‘वन्दे मातरम्’ आणि ‘वेद’

25 Jan 2026 12:09:15

वेदकाळापासून भारतीय चिंतनात भूमी ही केवळ भौगोलिक संकल्पना नव्हे, तर ती जननी आहे. ती अन्न देते, आश्रय देते आणि संस्कारही घडवते. मातृभूमीची पूजा ही भावना नसून कर्तव्य आहे, हाच वेदांचा संदेश ‘वन्दे मातरम्’ गीतामध्ये आहे. दि २६ जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी, या वैदिक राष्ट्रभावनेला नवे आयाम लाभले. राष्ट्राच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने वेदांच्या या संदेशाचा घेतलेला मागोवा...

‘वन्दे मातरम्’ हा या राष्ट्राचा महामंत्र आहे. या राष्ट्राची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य ‘वन्दे मातरम्’ या महामंत्रात आहे. ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या लेखणीतून, ‘वन्दे मातरम्’ हे गीत १८७५ मध्ये अवतरले. यावर्षी या गीताला १५०वे वर्ष पूर्ण झाले असून, ‘वन्दे मातरम्’ गीताचे ‘सार्धशती वर्ष’ आपण साजरे करत आहोत. कोलकात्याजवळचे काटलपाडा हे छोटेसे खेडे. अश्विन शुद्ध नवमीचा तो शुभदिन. त्या दिवशी नवरात्रीचे घट बसले होते. महाराष्ट्रात भाद्रपदात गणेशोत्सव जसा घरोघरी साजरा होत असतो, तसाच बंगालमध्ये नवरात्रोत्सव होतो. नोकरीतून काही दिवसांसाठी रजा घेऊन, बंकिमचंद्र आपल्या काटलपाडा या जन्मगावी मातोश्री व बंधू यांना भेटण्यासाठी आणि नवरात्रीसाठी आले होते. त्यांचे घरी रोज ‘श्रीसूक्ता’चे पठण होत असे. बंकिमचंद्रांचेही पाठांतर उत्तम होते.

हे ‘श्रीसूक्ता’चे पठण ऐकतानाच, त्यांच्या डोळ्यांपुढे भारतमातेचा नकाशा उभा राहिला. त्यात सागरातील पाण्यावर लक्ष्मी उभी असल्यासारखी आहे, असे त्यांना जाणवले. हिमालय, काश्मीर भाल प्रदेश, गुजरात, मेवाड, ओडिशा ही तिची करकमले, महाराष्ट्र हा तिचा उरो-भाग, कर्नाटक हे पदकमले, केरळ (कन्याकुमारी) ही तिची तळपदकमळे असे तिचे रूप त्यांच्या प्रज्ञाचक्षूपुढे साकार झाल्याचे, ‘वन्दे मातरम्’चा सूक्ष्म अभ्यास करताना जाणवते. त्यावेळी पारतंत्र्यात खितपत पडलेली सहा कोटी मुले त्यांना सापडावीत, या आशयाने आणि त्यांच्या कविमनात ‘श्रीसूक्त’ आणि भारतमाता कल्पना शब्दचित्र रंगवू लागली. सिंधू-संस्कृती मातृप्रधान असल्याने, त्यात श्रीलक्ष्मीपूजन निर्माण झाले आणि कालांतराने ‘ऋग्वेदा’तील परिशिष्टात ‘श्रीसूक्त’ आले आणि त्याच आशयातून हे लेखन आहे.

‘श्री’ या नावामध्ये श्रीमंती, वैभव, वर्चस्व-शक्ती, आयुर्मान-गती, आरोग्य, शोधमान अर्थात, सौंदर्य, महियते म्हणजे परमोच्च स्थिती, धनसंपत्ती, पशू-प्राणी, बहुप्रसवता अर्थात वंशवृद्धी, अभयज्ञान, वैराग्य, शौर्य, विद्या, शांती, त्याग, दया, क्षमा, योग, दान, अहिंसा, सत्य अशा अनेक सद्गुणांचा समावेश आहे. ‘श्री’ म्हणजे हीच लक्ष्मीची वैशिष्ट्ये आहेत. नवरात्र हे लक्ष्मी (श्रीविष्णुपत्नी), महालक्ष्मी (पार्वती), चामुंडा-दुर्गा वगैरे आवेश अवतारी उमा, सरस्वती म्हणजे शारदा-विद्येची देवता, या तिन्हींच्या मंदिरात साजरे केले जाते. कोलकाता येथील कालीमातेने पायाखाली चिरडून जसा शत्रूनाश केला, तसा भारतवासीयांनी जुलमी ब्रिटिश सत्तेचा नाश करून भारतमाता स्वतंत्र करावी, हा ‘वन्दे मातरम्’मधील खरा भावार्थ. बंकिमचंद्रांनी ‘आमार दुर्गोत्सव’ या आपल्या लेखात ‘वन्दे मातरम्’ गीत प्रथम, ७ नोव्हेंबर १८७५ (कार्तिक शु.९ शके १७९७) मध्ये प्रसिद्ध केले. पुढे हेच गीत घराघरांत पोहोचले.

कितीतरी जण ‘वन्दे मातरम्’ म्हणत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी फासावर गेले. दि. २८ डिसेंबर १८९६ रोजी कोलकात्यास भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या १२व्या अधिवेशनात, रवींद्रनाथ टागोर यांनी स्वतः ‘देस’ रागामध्ये ‘संपूर्ण वन्दे मातरम्’ गीत गायले. पुढे या गीतावरे ब्रिटिशांनी बंदी घातली. देशप्रेमी जनतेने ती धुडकावून लावली. महात्मा गांधी यांनी ‘वन्दे मातरम्’बद्दल ‘हरिजन’मध्ये लिहिले की, "हे राष्ट्र जो पर्यन्त आहे, तोवर हे गीत राहाणारच!” ‘वन्दे मातरम्’ याला पुढे राष्ट्रगीताचा मान उत्स्फूर्ततेने लाभला आणि ‘वन्दे मातरम्’ची व्यापकताहहे वाढू लागली. हरिद्वार येथील ‘रणधीर’ प्रकाशनाच्या ‘बृहतस्तोत्र रत्नाकर’ या ग्रंथातील ‘भारतभूमातृस्तोत्रम’ या काव्याची सुरुवातच अशी आहे :

वन्दे मातरमव्यक्तां व्यक्तां च जननीं पराम् ॥
दीनोऽहं बालकः कांक्षे सेवां जन्मनि जन्मनि ॥१॥

हेच दोन शब्द घेऊन, तेच सूत्र ठेवून, ऋषी बंकिमचंद्र यांनी मातृभूमीप्रेमाचा एक अभूतपूर्व आविष्कार हजारो वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा एकदा भारतीय साहित्यात घडवला. ज्याचे परिणाम साहित्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात झाले. हे शब्द जाज्ज्वल्य मातृभूमीभक्तीचे प्रतीक बनले. कदाचित, यामुळेच प्राचीन काळी समाज घडवणार्‍या ऋषींची उपमा बंकिमचंद्रांना दिली गेली. बंगालमधील श्रेष्ठ दर्जाचे कायदेपंडित, उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि ‘कलकत्ता विद्यापीठा’चे व्हाईस चान्सलर असलेल्या गुरुदास बॅनर्जी यांनी ‘वंगभंग’विरोधी आंदोलनातील सभेमध्ये, सर्वात प्रथम बंकिमचंद्रांना ‘ऋषी बंकिम’ असे संबोधले. त्यानंतर श्रीअरविंदही बंकिमचंद्रांचा उल्लेख ‘ऋषी बंकिम’ असाच करू लागले.

ज्याप्रमाणे बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य’ ही पदवी जनमानसांतून मिळाली, तोच मान बंकिमचंद्रांना ‘ऋषी’ या उपाधीने मिळाला. गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर प्रत्येक सभेची सांगता ‘वन्दे मातरम्’ हे गीत गाऊन करीत होते. ‘वन्दे मातरम्’मधील ओळी या बिंब-प्रतिबिंब भावस्वरूपात ‘ऋग्वेदा’तील ‘श्रीसूक्त’ अर्थात, ‘ऋग्वेदा’च्या पाचव्या मंडळातील आहे, असे एकंदरीत वाटते. त्यात २५ सूक्ते अर्थात मंत्र आहेत. त्यातील आशय ‘वन्दे मातरम्’मध्ये ओतून, बंकिमचंद्रांनी खापरपणजोबांची (ऋषी) श्रीमंती आणखी समृद्ध केली आहे. ‘वन्दे मातरम्’ कडव्यांमधील भावार्थ असलेल्या बर्‍याच ऋचा ‘ऋग्वेदा’तील अग्नी, पृथ्वी, आकाश, वायू, आप, औषधी मंडळामध्येही आहेत.

‘श्रीसूक्ता’त पंचवीस ऋचा अर्थात मंत्र आहेत. त्यातील पहिले १४ मंत्र, लक्ष्मीचे नाममहात्म्यावर आहेत. १५-१६ क्रमांकाचे मंत्र ‘श्रीसूक्ता’चे विधानपर असून, १७ ते २५ हे मंत्र फलश्रुती व पसायदानपर आहेत. या २५ मंत्रांमध्ये विषय एकच असल्याने, वेगवेगळ्या संदर्भात पुनरुक्ती असणे स्वाभाविकच. शिवाय, हे मंत्र एकाच ऋषीने रचलेले नसून आनंद, कर्दम, चिलीत, इंदिरासुत वगैरे वेगवेगळ्या ऋषींनी रचलेले आहेत. त्यांचे नामोल्लेखही काही ऋचांमध्ये आहेत.

‘ऋग्वेद’ हा सुमारे दहा हजार वर्षांपूर्वी, मौखिक स्वरूपात जगात निर्माण झालेला पहिला ग्रंथ. ‘वेद’ हा प्रथम एकच होता. महर्षी व्यासांनी त्याचे ‘ऋग्वेद’, ‘यजुर्वेद’, ‘सामवेद’, ‘अथर्ववेद’ असे विभाजन सोयीसाठी केले. ‘ऋग्वेदा’त दहा मंडले असून, त्यातील सर्व मिळून सूक्तांची संख्या एक हजार, २८ आहे. या सूक्तांमधील ऋचा किंवा मंत्रांची संख्या दहा हजार, ५५२ आहे. त्यामध्ये ‘श्रीसूक्त’ हा खिल भाग (परिशिष्ट) आहे. ‘ब्राह्मण्यके’, ‘पुराणे’, ‘महाभारत’, ‘भगवद्गीता’ वगैरेवर ‘ऋग्वेदा’चा प्रभाव आहे. तर, संत नामदेव, ज्ञानदेव-निवृत्ती-सोपानदेव-मुक्ताई, एकनाथ-समर्थ रामदास, संत तुकाराम, मीराबाई वगैरे संतांच्या लेखनावरही ‘ऋग्वेदा’तील ऋचांचा प्रभाव आहे. सांगायला आनंद वाटतो की, ‘ज्ञानेश्वरी’ हा युगप्रवर्तक, तर ‘पसायदान’मधील प्रत्येक ओळीवर ‘ऋग्वेदा’तील निरनिराळ्या ऋचांचा भाव उमटलेला आहे. आज ‘वन्दे मातरम्’चा विचार केला, तर ते म्हणजे विश्वाचे राष्ट्रगीतच आहे.

ऋषी बंकिमचंद्रांवर संस्कृत वाङ्मयाचे संस्कार होते. ‘अथर्ववेदा’तील द्वादशमंडलातील ६३ ऋचा या ‘पृथ्वीसूक्ते’ म्हणून ओळखल्या जातात. वेद वाङ्मयातील ही सूक्ते प्राचीन भारताचे आद्यराष्ट्रगीत मानले जाते. बंकिमचंद्रांनी या सूक्तांचा निश्चितच अभ्यास केला असावा. ‘वन्दे मातरम्’ची काही बीजे या सूक्तांमध्ये दिसतात. असे असले, तरीही ‘वन्दे मातरम्’ हे या सूक्तांचे भाषांतर नव्हे. या सूक्तांच्या आणि इतर काही प्राचीन वाङ्मयाच्या वाचनानंतर, बंकिमचंद्रांच्या चिंतनशील वृत्तीतून ‘वन्दे मातरम्’ लिहिले गेले. ‘अथर्ववेदा’तील या ऋचांमध्ये पृथ्वीला ‘माता’ संबोधले असून, त्यात पृथ्वीमातेला गुलाम करण्यासाठी चालून येणार्‍या शत्रूला नष्ट करण्याचे आवाहनही आहे. अखेरच्या ६३व्या सूक्तात हे मातृभूमी मंगलकारक होऊन, तू आम्हास सुप्रतिष्ठित आणि ज्ञानी बनव, हे ज्ञात्या, आम्हाला संपन्न आणि ऐश्वर्ययुक्त बनव, अशी प्रार्थनाही केली आहे. मुळात बंगाली भाषेत असलेल्या ‘वन्दे मातरम्’ या गीताचा, योगी अरविंद यांनी इंग्रजीमध्ये गद्य-अनुवाद केला. त्याचा हा त्यांच्याच ‘भवानी भारतमाता’मधील मराठी अनुवाद : 

हे माते मी तुला वंदन करत आहे.
जलसमृद्ध आणि धनधान्य असणार्‍या हे माते,
दक्षिण वार्‍यामुळे तू शीतलतनू झाली आहेस,
सुगीच्या पिकांनी घनगर्द झालेल्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
चंद्रप्रकाशाच्या वैभवामध्ये तुझ्या रात्री न्हाऊन निघाल्या आहेत,
विविध फुलांनी बहरलेले वृक्षरूपी सुंदर वस्त्र
तुझ्या भूमीने परिधान केले आहे,
तुझे हास्य मंजुळ असून, तुझी वाणी मधुर आहे
परमानंदप्रदायिनी, वरदायिनी असणार्‍या हे माते
मी तुला वंदन करत आहे.

सप्तकोटी मुखांमधून उठणार्‍या गर्जनांनी
आणि सप्त कोटी प्रजाजनांच्या
दोन्ही हातांमध्ये उगारलेल्या शस्त्रामुळे
तू रुद्रभीषण दिसत आहेस, तेव्हा हे माते
तू दुर्बल आहेस असे म्हणण्याचे धारिष्ट्य कोण बरे करेल?
अपरिमित शक्ती धारण करणार्‍या रक्षणकर्त्या मातेसमोर,
आणि शत्रूंच्या पलटणी पळवून लावणार्‍या मातेसमोर, मी नतमस्तक आहे.
हे माते मी तुला वंदन करत आहे.

तूच ध्यान आहेस आणि तूच आमचा स्वधर्म आहेस
तूच आमच्या हृदयामध्ये निवास करते आहेस,
तूच आमचा आत्मा आहेस आणि
आमच्या देहामधील प्राणही तूच आहेस,
आमच्या बाहुंमधील शक्ती-सामर्थ्य तूच आहेस,
आमच्या हृदयामधील प्रेम आणि श्रद्धादेखील तूच आहेस.
आम्ही सर्व मंदिरामध्ये तुझ्याच मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करतो.
कारण तू युद्धशस्त्रे धारण केलेली दशभुजा दुर्गा आहेस,
आणि कमलपुष्पांमध्ये विहरणारी सौंदर्यदेवतादेखील तूच आहेस.
परावाणीरूप असणार्‍या, वेदप्रदायिनी देवते,
मी तुलाच वंदन करत आहे.

हे ऐश्वर्यदेवते,
विशुद्ध व अनुपम जलप्रवाहांनी आणि
फळाफुलांनी समृद्ध असणार्‍या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
श्यामलवर्णी, ऋजुस्वभावी,
सुहास्यवदन असणार्‍या,
आभूषण परिधान केलेल्या, शृंगाराने विनटलेल्या,
वैभवधारिणी हे माते,वैविध्यसंपन्न हे माते,
मी तुला वंदन करत आहे.

‘वन्दे मातरम्’मध्ये ही सगळी वर्णने थोडक्यात; परंतु रूपकात्मक पद्धतीने येतात. ऋषी बंकिमचंद्रांनी या काव्यात विविध रसांचा उपयोग, सहजपणे केलेला दिसतो. पहिल्या कडव्यात आणि शेवटच्या दोन ओळीत शांतरस आहे. ‘कोटि कोटि कंठ’ या कडव्यात वीररस आहे. ‘अबला के नमा’मध्ये रौद्ररस आहे. ‘तुम्ही विद्या तुम्ही धर्म’ या कडव्यात कमालीचा भक्तीरस असून, पुन्हा शेवटच्या कडव्यात वीर, शांत आणि भक्ती हे तीनही रस आहेत. या सर्वांपेक्षा माता आणि राष्ट्र यांचा संबंध थेट ‘मातृभूमी’ असा लावून, ऋषी बंकिमचंद्रांनी या काव्याचे नाते थेट वेदकाळाशी जोडले.

‘मातृभूमीपूजन’ या ‘अथर्ववेदा’तील संकल्पनेला बंकिमचंद्रांनी, ‘वन्दे मातरम्’च्या माध्यमातून पुनरुज्जीवित केले. बंकिमचंद्रांच्या अंतिम काळात जरी लोकांना त्याचे महत्त्व कळले नसले, तरी त्यांच्या निधनानंतर ११ वर्षांनी हे शब्द संपूर्ण भारतात उच्चस्वरात निनादले जाऊ लागले. ऋषी बंकिमचंद्रांनाही कदाचित आपल्या शब्दांचा परिणाम एवढा दीर्घकालीन होईल, अशी अपेक्षा नसेलही परंतु, या शब्दांचे सामर्थ्य ते जाणून होते. त्यांनी भाकीत करून ठेवले होते की, ’हे शब्द भारतीय काही काळानंतर डोक्यावर घेऊन नाचतील.’ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ‘वन्दे मातरम्’ या शब्दांनी निर्माण केलेला उत्साह, देशभक्तीची भावना मोठा स्वातंत्र्यलढा संपल्यानंतरच्या काळातही कायम राहिली. आज दीडशे वर्षे होऊनसुद्धा तोच भाव भारतीयांच्या मनात कायमस्वरूपी आहे. वन्दे मातरम्!

- सर्वेश फडणवीस


Powered By Sangraha 9.0