मुंबई : (Gold Line) मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरणारा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने मुंबई मेट्रोच्या लाईन ८ अर्थात गोल्ड लाईनच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (NMIA) थेट जोडले जाणार असून, दोन्ही विमानतळांदरम्यानचा प्रवास केवळ ३० ते ३५ मिनिटांत शक्य होणार आहे. (Gold Line)
मंगळवारी, २७ जानेवारी रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील दिला. प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रशासकीय निर्णय वेळेत मिळतील आणि काम ठरलेल्या कालावधीत पूर्ण होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. (Gold Line)
हेही वाचा : Devendra Fadnavis: भाजप–शिवसेना गटस्थापनेबाबत चर्चा सुरू; पुढील निर्णय...: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मेट्रो लाईन ८ सुमारे ३५ किलोमीटर लांबीची असणार असून, या मार्गावर एकूण २० स्थानके आहेत. यामध्ये ६ भूमिगत आणि १४ उन्नत स्थानकांचा समावेश असेल. भूमिगत मेट्रो मार्ग हा मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ पासून घाटकोपर पूर्वेपर्यंत असेल, तर उन्नत मार्ग घाटकोपर पश्चिम ते नवी मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ पर्यंत जाणार आहे. या मार्गावरील दोन स्थानकांमधील सरासरी अंतर २ किलोमीटरपेक्षा कमी असल्याने प्रवाशांना जलद व सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. (Gold Line)
या प्रकल्पासाठी ३०.७ हेक्टर जमीन लागणार असून, भूसंपादनासाठी अंदाजे ३८८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे २२,८६२ कोटी रुपये इतका असणार आहे. भूसंपादन व आवश्यक मंजुरी सहा महिन्यांत पूर्ण करून पुढील तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Gold Line)