सेनापती-चंदाची जोडी जमली; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लवकरच पाळणा हलणार

    26-Jan-2026
Total Views |
senapati chanda tiger


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील एसटीआर टी-१ (सेनापती) हा नर वाघ आणि एसटीआर टी-४ (चंदा) या वाघिणीची जोडी जमली आहे (senapati chanda tiger). सध्या चांदोली राष्ट्रीय उद्यानात या जोडीच्या मिलन प्रक्रियेचे निरीक्षण वनकर्मचारी करत आहेत (senapati chanda tiger). चंदा ही वाघिणी नोव्हेंबर महिन्यात ताडाबोमधून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र स्थानांतरण प्रकल्पाअंतर्गत स्थानांतरित करण्यात आली होती (senapati chanda tiger). या जोडीच्या मिलनक्रियेमुळे व्याघ्र स्थानांतरण प्रकल्पाने यशाची पहिली पायरी गाठली आहे. (senapati chanda tiger)
 
 
ताडोबातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नोव्हेंबर, २०२५ मध्ये एसटीआर टी-४ म्हणेजच चंदा या वाघिणीला स्थानांतरित करण्यात आले होते. तिला नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर तिने चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या कोअर क्षेत्रात आपले बस्तान बसवले. याच भागात २०२३ पासून आपले हद्दक्षेत्र तयार केलेला सेनापती हा वाघ मादीचा शोधात होताच. चंदा आल्यावर त्याच्या या शोधमोहिमेला विराम मिळाला. चंदाला देखील नराच्या अस्तित्वाची जाणीव झाल्यावर तिने डिसेंबर महिन्याच्या अखेरीस आपल्या गंधखुणा सोडायला सुरुवात केली. अखेरीस जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या जोडीचे छायाचित्र टिपण्यात आले.
 
 
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एका मृत गव्यावर रात्री १० वाजून १३ मिनिटांनी चंदाची छबी कॅमेरा ट्रॅपमध्ये टिपली गेली. त्यानंतर पाऊण तासांनी म्हणजेच ११ वाजून ०२ मिनिटांनी तिथे सेनापती दिसला. त्याच छायाचित्रात सेनापतीच्या बरोबर मागे चंदा उभी ठाकलेली दिसली. तिच्या गळ्यात बसवलेल्या रेडिओ काॅलरचे जीपीएस लोकेशन देखील कॅमेरा ट्रॅप लावलेल्या ठिकाणीच मिळाले. तेव्हापासून चंदा आणि सेनापती जोडीने सह्याद्रीत फिरत असून त्यांनी आपल्या मिलन क्रियेला सुरुवात देखील आहे. नर आणि मादी वाघ आयुष्यभरात अनेक जोडीदार निवडू शकतात. त्यामुळे सेनापती चंदाबरोबरीनेच तारासोबतही मिलन करु शकतो.
 


सह्याद्रीत पाळणा हलणार
सध्या चांदोलीचे खोरे सध्या एसटीआर टी-१ (सेनापती) वाघ आणि एसटीआर टी-४ (चंदा) वाघिणीच्या प्रणयधारणेच्या आवाजांनी दुमदुमून गेले आहे. या दोघांची जोडी जमली असून त्यांच्या सोबत वावरामुळे सह्याद्रीमध्ये लवकरच वाघांची नैसर्गिक संख्या वृद्धिंगत होण्यास मदत होईल. - तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प