Devendra Fadnavis: भाजप–शिवसेना गटस्थापनेबाबत चर्चा सुरू; पुढील निर्णय...: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

27 Jan 2026 17:32:15
Devendra Fadnavis 
 
मुंबई : (Devendra Fadnavis) मुंबई महानगरपालिकेतील गटस्थापन आणि महापौरपदाबाबत सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. भाजप आणि शिवसेना (महायुती) एकत्र गटस्थापन करणार की स्वतंत्र गट नोंदणी करणार, याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्ट केले की, महापौरपदासह गटस्थापनेबाबतचा निर्णय चर्चा करून आणि सर्व बाबींचा विचार करूनच घेतला जाईल. (Devendra Fadnavis)
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गटस्थापन ही केवळ राजकीय ताकदीची बाब नसून ती पूर्णपणे नियम, टक्केवारी आणि प्रशासकीय प्रक्रियांवर अवलंबून असते. “गट स्थापन करताना एकूण नगरसेवकांची संख्या, टक्केवारी (परसेंटेज पॉइंट्स) आणि त्यावर आधारित पदवाटपाचा विचार करावा लागतो. कधी एकत्र गट नोंदणी केल्याने फायदा होतो, तर कधी स्वतंत्र गट स्थापन केल्याने अधिक पदे मिळू शकतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis)
 
हेही वाचा :  Maharashtra Cabinet Decision: मोठी बातमी! राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय; युवक, कंत्राटदारांना थेट दिलासा!
 
महापौर आणि उपमहापौर ही पदे वगळता इतर सर्व महत्त्वाची पदे ही एकूण संख्येच्या टक्केवारीनुसार मिळतात, असे सांगत फडणवीस यांनी स्थायी समितीत जास्तीत जास्त सदस्य कसे मिळतील, यावर महायुतीचा भर असल्याचे स्पष्ट केले. “सध्या आम्ही सर्व शक्यतांचा अभ्यास करत आहोत. एकत्र गटस्थापन करून फायदा होतो की वेगवेगळा गट नोंदवून फायदा होतो, याचा अंदाज घेऊनच निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी सांगितले. (Devendra Fadnavis)
 
दरम्यान, मुंबई महापौरपदावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “लातूर आणि चंद्रपूरमध्ये विरोधकांकडे बहुमत असूनही तिथे अजून महापौर का निवडला गेलेला नाही, याचं उत्तर त्यांनी द्यावं,” असे ते म्हणाले. महापौर निवड ही केवळ बहुमताची बाब नसून, त्यामध्ये आरक्षण, गट नोंदणी आणि विविध प्रशासकीय प्रक्रिया असतात. “महापौर निवडीची ही मोठी आणि नियमबद्ध प्रक्रिया आहे. मात्र विरोधकांकडे सध्या आमच्यावर टीका करण्याशिवाय दुसरं काही काम उरलेलं नाही,” असा घणाघात करत फडणवीस यांनी महायुतीची भूमिका ठामपणे मांडली. (Devendra Fadnavis)
 
 
Powered By Sangraha 9.0