मुलखावेगळी ‘जेन-झी’

27 Jan 2026 12:54:40
Gen Z
 
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘जेन-झी’चा बोलबाला आहे. ‘जेन-झी’ म्हणजे १९९७ ते २०१२ या काळात जन्माला आलेली पिढी. या पिढीने मोठं होताना अनेक स्थित्यंतरं अनुभवली, असंख्य बदल पचवले. एका बाजूला टीव्ही-रेडिओपासून ते डिजिटल अवकाशामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणार्‍या या पिढीने, ‘कोरोना’सारख्या महामारीचा आणि त्यातून निर्माण झालेल्या बदलाचासुद्धा सामना केला. आज याच पिढीतील बहुतेक लोक तिशीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे बदलत्या जगाबरोबरच, वेगवेगळ्या जबाबदार्‍यासुद्धा या पिढीच्या खांद्यावर येत आहेत. साहजिकच, ज्याप्रकारे ही पिढी वाढली, घडली, त्याचप्रकारे आता पुढच्या पिढीला घडवण्यासाठी ‘जेन-झी’ पिढी सज्ज झाली आहे. अशातच, आता या पिढीच्या जीवनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चं स्थान किती घट्ट होत चाललं आहे, याची आपल्याला प्रचिती येते.
 
‘टोनिक वल्डवाईड’ या संस्थेच्या माध्यमातून, ‘इनसाईट २०२६’ हा रिपोर्ट नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. स्थळ-काळानुसार ग्राहकांच्या पसंतीमध्ये झालेले बदल आणि त्याचे सांस्कृतिक पैलू टिपणार्‍या या अहवालातून, आपल्या समाजात होणार्‍या बदलांची माहिती मिळते. सदर अहवालामध्ये मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या मिश्रणाचा वापर करून ग्राहकांची वर्तणूक, सवयी आणि दृष्टिकोनातील बदलांचे परीक्षण करण्यात आले. यातून समोर आलेल्या माहितीनुसार असे आढळले की, २०२५ साली अनेकांनी निरोगी जीवनशैलीची निवड करणार्‍या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले आहे. उदाहरणार्थ, ‘ब्रेकफास्ट लब’सारख्या ठिकाणांचा शोध घेत लोकांना प्रत्यक्षात भेटणं, सामाजिक व्यवहारात भाग घेणं याला जास्त पसंती दिल्याचे दिसून येते. काही महिन्यांपूर्वी ऑस्ट्रेलियातील ‘फ्लिडंर्स विद्यापीठा’च्या संशोधनातून असे समोर आले होते की, मागच्या पिढीच्या तुलनेत ‘जेन-झी’ने मद्यपानाकडे पाठ वळवण्यास सुरुवात केली आहे. काहींच्या मते याचा अर्थ, ही पिढी निरोगी जीवनशैलीला प्राथमिकता देत आहेच; मात्र त्याचबरोबर, तणाव, अपयश, नैराश्य याचा सामना करण्यासाठी थेट दारूचा अवलंब न करता, डोळसपणे वेगवेगळ्या मार्गांचा विचार ते करत आहेत.
 
‘जेन-झी’कडे पालकत्वाची जबाबदारी येण्याचा हा काळ आहे. अशातच, या अहवालातून एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. भारतीय ‘जेन-झी’ पालकांपैकी ५२ टक्के पालक वेगवेगळ्या गोष्टींसाठी आता पारंपरिक सर्च इंजिनचा वापर न करता, ‘एआय’चा वापर करतात. एखादा सल्ला हवा असेल किंवा कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, तर त्यासाठी या पालकांकडून ‘एआय’चा वापर केला जातो. गुगल, फेसबुक यांच्या आगमनानंतर भारतासहित अनेक आशियाई देशांमध्ये, आमूलाग्र परिवर्तन घडून आले. या विकसनशील देशांची विकसित होण्यासाठीची वाटचाल सोपी झाली. दुसर्‍या बाजूला लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ याच परिसरामध्ये अनेकांना उपलब्ध झाली. कृत्रिम बुद्धिमत्तेचे वर्चस्व असलेल्या आजच्या या जगामध्ये, अशा संशोधनाकडे व त्यातून निष्पन्न होणार्‍या अहवालाकडे लक्षपूर्वक बघण्याची आवश्यकता आहे.
 
मागच्या काही काळापासून भारतासहित अनेक विकसनशील देशांमध्ये, उद्योजगतेचा विचार तरुण पिढी मोठ्या प्रमाणात करीत आहे. मात्र, त्याचबरोबर ‘डिलोईट’ने एका त्यांच्या अहवालामध्ये असे म्हटले आहे की, ५० टक्क्यांहून अधिक ‘जेन-झी’ शिक्षणाबरोबरच नोकरी करण्यासाठी तयार आहेत, किंबहुना त्यांच्या पहिल्या नोकरीमध्ये रुजू होताना, कामासाठी आवश्यक कौशल्य पूर्णपणे तयार व्हायच्या आतच त्यांनी कामात उडी घेतली आहे. अर्थात अद्यापही यावर संशोधन, मतमतांतरं सुरू आहेत.
मागच्या वर्षी नेपाळमध्ये झालेल्या सत्तांतरापासून ते आता इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षापर्यंत, ‘जेन-झी’ ही अनेक ठिकाणी केंद्रबिंदू राहिली आहे. काहींच्या मते ही पिढी आळशी आणि बेजबाबदार आहे, तर काहींच्या मते समजूतदार. एखाद्या माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन ज्या प्रकारे वेगवेगळा असू शकतो, त्याचप्रकारे एखाद्या पिढीला समजून घेण्यासाठीसुद्धा विविध मार्गांनी प्रवास करावा लागेल. त्या पिढीशी समरस होऊन, त्यांना समजून घेऊनच पुढे जावे लागेल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात समजूतदारपणाचा हाच मानवी स्पर्श आपल्याला तारू शकेल, यामध्ये शंका नाही.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0