गडचिरोली : (77th Republic Day) देशाचा ७७वा प्रजासत्ताक दिन गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. येथील पोलीस कवायत मैदानावर जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जैस्वाल यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने मानवंदना दिली, तर उपस्थित नागरिकांनी राष्ट्रगीताच्या सुरांत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. (77th Republic Day)
राष्ट्रध्वजवंदनानंतर उपस्थितांना संबोधित करताना सहपालकमंत्री आशिष जैस्वाल यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. भारतीय संविधानाने दिलेली मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही परंपरा जपण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त केला. संविधानाच्या मार्गावर चालत समाजाच्या सर्व घटकांना न्याय देणे हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. (77th Republic Day)
हेही वाचा : Dattatreya Hosabale: भारताच्या एकात्मतेची जपणूक आणि सीमांचे संरक्षण हेच आपले परम राष्ट्रीय कर्तव्य!
गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे नमूद करत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, वीज, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे सुरू असल्याची माहिती दिली. भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला आणि वैशिष्ट्यपूर्ण असा गडचिरोली जिल्हा अधिक निधीस पात्र असून, त्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (77th Republic Day)
मानव–वन्यजीव संघर्ष हा जिल्ह्यासमोरील गंभीर प्रश्न असून, त्यावर प्रभावी व शाश्वत उपाययोजना राबवण्यावर शासनाचा विशेष भर असल्याचे सहपालकमंत्र्यांनी सांगितले. (77th Republic Day)
या प्रजासत्ताक दिनानिमित्त कला, क्रीडा, पोलीस व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसेच विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकला. (77th Republic Day)