सध्या पश्चिम घाटात धनेश प्रजातींच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. कोकणातील प्रत्येक गावात धनेशाचे स्वर ऐकू येत आहेत, तर कुठे धनेशाच्या युगुलांचे दर्शन घडत आहे. धनेश त्यातही खास करून महाधनेश कोकणाबरोबरच अन्य राज्ये आणि इतर देशांमधील लोककथांमध्ये आजही आपले अढळ स्थान निर्माण करून आहे. त्याविषयी माहिती देणारा लेख...
आफ्रिकन लोक धनेशाबद्दल म्हणतात, दुष्काळातही ज्याची चोच जमीन न पाहता आभाळाची जाणीव ठेवून नेहमी उंच बघत राहते, तो धनेश आम्हाला खडतर कालावधीतही धीरोदात्त कसे जगायचे, याची शिकवण देतो. आफ्रिकेच्या जंगलापासून ते थेट भारतीय उपखंडातील पूर्वांचलाच्या सीमेपर्यंत आपल्या विविध रूपांची छाप सोडणार्या धनेशाचे त्या त्या भागातील आदिवासींशी असलेले नाते अतूट आहे. हे नाते परंपरागत चालत आलेले आहे. अफ्रिकेतील लोक म्हणतात, धनेश निर्मितीचे प्रतीक आहे, तर पूर्वांचल व पूर्व आशियातले लोक त्याला त्याग आणि प्रेमाचा असीम स्रोत मानत आलेत. नागा जमातीत आजही अशी समजूत आहे की, मृत्यूनंतर त्यांच्या लोकांचा आत्मा धनेशाचा आकार घेतो. तिथे धनेश दिसणे शुभ मानले जाते. सुगीच्या दिवसात तो दिसला की, हे आदिवासी त्याचे व निसर्गदेवतेचे आभार मानतात. प्रेम, वीरश्री आणि त्यागासोबत ज्याचा दुवा जोडलेला आहे, असा बहुदा हा एकमेव पक्षी असावा.
आयुष्यभर एकाच जोडीदाराशी प्रामाणिक राहणारा धनेश नागा लोकांसाठी एक आदर्श पक्षी आहे. अभंग प्रेमाचा तो ‘स्टेटस सिम्बॉल’ आहे. त्याची पिसं अंगावर लेवून आणि त्याच्या चोचीचा मुकूट ते घालतात. मात्र, आता धनेशाची धोक्यात आलेली संख्या लक्षात घेता, त्यांनी प्लास्टिकची पिसं स्वीकारलेली आहेत. मात्र, धनेशाला त्यांच्या संस्कृतीत अग्रीम स्थान आहे. तरी या सगळ्याला ज्या ज्या देशांमध्ये धनेश आहे, तिथल्या तिथल्या आदिवासी संस्कृतीत धार्मिक आणि यौद्धिक महत्त्व आहे. निसर्ग व माणसाच्या सहजीवनाला रोजच्या जडणघडणीत अमर्त्य ठेवायचे काम आदिवासींच्या लोककथा करतात. जसा दक्षिणेच्या नीलगिरी पर्वतावरचा निलकुरुंजी देव मुरूगन आणि वल्लीच्या लोककथेत सुत्रबद्ध झाला, तसे धनेशाला अनेक लोककथांमधून स्थान दिलेले दिसते. आदिवासींनी आपल्या माणसांच्या आठवणी ज्या ज्या तरू-प्राण्यांशी जोडून ज्या कथेत मांडल्या, त्यात धनेशाची वर्णी लागलेली दिसते.
सावत्र आईच्या छळाला कंटाळून धनेशासारखे स्वैर आकाशात उडण्याची इच्छा बाळगणारा नागालॅण्डमधील झेलियांग जमातीतला एक छोटा नागा मुलगा म्हणजे तालुंगडिंग. जो धनेशामध्ये परिवर्तित होतो. शेतात काम करताना कित्येक वर्षे तो सावत्र आईने दिलेले खाण्यायोग्य नसलेले दुपारचे जेवण जेवत असतो. दोन मुलींना हे कळते. त्या मुली नकळत त्याचे जेवण बदलून त्याजागी रोज चांगले ताजे जेवण ठेवतात. हे कळल्यावर तो उंच झाडावर जाऊन बसतो. तिथे तो सुंदर महाधनेशामध्ये बदलतो. त्या मुलींसाठी तालुंगडिंग महाधनेशामध्ये रुपांतरित झाला, तरी भेटायला येईन, असे त्यांना वचन देतो. दर सुगीच्या दिवसात महाधनेश बनलेला तालुंगडिंग या मुलींना सुंदर पीस देऊन जातो, अशी हळवी कथा पाहायला मिळते, तर आफ्रिकन लोककथेत धनेशाच्या डोलीत म्हातारा माणूस सोन्याची थैली ठेवतो. धनेश त्या थैलीला स्पर्शही करत नाही. म्हातार्या माणसाला हे पाहून आश्चर्य वाटते. धनेशाला तो म्हातारा "तू संपत्ती आणि प्रमाणिकपणाचे प्रतीक बनशील,” असा आशीर्वाद देतो.
नागालॅण्डची लोककथा
सुमी नागा जात नागालॅण्डमधले जुने आदिवासी लोक आहेत. फार पूर्वी किविघो नावाचा एक मुलगा व खौली नावाची मुलगी तिथे होते. किविघो हा या कथेचा नायक. अर्थात हिंदी सिनेमात असतं, तसंच हा गरीब, तर खौली श्रीमंताघरची. बालमित्र असल्याने पुढे एकमेकांच्या प्रेमात पडतात. अर्थातच, घरच्यांच्या दबावाखाली खौलीला दुसर्या गावातील मुलाशी लग्न करावे लागते. किविघो निराश होतो. खौलीच्या आठवणीत दिवस कंठायला लागतो. एकदा खौलीचे काही मित्र-मैत्रिणी किविघोच्या प्रेमाची परीक्षा घेण्याचे ठरवतात. ते किविघोला म्हणतात, "जर तुझं खरंच खौलीवर प्रेम असेल, तर कोळशाचा धगधगता निखारा हातावर ठेवून तिच्या गावी भेटायला जा.” किविघो खरोखरच तसा लालबुंद निखारा हातावर ठेवून चालत तिच्या गावी जातो. खौलीला प्रेमाने हाक मारतो. खौलीला त्याला पाहून आनंद होतो. पण नवरा घरी असल्याने ती त्याला बांबूच्या कणगीखाली लपवते. पहाटे नवर्याला शेतातील कामाला पाठवते. खौली व किविघो परत गावाकडे जायचे, असा निर्णय घेतात. वाटेत चालून दमून खौलीला भूक लागते. समोरच उंच कुठल्याशा फळाचं झाड असते. किविघो फळांसाठी उंचावर चढत जातो.
परंतु चढताना झाडाच्या सर्व फांद्या तुटतात. किविघो खूप उंचावर गेलेला असतो. फळं खाली घेऊन तो निघणार, तेव्हा त्याला कळतं की आपण आता खाली उतरू शकत नाही. हळूहळू तिथेच त्याचे महाधनेशामध्ये रूपांतर होते. खौलीला खूपच वाईट वाटते. ते पाहून किविघो तिला सांगतो, "तू परत जा. एक दिवस तुझ्या गावातले लोक एका दुर्मीळ सुंदर पक्ष्याची चर्चा करतील. तेव्हा मला बघायला तू बाहेर ये.” काही दिवस जातात. खौली मका दळत असते. तेव्हा लोकांचा आरडाओरडा कानी पडतो. ते एका सुंदर पक्ष्याबद्दल बोलत असतात. खौली पळत बाहेर जाते. तेव्हा एक लांब चोचीचा पक्षी गावाभोवती घिरट्या घालत असतो. खौलीला लगेच समजते, तो तिचा किविघो आहे! महाधनेश बनून आलेला किविघो तिच्या डोक्यावरून झर्रकन सूर घेतो, तेव्हा एक मनमोहक पीस तरंगत येऊन तिच्या छातीवर विसावते. जणू किविघोनेच तिला मिठीत घेतले, असे तिला वाटते. अशी ही सुंदर महाधनेशावरची लोककथा. या सगळ्यानंतर कदाचित असे वाटते की, किविघोचा तो लालबुंद निखारा महाधनेशाच्या चोच-मुकूटाचा एक भागच बनला का? कदाचित आजही चोचीवरचा लालचुटुक रंग त्या हातावरील प्रेमाच्या निखार्याची आठवण करून देत आहे, असेच वाटत राहते.
- रोहन पाटील
(लेखक वनस्पतीअभ्यासक आहेत.)