कोकण रेल्वे : राष्ट्रनिर्मितीच्या उभारणीतील अनुभवाचा पाया

Total Views |
Chenab Bridge
 
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाने भारतीय अभियांत्रिकीची क्षमता जागतिक पातळीवर ठळकपणे अधोरेखित करत, स्वातंत्र्यानंतर प्रथमच काश्मीर खोर्‍याला थेट रेल्वे जाळ्याशी जोडले. या महत्त्वाकांक्षी मार्गावरील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक अंजी खाड व चिनाब रेल्वे पूल उभारण्याचे शिवधनुष्य महाराष्ट्राच्या कोकण रेल्वेने समर्थपणे पेलले आणि ते यशस्वीही करून दाखवले. या ऐतिहासिक यशामागील अनुभव, आव्हाने आणि भारताच्या अभियांत्रिकी भविष्याविषयीची दृष्टी जाणून घेण्यासाठी, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दै. ‘मुंबई तरुण भारत’ने कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सन्तोष कुमार झा यांच्याशी साधलेला विशेष संवाद.
चिनाब रेल्वे पूल उभारणीसाठी कोकण रेल्वेची निवड कशी झाली?
 
चिनाब रेल्वे पूल हा केवळ एक पूल नव्हता, तर ती भारतीय अभियांत्रिकी क्षमतेची कसोटी होती. अशा अत्यंत अवघड, तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ अर्थात ’केआरसीएल’ची निवड होण्यामागे त्यांचा भक्कम अनुभव आणि आजवरची कामगिरी हेच प्रमुख कारण होते. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील सह्याद्रीच्या खडतर डोंगररांगांतून, कोकण रेल्वेने यशस्वीपणे मार्ग काढला आहे. त्यामुळे मोठे बोगदे, असंख्य पूल आणि कठीण भूगर्भीय परिस्थितीतील कामांचा दांडगा अनुभव कोकण रेल्वेकडे होता. त्यामुळे हिमालयातील या ‘मेगा-स्ट्रचर’साठीची ’केआरसीएल’ची निवड अत्यंत नैसर्गिक अशीच होती. अचूक नियोजन, कठीण परिस्थितीत त्याची अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय डिझाईन संस्थांशी समन्वय साधण्याचा कोकण रेल्वेच्या अनुभवामुळे भारतीय रेल्वेला पूर्ण विश्वास होता की, चिनाब पूल प्रकल्पाचे यशस्वी नेतृत्व ‘केआरसीएल’च करू शकते.त्यामुळेच हिमालयातील या ‘मेगा-स्ट्रचर’साठी कोकण रेल्वेची निवड होणे स्वाभाविक ठरले.
 
या ऐतिहासिक प्रकल्पाची सुरुवात कशी झाली?
 
भारतीय रेल्वेने जबाबदारी सोपवल्यानंतर लगेचच हे स्पष्ट झाले की, हा प्रकल्प कुठलाही सर्वसाधारण प्रकल्प नव्हता. हा पूल अशा भूप्रदेशात उभारायचा होता, जिथे काम करण्याचा भारतात कोणताही पूर्वानुभव नव्हता. त्यामुळे प्रारंभी चिनाब खोर्‍यात बहुविषयक सर्वेक्षण पथक पाठवण्यात आले. भू-आकार, भूगर्भशास्त्र, वार्‍याची दिशा व तीव्रता, भूकंप स्थिती आणि प्रकल्पापर्यंत पोहचणार्‍या मार्गांच्या मर्यादांचा सखोल अभ्यास करण्यात आला. पुलाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी स्वतंत्र संपर्क रस्त्यांचे जाळेच उभारण्यात आले. हे उभे करणे एक मोठेच आव्हान होते. प्रकल्पाची सुरुवात करताना ‘केआरसीएल’ला पूर्णपणे जाणीव होती की, या प्रकल्पातील सर्व प्रश्नांची उत्तरे एका संस्थेकडे नाहीत. त्यामुळे विशिष्ट तांत्रिक बाबींसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डिझाईन संस्थांची नियुक्ती करण्यात आली. IISc, IITs यांसारख्या अग्रगण्य भारतीय संस्थांकडून,अनेक बाबींची स्वतंत्र तांत्रिक पडताळणी करून घेण्यात आली. बहुस्तरीय डिझाईन पुनरावलोकन प्रणाली विकसीत केल्याने, प्रत्येक निर्णय काटेकोरपणे तपासला गेला.
 
कोकण रेल्वेच्या आधीच्या कठीण प्रकल्पांचा चिनाब पुलासाठी कसा उपयोग झाला?
 
झुवारी, मांडवी, शरावती, पानवल नदीवरील पूल अशा अत्यंत अवघड प्रकल्पांचा अनुभवच, चिनाब रेल्वे पूल यशस्वी होण्यामागील खरा आधार ठरला. या प्रकल्पांमुळे ‘केआरसीएल’कडे कठीण भूभागात काम करण्याची सखोल क्षमता विकसित झाली होती. गुंतागुंतीची लॉजिस्टिस हाताळण्याचे कौशल्यही याचकाळात ‘केआरसीएल’ आत्मसात केले होते. मर्यादित संसाधनांमध्येही मोठ्या बहुविषयक पथकांचे समन्वय साधण्याचा अनुभवही ‘केआरसीएल’कडे होता. या अनुभवातूनच प्रगत बांधकामाच्वे नियोजन, धोक्यांचे मूल्यांकन आणि सुरक्षितता व्यवस्थापन अधिक परिपक्व झाले. याचा थेट लाभ ‘केआरसीएल’ला चिनाब रेल्वे प्रकल्पामध्ये झाला.
 
अंजी खाड पूल आणि चिनाब पूल उभारतानाची प्रमुख आव्हाने कोणती?
 
अंजी खाड पूल उभारताना उताराची स्थिरता, टॉवर क्रेन उभारणी, तीव्र उतारावर उलट ‘ध’ आकाराच्या पायलॉनचे बांधकाम, डेकची भौमितिक अचूकता आणि केबल फोर्सेस कायम राखणे ही मोठी आव्हाने ‘केआरसीएल’समोर होती. चिनाब पूल उभारतानाचा सर्वांत मोठे आव्हान म्हणजे, कोणताही पूर्वीचा संपर्क मार्ग नसलेल्या उंच डोंगराळ भागात पूल बांधणे! याशिवाय प्रकल्पातील इतरही अभियांत्रिकी कामे अत्यंत आव्हानात्मक अशीच होती.
 
अंजी येथील आव्हानांवर कसा विजय मिळवला?
 
अंजी येथील आव्हाने अभ्यासपूर्ण आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पार करण्यात आली. उताराची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी, पारंपरिक सॉलिड अँकर्सऐवजी केबल अँकर्स वापरले गेले. यामुळे तीव्र उतारांवर काम करणे सोपे आणि सुरक्षित झाले. टॉवर क्रेन उभारताना मर्यादित जागा आणि कठीण पोहोच ही मोठी अडचण होती, पण खोल दरी लक्षात घेऊनच क्रेन तिरक्या ( skew angle ) पद्धतीने बसवण्यात आल्याने काम सुरळीत झाले. ‘ध’ आकाराच्या पायलॉनमुळे पारंपरिक तंत्रज्ञान वापरणे शक्यच नव्हते, त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून १९३ मीटर उंच पायलॉन यशस्वीपणे उभारला गेला. डेक सेगमेंट उभारणी आणि केबल स्ट्रेसिंग ही प्रक्रिया अगदी काटेकोर पद्धतीनेच केली गेली. प्रत्येक टप्पा सुरू करण्याआधी डेकची रचना आणि केबल फोर्सेस अचूक आहेत, याची खात्री केली गेली. या सर्व पद्धतींमुळे संपूर्ण प्रकल्पात संरचनात्मक अचूकता, स्थिरता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा साधणे शक्य झाले.
 
चिनाब येथील आव्हाने कशी पार करण्यात आली?
 
चिनाब येथे उंच डोंगराळ प्रदेशात पुलाची निर्मिती करताना, या पुलाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आधीच प्रवेशरस्त्यांचे जाळे उभारण्यात आले होते. या प्रवेश रस्त्यांचे बांधकाम हा या प्रकल्पातील एक आव्हानात्मक आणि महत्त्वपूर्ण भाग ठरला. वायडटच्या २.७४ अंश वक्र भागात डेक लॉन्चिंग करताना, डेक वक्र बीमच्या साहाय्याने लॉन्च करण्यात आला. कमानींची केबल स्टेडद्वारे उभारणी करताना, ‘पी४०’ आणि ‘पी५०’ पियरच्या टोकावर तात्पुरते पियर्स बसवले गेले. कमानी अडकविण्यासाठी केबल्स वापरण्यात आल्या. तापमानाच्या डेटावर आधारित पुलाची उभारणी सतत डिझायनरच्या देखरेखीखाली होती. पुलाची संरचना आणि भूमिती सातत्याने तपासली जात होती; जेणेकरून दोन अर्ध्या कमानी तंतोतंत जुळतील. फ्री फ्लो काँक्रीट आर्च बॉक्ससाठी, सेल्फ-कंपॅटिंग काँक्रीट वापरण्यात आले. तर, वेल्ड्सची चाचणी करण्यासाठी साईटवर नॅशनल अ‍ॅक्रिडिशन बोर्ड फॉर टेस्टिंग अ‍ॅण्ड कॅलिब्रेशन लॅबची स्थापन केली. यामुळे ६७० किमी लांब वेल्ड्सच्या गुणवत्तेची चाचणी जलद झाली.
 
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर तुमच्या भावना नेमक्या काय होत्या?
 
भारताच्या भूमीत जागतिक विक्रम मोडणारा प्रकल्प साकारणे, हा अनुभव अत्यंत भावनिक आणि विनम्र करणारा होता. मिळवलेल्या यशाच्या अभिमानाबरोबरच, या यशाचे वाटेकरी असलेल्या हजारो अभियंते, कामगार आणि सहकार्‍यांबद्दल मनापासून कृतज्ञतेची भावना होती. या टप्प्याने नव्या अपेक्षा निर्माण केल्या आणि पुढील पिढीसाठी नवे मापदंडही निश्चित केले. आज कोकण रेल्वे जागतिक नकाशावर कोणत्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा प्रकल्पासाठीचे विश्वासार्ह नाव ठरले आहे.
 
अभियांत्रिकी क्षेत्रातील भारताचे भविष्य तुम्ही कसे पाहता?
 
चिनाब रेल्वे पूल भारताच्या अभियांत्रिकी महत्त्वाकांक्षा आणि कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. कोकण रेल्वेसाठी हा प्रकल्प जटिल पायाभूत सुविधा उभारणीतील नेतृत्वाची खात्री देतो. भारतीय रेल्वेसाठी हा प्रकल्प दृष्टिकोन, चिकाटी आणि नवकल्पनाशक्तीची शक्ती दर्शवतो. राष्ट्रीय स्तरावर चिनाब रेल्वे पूल स्वावलंबन आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हा प्रकल्प दाखवतो की, भारत अत्यंत कठीण परिस्थितीतही जागतिक दर्जाचे प्रकल्प साकारू शकतो. भारत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भरतेच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि अभियांत्रिकी क्षेत्र त्याचा मजबूत आधार आहे.
 
देशातील युवा अभियंत्यांना तुम्ही कोणता संदेश द्याल?
 
मी तरुणांना सांगू इच्छितो की मोठी स्वप्ने पाहा, पण त्या स्वप्नांना शिस्त, टीमवर्क आणि सातत्यपूर्ण शिकण्याची जोड द्या. महाप्रकल्पांमधील यश हे केवळ तांत्रिक ज्ञानावर अवलंबून नसते; भावनिक स्थैर्य, प्रभावी संवादकौशल्य आणि प्रामाणिकता तितकीच आवश्यक असते. पायाभूत सुविधा म्हणजे केवळ काँक्रीट आणि स्टील नव्हे, तर राष्ट्रनिर्मितीचा पाया आहे. हाच विचार मनात ठेवून काम केल्यास, तुमचे योगदान देशासाठी अमूल्य ठरेल.
 
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.