मैदानातील दीपस्तंभ

    27-Jan-2026   
Total Views |
Mukund Bhoir
 
आपल्या दूरदृष्टी, कष्ट आणि निष्ठेच्या माध्यमातून पुढील पिढीचे भविष्य कसे उज्ज्वल करता येईल, यासाठी अहोरात्र झटत क्रीडाक्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या मुकुंद भोईर यांच्याविषयी...\
 
मुकुंद यांचा जन्म दि. १ जून १९५७ रोजी डोंबिवलीमधील एका शेतकरी कुटुंबात झाला. ते आगरी समाजाचे असून साधेपणा, कष्ट, शिस्त आणि समाजसेवेची मूल्ये त्यांनी लहानपणापासून आत्मसात केली. मुकुंद यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केली. शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांना क्रीडाक्षेत्राची विशेष आवड होती. कबड्डी हा त्यांचा आवडता खेळ असून, लहानपणापासूनच ते सक्रिय खेळाडू होते. १९८१ मध्ये त्यांची डोंबिवली येथील अभिनव सहकारी बँकेच्या संचालक मंडळांवर निवड झाली. त्यांच्या कार्यकाळात बँकेने लक्षणीय प्रगती केली. विशेष म्हणजे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पण गुणवंत व्यक्तींना आर्थिक मदत मिळावी, यासाठी त्यांनी नेहमीच मानवतावादी दृष्टिकोन कामकाजात बाळगला. त्यांनी बँकेचे कार्य केवळ आर्थिक क्षेत्रापुरतेच मर्यादित न ठेवता, क्रीडाक्षेत्रामध्येही त्यांनी बँकेचा सहभाग वाढवला. त्यांनी बँकेच्यावतीने कबड्डी संघ स्थापन केला. त्यामुळे अनेक खेळाडूंना प्रोत्साहन मिळाले व त्यांचे क्रीडाक्षेत्रातील करियर घडले.
 
मुकुंद यांची क्रीडाविषयीची ओढ त्यांच्या कुटुंबातही दिसून आली. त्यांची दोन मुले मानवेंद्र आणि पवन यांनादेखील खेळाची आवड आहे. वडील मुकुंद यांचा क्रीडाक्षेत्रातील वारसा ही दोन्ही मुले आज जपत आहेत. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिस हा सर्व खेळांचा पाया आहे, या ठाम विश्वासातूून भोईर यांनी दोन्ही मुलांना जिम्नॅस्टिसचे धडे दिले. या खेळातील कौशल्य आत्मसात करत अल्पावधीतच त्यांच्या दोन्ही मुलांनी, राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवत पदके जिंकली. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताचे प्रतिनिधित्व केले. डोंबिवली व आसपासच्या परिसरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा प्रशिक्षण सुविधांचा अभाव लक्षात आल्यावर, मुकुंद यांनी धाडसी आणि दूरदृष्टीपूर्ण असे पाऊल उचलले. त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांतून ‘भोईर जिमखाना’ या अत्याधुनिक जिम व जिम्नॅस्टिस प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली. खासगी क्षेत्रात, वैयक्तिक पातळीवर उभारलेले केंद्र देशात दुर्मीळ बाब ठरली. आज ही संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडवणारे केंद्र म्हणून ओळखली जाते.
 
पुढे मुकुंद यांच्या कार्याचा विस्तार हळूहळू वाढत गेला. त्यांनी ‘भोईर स्पोर्ट्स कॉम्प्लेस’ आणि ‘श्रवण स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी’चीही स्थापना केली. या संस्थांमुळे स्थानिक खेळाडूंना विविध खेळांसाठी दर्जेदार सुविधा, शास्त्रीय प्रशिक्षण आणि व्यावसायिक मार्गदर्शन उपलब्ध झाले. यामुळे खेळ हा केवळ छंद न राहता, करियर म्हणून स्वीकारण्याचा आत्मविश्वास अनेक खेळाडूंमध्ये निर्माण झाला. मुकुंद हे नेहमीच क्रीडा नर्सरीवर विशेष भर देतात. लहान वयातच गुणवंत मुलांची ओळख करून, त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेमधून आजपर्यंत १०० हून अधिक खेळाडूंनी, त्यांचे करियर घडविले आहे. मुकुंद यांच्या संस्थेतील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाशिक्षक व प्रशासक म्हणून उज्जवल कामगिरीही केली आहे. त्यांनी ‘चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम’ या उक्तीप्रमाणे, आपल्या जन्मगावी राहूनच देशसेवा करण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या संस्था केवळ क्रीडा प्रशिक्षण केंद्र न राहता, व्यक्तिमत्त्व विकास केंद्र म्हणून ही कार्यरत आहेत. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्याने व पालक समुपदेशन यांमुळे खेळाडूंचा सर्वांगीण विकास येथे साधला जातो. त्यामुळे या क्रीडासंस्थांमधून खेळाडूंच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष केंद्रित केले जाते.
 
मुकुंद यांना क्रीडाक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल, अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते त्यांना ‘प्रियदर्शिनी पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. याशिवाय, ‘डोंबिवली भूषण पुरस्कार’, ‘सलाम डोंबिवलीकर’, ‘द ग्रेट डोंबिवलीकर’ आणि ‘रोटरी पीस अ‍ॅवॉर्ड’ अशा पुरस्कारांनीही त्यांना आजवर गौरवण्यात आले आहे. २००४ आणि २०११ मध्ये डोंबिवली येथे झालेल्या ‘अखिल भारतीय आंतरशालेय जिम्नॅस्टिस स्पर्धे’चे यशस्वी आयोजन करण्यामध्ये, मुकुंद यांचा सहभाग मोलाचा होता. मुकुंद यांनी नुकतेच ‘खेलो इंडिया खेलो, पाठलाग स्वप्नपूर्तीचा’ या पुस्तकाचे प्रकाशनही केले. मुलांच्या आयुष्यात खेळाचे स्वतंत्र स्थान असले पाहिजे, यासाठीही मुकुंद गेल्या ३५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नरत आहेत. पुढच्या पिढीला काही सांगायचे असेल, तर ते लिखित स्वरूपात साठवून ठेवण्याची गरज असल्यानेच, त्यांनी काही पुस्तकांचेही लेखन केले आहे. या पुस्तकांच्या लेखनासाठी, मुकुंद यांचे बालमित्र अनिल छत्रे यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. या पुस्तकांमुळे खेळाविषयी जागृती होईल आणि जास्तीत जास्त खेळाडू घडतील, असा विश्वासही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला होता. मुकुंद यांचे जीवन एका व्यक्तीच्या दूरदृष्टी, कष्ट आणि निष्ठेमुळे संपूर्ण पिढीचे भविष्य कसे उजळू शकते, यांचे प्रेरणादायी उदाहरण आहे. अशा या व्यक्तिमत्त्वाला पुढीला वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.