संगीत राजे शिवबा : इतिहासाचा सूर, अभिनयाची धार

25 Jan 2026 15:48:17
Theatre
 
नाटक म्हणजे केवळ संवाद म्हणणे किंवा रंगमंचावर उभे राहून अभिनय करणे, इतकेच मर्यादित नाही. नाटक ही एक सर्वसमावेशक, बहुआयामी आणि जिवंत कला आहे. अभिनयाबरोबरच त्यात नृत्य, संगीत, चित्रकला, नेपथ्य, प्रकाशयोजना यांचा त्यात समावेश होतो. त्याचबरोबर या सगळ्या घटकांना एकत्र बांधून ठेवणारी शिस्तदेखील त्यात आहे. नाटक माणसाला स्वतःला व्यक्त करण्याची संधी देते; पण त्याचबरोबर समोरच्याचे म्हणणे ऐकण्याची, भावना समजून घेण्याची आणि संघभावनेने काम करण्याचीही सवय लावते. रंगमंचावर प्रत्येक कलाकार महत्त्वाचाच असतो; इथे कुणीही एकटा मोठा नसतो. कुणी मागे राहून प्रकाश सांभाळतो, कुणी नेपथ्य हलवतो, कुणी ताल धरतो; पण सगळ्यांच्या प्रयत्नातूनच प्रयोग साकारतो. म्हणूनच नाटकामध्ये क्रीडावृत्ती, शिस्त, संयम, सहकार्य सहजपणे रुजते. इथे निव्वळ असतं ते सामूहिक यश.
 
आजच्या धावपळीच्या युगात जिथे प्रत्यक्ष संवाद कमी होत आहे, तिथे नाटक माणसाला पुन्हा माणसाशी जोडून ठेवणारी जिवंत कला ठरते. नाटक प्रेक्षकांसमोर इथे आणि आता घडत असतं, त्यामुळे त्याचा परिणाम थेट मनावर होतो. जेव्हा ही नाट्यकला संगीत आणि इतिहासाशी हातमिळवणी करते, तेव्हा तो अनुभव केवळ पाहण्याचा न राहता जगण्याचा होतो. असाच एक समृद्ध अनुभव पुण्यातील रसिकांनी दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात घेतला. ‘संगीत राजे शिवबा’ हा संगीत व अभिनयाचा कार्यक्रम केवळ एक नाट्यप्रयोग नव्हता, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवगाथेचा सुरेल, भावनिक आणि तेजस्वी आलेख होता. तब्बल ३० कलाकारांनी या प्रयोगात सहभाग घेत, दहा गीतांमधून ‘शिवचरित्र’ उलगडत नेले.
 
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय नाट्यपरंपरेनुसार झाली. दीपप्रज्वलनानंतर नांदी सादर झाली. भगवान नटराज आणि गणपती यांचे स्तवन करणारी ही नांदी संपूर्ण कार्यक्रमाला एक आध्यात्मिक आणि कलात्मक अधिष्ठान देणारी ठरली. नाट्य, नृत्य आणि संगीत या तिन्ही कलांचे आद्यदैवत नटराज आणि विघ्नहर्ता गणपती यांना वंदन केल्यावर कार्यक्रमाने आपला ठोस सूर धरला. यानंतर रंगमंचावर अवतरला वीररसातला ‘शत्रू परखते हुए’ हा गीतप्रयोग. ढोल-ताशांचा गजर, जोशपूर्ण चाल, नेत्रदीपक समूह अभिनय आणि ठाम अंगविक्षेप यातून पराक्रमाचा आविष्कार सादर झाला. प्रेक्षक क्षणार्धात इतिहासाच्या त्या काळात पोहोचले, जिथे स्वराज्याची स्वप्ने आकार घेत होती. हा भाग पुढील प्रत्येक प्रसंगासाठी प्रेक्षकांची मानसिक आणि भावनिक तयारी करून देणारा ठोस प्रारंभ ठरला.
 
त्यानंतर सादर झाले पाळणा गीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म, बारसं आणि नामकरण सोहळ्याचा प्रसंग या गीतातून अत्यंत हळुवारपणे उलगडण्यात आला. जिजाऊंचे वात्सल्य, शहाजीराजांचा अभिमान, घरातील आनंद आणि त्या बालकाच्या भविष्यकाळात दडलेला इतिहास असे सारेच शब्द, स्वर आणि अभिनयातून जिवंत झाले. या गीतात केवळ आनंद नव्हता, तर एका युगपुरुषाच्या आगमनाची ठाम चाहूलही होती. बाल शिवाजींच्या घडणीकडे नेणारा पुढचा टप्पा म्हणजे तालीम. लहान वयातच युद्धकला, व्यायाम, शिस्त, स्वराज्याची कल्पना आणि ध्येयवादी विचार यांची कशी पायाभरणी झाली, हे या गीतातून प्रभावीपणे मांडले गेले. तलवार, दांडपट्टा, धनुष्य-बाण, भाले, घोडेस्वारी यांची सुरेल गीतातून आणि नेमक्या अभिनयातून बालकलाकारांनी केलेली मांडणी ऐकताना प्रेक्षकांनाही स्फुरण चढल्यावाचून राहिले नाही.
 
यानंतर रंगमंचावर सादर झाले ‘राजे शिवबा’ हे शीर्षकगीत. या गीतात शिवाजी महाराजांचा राजा म्हणून, दूरदृष्टी असलेला ‘नेतृत्वकर्ता’ म्हणून आणि लोककल्याणाचा ध्यास घेतलेला ‘युगपुरुष’ म्हणून गौरव करण्यात आला. या गीतात अभिमान होता, कृतज्ञता होती आणि पुढील पिढीसाठी प्रेरणाही होती. हे गीत संपूर्ण कार्यक्रमाचा आत्मा ठरले. यानंतर एक निर्णायक क्षण रंगमंचावर आला, तो म्हणजे अफझलखान वधाची तयारी. या प्रसंगात पार्श्वसंगीत म्हणून सादर झालेले ‘शिव तांडव स्तोत्र’ अंगावर काटा आणणारे होते. शिवतांडव स्तोत्राच्या ऊर्जेने भरलेला हा भाग महाराजांच्या अंतर्मनातील शिवभक्ती, धैर्य, आत्मविश्वास आणि निर्णायक वृत्तीचे प्रतीक ठरला.
 
यानंतर वातावरणात एकदम बदल झाला आणि रंगमंचावर आली लावणी, लाल महालातील शाहिस्तेखान वरील हल्ल्यापूर्वीचा प्रसंग. या लावणीतून त्या काळातील सामाजिक वातावरण, गुप्त हालचाली, रणनीती आणि प्रसंगावधान सूचक पद्धतीने मांडले गेले. हलक्या-फुलक्या शैलीतूनही इतिहासाची मांडणी किती परिणामकारक असू शकते, याचा हा उत्तम नमुना होता. व्यापारीनगरीत घुमणारा पुढचा सूर म्हणजे सुरत लुटीचा तांडव गीतप्रयोग. वेगवान ताल, आक्रमक नृत्य आणि समूह अभिनयातून, महाराजांची धाडसी आर्थिकनीती प्रेक्षकांसमोर उभी राहिली. शिवाय, महाराजांच्या काळात धर्मावर किंवा प्रजेवर अन्याय झाल्यास शिवरायांच्या न्यायपद्धतीत कडक आणि समतोल दंड कसा दिला जायचा, याचीही ओळख या प्रसंगातून करून देण्यात आली.
 
कार्यक्रमातील सर्वांत भावनिक क्षण साकार झाला तो, ‘मत जाओ माँ’ या गीतातून. शहाजीराजांच्या निधनानंतर जिजाऊ शिवाजी महाराजांपासून दूर जाण्याचा क्षण! आई आणि पुत्र यांच्यातील संवाद, विरह, कर्तव्य आणि स्वराज्याची जबाबदारी अशा भावनांची झालेली दाटी, डोळ्याच्या कडा ओली करणारी ठरली. त्यानंतर शेवटी राज्याभिषेकाची आरती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणून झालेला राज्याभिषेक, स्वराज्याची अधिकृत घोषणा आणि हजारो स्वप्नांची पूर्तता यातून झाली. या आरतीने कार्यक्रमाचा भावपूर्ण समारोप झाला. संपूर्ण सभागृह भक्तीरस आणि अभिमानाने भारावून गेले.
 
या कार्यक्रमात गीत सादर करणार्‍या बालगायकांची संख्या आणि त्यांची गुणवत्ता उल्लेखनीय होती. सिद्धीषा जोशी, अनाहिता सोमण, सई महामुने, सानवी भोईटे, इरा जाधव, रेवा पोटभरे, वेदांत छाबडा, शिवराज घाटे, ओवी बडे, रुजवी देशपांडे, आराध्या दुरेपाटील, अरिन रूपडे, राजीव नवले, ऋषिका कस्तुरे, अन्वेषा सोनावणे, आद्यस्वामी, श्रावणी मते, अनन्या कामठेकर, श्राव्या उत्तुरे, आरोही बेडेकर, आभा गोवर्धन, विहान कनबरकर यांनी आपल्या गायनातून कार्यक्रम उंचीवर नेला. निरूपणाची जबाबदारी शाश्वत देवळे, इरा कौर सेखों, यश देशपांडे, समीर गुमास्ते, गुरुराज सामलेटी, गार्गी हिर्लेकर, विहान दारवेकर, अधिराज जाधव यांनी समर्थपणे सांभाळली. गीतलेखन महेंद्र वाघ आणि प्रा. प्रसन्न शेंबेकर यांचे असून, संगीत प्रशांत फासगे यांनी दिले. संगीतशिक्षक नीरज देशपांडे हे असून, विशेष मार्गदर्शन सौ. देवयानी पेंडसे यांच्याकडून लाभले.
 
‘संगीत राजे शिवबा’ हा कार्यक्रम इतिहास जगण्याचा अनुभव होता. संगीत, अभिनय आणि नाट्य यांच्या एकत्रीकरणातून शिवचरित्र नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा प्रयोग, नाटक जिवंत असून, काळाबरोबर पुढे जाण्यास तयार असल्याची साक्ष देणारा ठरला. अशा प्रयोगांमधूनच नाटक केवळ रंगमंचावर नाही, तर प्रेक्षकांच्या मनामनांत कायमस्वरूपी जिवंत राहतं. यापूर्वीही संगीत ‘सियावर रामचंद्र की जय’ हा एक आगळावेगळा संगीतप्रधान प्रयोग सादर करण्यात आला होता. या प्रयोगामध्ये दहा गाणी आहेत. प्रभू श्रीरामांची कथा आणि त्यांच्या जीवनप्रवासाचे विविध पैलू उलगडणारी भावपूर्ण गीते सादर करण्यात आली होती.
संगीत ‘सियावर रामचंद्र की जय’ आणि ‘राजे शिवबा’ या भव्य नाट्यप्रयोगांतील निवडक गीतांचा एकत्रित दोन तासांचा विशेष संगीत कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नाटकातील गाणी स्वतंत्र संगीत कार्यक्रमाच्या रूपात सादर होण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची आणखी एक विशेष बाब म्हणजे हा कार्यक्रम बालकलाकारांनी समर्थपणे साकारला असून, त्यांनी तो यशस्वी करून दाखवला आहे. त्यांच्या सादरीकरणातून प्रेक्षकांना नाट्य, संगीत आणि भावविश्वाचा एक अविस्मरणीय अनुभव मिळणार आहे.
 
- रानी राधिका देशपांडे
 
 
Powered By Sangraha 9.0