शासनाच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस मूल्यांकनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला मिळाला प्रथम क्रमांक

27 Jan 2026 18:26:47
MPCB
 
मुंबई : ( MPCB Ranks First Among State Boards in 150-Day Sevakarmi Plus ) विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा अंतर्गत विविध प्रशासकीय विभागांच्या अधिनस्त मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, आयोग, स्थानिक स्वराज्य संस्था, इ. आस्थापनामधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने 150 दिवसांचा सेवाकर्मी प्लस कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत सेवा विषयक प्रगतींच्या मूल्यांकनात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला १०० पैकी ८४ गुण मिळाले असून राज्यातील मंडळाच्या श्रेणीत प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
 
या कार्यक्रमाचे मूल्यमापन करताना संबंधित आस्थापनांचा आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, जेष्ठता सूची, पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा भरती, iGOT नोंदणी व प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे अशा 9 घटकांचा समावेश होता. अशा एकूण 9 उद्दिष्टांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आयोग, प्राधिकरण, मंडळ, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा यांचे गुणांकन प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आले.
 
हेही वाचा : महाराष्ट्राच्या ई-गव्हर्नन्स मूल्यांकनात अव्वल कामगिरी करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पाचवा क्रमांक
 
सदर कार्यक्रमांतर्गत भारतीय गुणवत्ता परिषदेने (Quality Council of India) प्रशासकीय विभागांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या गुणांकनाची माहिती व मंडळाने दिलेले सादरीकरण संकलित करून अहवाल सादर केला होता. त्यात राज्यातील मंडळामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रथम क्रमांकाचे मिळालेले यश हे मंडळाचे कामकाज अधिक पारदर्शी व गतीमान होत असल्याचे दयोतक आहे असे प्रतिपादन मंडळाचे सदस्य सचिव, एम. देवेंदर सिंह, भा. प्र. से. यांनी व्यक्त केले. हा पुरस्कार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी प्रेरणादायी असून यापुढेही मंडळ कौशल्य विकास व तांत्रिक गुणवत्तेवर अधिक जोमाने काम करेल आणि संपूर्ण देशात कामकाजाचा आदर्श निर्माण करेल असा विश्वास मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी व्यक्त केले.
 
 
Powered By Sangraha 9.0