मुंबई :( Maharashtra Maritime Board ) राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सामान्यीकृत २०० गुणांपैकी १९८.७५ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिक भिमुख करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेला “१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम” राज्यातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाकांक्षी पाऊल ठरत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्व प्रवर्गांमध्ये महाराष्ट्र सागरी मंडळाने ही सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे.
ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून कागदविरहित प्रशासन, वेळ बद्ध सेवा, पारदर्शक निर्णयप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधिष्ठित कार्यपद्धती यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे हे यश मिळाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र सागरी मंडळ तसेच बंदरे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, ही कामगिरी इतर शासकीय संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.
मंत्री नितेश राणे यांच्याकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन
१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल बंदरे खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी सदर विभागात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ट्विट करत अभिनंदन केले आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.