मुंबई : ( Devendra Fadnavis ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सामान्य प्रशासन कारभार अधिक पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आलेले दिसत असून याबाबत आयोजित १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात यश प्राप्त केलेल्या कार्यालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यशस्वी झालेल्या कार्यालयात एकूण २५ शासकीय कार्यालयांची माहिती देण्यात आली आहे.
यामध्ये महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण आयोग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ,मुंबई, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, मुंबई विद्यापीठ, मुंबई, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ,महाऊर्जा , महानगरपालिका पनवेल यांसह रत्नागिरी, सिल्लोड, उदगीर, वेंगुर्ला, निलंगा, कळंब, राजापूर, तुळजापूर, अहमदपूर, लोहारा, अंबरनाथ, औसा, खामगाव,नळदुर्ग या नगरपरिषद तर कुडाळ ,देवगड ,जामसंडे ,वाभवे -वैभववाडी या नगरपंचायतींचा समावेश आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अधिकृत सी एम ओ महाराष्ट्र या ट्विटर अकाउंटवर म्हटले आहे की,"या कार्यक्रमाचे मूल्यमापन करताना संबंधित आस्थापनांचा आकृतिबंध, सेवाप्रवेश नियम, जेष्ठता सूची, पदोन्नती स्थिती, सरळसेवा भरती स्थिती, बिंदूनामावली, अनुकंपा भरती, iGOT नोंदणी व प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्यावत करणे अशा ९ घटकांचा समावेश होता.
यापुढे ते असे म्हणाले की, अशा एकूण ९ उद्दिष्टांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आयोग, प्राधिकरण, मंडळ, महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, विद्यापीठ, स्वायत्त संस्था, महानगरपालिका, नगरपरिषदा यांचे गुणांकन २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. १५० दिवसांच्या सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व कार्यालय प्रमुख व त्यांच्या चमूचे हार्दिक अभिनंदन! सर्व विजेत्यांचा राज्य शासनातर्फे लवकरच सन्मान करण्यात येईल."