महाराष्ट्राच्या ई-गव्हर्नन्स मूल्यांकनात अव्वल कामगिरी करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पाचवा क्रमांक
27-Jan-2026
Total Views |
मुंबई : ( Maharashtra Pollution Control Board ) मुख्यमंत्री यांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ई-गव्हर्नन्स मूल्यांकनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) ५वा क्रमांक प्राप्त केला आहे. राज्यातील ९७ मंडळे, महामंडळे व प्राधिकरणांशी स्पर्धा करत, ई-गव्हर्नन्स श्रेणीतील विश्लेषणात मंडळाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे.
हे महत्त्वपूर्ण यश डिजिटल परिवर्तन, तंत्रज्ञानाधारित प्रशासन तसेच नागरिक-केंद्रित सेवा पुरविण्याबाबत मंडळाच्या ठाम वचनबद्धतेचे प्रतीक आहे. यामुळे राज्यातील सर्व भागधारकांच्या हितासाठी प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता व उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यात आले आहे. या यशामागे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह, भा.प्र.से. यांचे दूरदर्शी नेतृत्व मोलाचे ठरले आहे. मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान त्यांनी मंडळाच्या ई-गव्हर्नन्स उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण करून एमपीसीबीचा डिजिटल रोडमॅप मुख्यमंत्र्यांनी संकल्पित केलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत केला.
तसेच अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन व देखरेखीमुळे आयटी विभागाला आवश्यक चालना मिळाली. त्यांच्या पाठिंब्यामुळे लेखापरीक्षण, माहिती विश्लेषण व तांत्रिक सादरीकरणाच्या प्रक्रियेत उत्कृष्ट समन्वय साधता आला आणि मंडळाने सर्व कठोर मूल्यांकन निकष यशस्वीपणे पूर्ण केले. या यशाचे श्रेय मंडळाच्या सर्व शाखांतील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांनाही जाते. माहितीची तत्परता सुनिश्चित करणे, अंतर्गत प्रणाली अधिक सक्षम करणे व कार्यपद्धतींची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम या गौरवामागे महत्त्वाचे ठरले, असे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह, भा.प्र.से. यांनी नमूद केले आहे.
अव्वल पाच क्रमांकांमध्ये स्थान मिळविणे हे मंडळासाठी प्रेरणादायी असून, येत्या काळात संस्थेच्या ध्येय व दृष्टीपूर्तीच्या दिशेने अधिक प्रभावी काम करण्यास ते बळ देणारे आहे. ई-गव्हर्नन्स सुधारणा, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (Government Process Reengineering) आणि पारदर्शक, कार्यक्षम व सुलभ सार्वजनिक सेवा वितरणात नवे मानदंड प्रस्थापित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कटिबद्ध असल्याचे मत अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी व्यक्त केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरांतून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अभिनंदन होत आहे.