त्वाचे होतेच; तसेच ते प्रजासत्ताक भारताला क्रीडाविश्वात अग्रेसर होण्यासही महत्त्वपूर्ण ठरले.
 
प्रजासत्ताक भारताचे ध्वजवाहक व ऑलिम्पिक : भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन मेजर ध्यानचंद यांनी, सर्वप्रथम देशाला हॉकीत सुवर्णपदक मिळवून दिले. हे जरी खरे असले, तरी १९४८ला जे ऑलिम्पिक झालं होतं, त्यामध्ये स्वतंत्र भारताचा ध्वजवाहक फुटबॉलपटू तालिमेरेन एओ हा होता. त्याआधी इंग्रज अधिपत्याखालील भारताचे ध्वजवाहक १९२०ला अ‍ॅथलिट पूर्मा बॅनर्जी, त्यानंतर लागोपाठ काही हॉकीपटूंनीही इंग्रजांच्या अधिपत्याखालील भारताचे ध्वजवाहकाचे दायित्व सांभाळले होते. १९३२ला लाल शाह भोकारी व १९३२ला ध्यानचंद हे ध्वजवाहक होते, पण खर्‍या अर्थाने स्वतंत्र भारताचा ध्वजवाहक होण्याचा बहुमान मिळाला तो ध्यानचंदनंतर भारताला हॉकीत पदके जिंकून देणार्‍या बलबीर सिंग सिनियर यांनाच.
 
१९५० मध्ये ऑलिम्पिक खेळ नव्हते. तरीही १९५० हे एक महत्त्वाचा टप्पा म्हणून प्रजासत्ताक भारतासाठी मोलाचेच होते. १९५० हे वर्ष आशियाई खेळांच्या सुरुवातीच्या नियोजनासाठी भारतीय क्रीडाक्षेत्राला महत्त्वपूर्ण होते. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे १९५० मध्ये, नवी दिल्लीत आयोजन करण्याचे नियोजन होते. तथापि, पुरेसा अवधी आणि योग्य तयारीच्या अभावामुळे, हे खेळ पुढे ढकलण्यात आले. अखेरीस दि. ४ ते ११ मार्च १९५१ या कालावधीत दिल्लीतच यशस्वीरित्या पार पडले. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते त्या स्पर्धांचे उद्घाटन झाले होते. त्या स्पर्धेत जपानने सर्वाधिक पदके जिंकली, तर यजमान भारत दुसर्‍या स्थानावर होता.
 
१९५०चा फिफा फुटबॉल विश्वचषक ब्राझीलमध्ये खेळवला गेला. त्यासाठी भारत पात्र ठरला होता; पण सहभागापासून दूर राहिला. तांत्रिकदृष्ट्या पात्र असूनही, ‘अखिल भारतीय फुटबॉल महासंघा’ने प्रवासाचा खर्च, खेळाडूंच्या निवडीतील मतभेद, पुरेसा सराव नसणे आणि ऑलिम्पिकला दिलेले जास्त महत्त्व या कारणांमुळे माघार घेतली होती. थोडक्यात, १९५० हे वर्ष ऑलिम्पिक वर्ष नसले, तरी ते महत्त्वपूर्ण ऑलिम्पिक विकासाचे गतिवर्धक असे ठरले होते. दुसर्‍या महायुद्धानंतर १९५२मध्ये खेळांना आकार मिळाला, जो शीतयुद्धाच्या इतिहासातील एक प्रमुख घटक झालाच, त्याचबरोबर प्रजासत्ताक भारतासाठीही ते महत्त्वाचे पाऊल ठरले. प्रजासत्ताक भारतीय संघाचे प्रथम ध्वजवाहक असलेल्या त्याच बलबीर सिंग सिनियरच्या भारतीय हॉकी संघाने, प्रजासत्ताक भारताला हॉकीत सुवर्ण मिळवून दिले होते. त्याचबरोबर प्रजासत्ताक भारताला ऑलिम्पिकमधलं पहिलं वैयक्तिक कांस्यपदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधवही तेव्हा यशस्वी ठरले होते. आंतरराष्ट्रीय राजकारण आडवं आलं नसतं, तर खाशाबा सुवर्णपदक घेऊनच परतले असते. तरीदेखील ही बाबदेखील कमी महत्त्वाची ठरत नाही; कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत प्रजासत्ताक झाल्यावर ऑलिम्पिक स्पर्धेतील हे पहिलं वैयक्तिक पदक ठरलं होतं.
 
ऑलिम्पिक आणि युरोपियन संघटन : या २०२६च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रमुख पाहुणे आपण निमंत्रित केले आहेत, त्याच युरोपमधील ‘राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्यां’चे युरोपियन संघटन हे प्रतिनिधित्व करते. युरोपियन युनियन धोरणांमध्ये खेळाचा समावेश करण्यासाठी आणि उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी ‘युरोपियन ऑलिम्पिक कमिशन’ आणि ’नॅशनल ऑलिम्पिक कमिशन’सोबत काम करते. थोडक्यात, युरोपियन युनियन हा एकच घटक म्हणून स्पर्धा करण्याऐवजी, त्यांच्या सदस्य राष्ट्रांद्वारे आणि मूल्यांद्वारे पारंपरिक ऑलिम्पिकचे समर्थन करत, त्याचा फायदा घेतात. ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी दि. २५ मार्च १९५७ला स्थापन झालेल्या ऑलिम्पिक संघात, आज २७ सदस्य देशांचा सहभाग आहे. युरोपियन युनियन हा ऑलिम्पिकमध्ये एकच संघ नाही, तर त्याचे सदस्य देश स्वतंत्रपणे अत्यंत यशस्वी होत आहेत. अनेकदा पदकतालिकेत ते आघाडीवर असलेले आपल्याला आढळतात.
 
आपला प्रजासत्ताक भारत १९५० पासून क्रीडाक्षेत्रात किती व कशी प्रगती करत आहे, हे आपण वेळोवेळी बघत आहोतच. तर अशा या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परत एकदा शुभेच्छा देत, देशसेवेची भावना आणि तिरंग्याचा अभिमान सदैव अबाधित राहू दे, ही सदिच्छा व्यक्त करत मी माझ्या या लेखणीला विराम देतो.
जयतु जयतु हिंदूराष्ट्रम्|
 
- श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)