मनमंदिराची क्षणचित्रे...

    25-Jan-2026   
Total Views |
The Reflection of Mind
 
मुंबईतील वरळीच्या नेहरू आर्ट सेंटरमध्ये दि. २० ते २६ जानेवारी या काळात ‘द रिफल्केशन ऑफ माईंड’ या आगळ्यावेगळ्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पश्चिम बंगालचे सिद्धहस्त चित्रकार जोयदेव बाला, सुब्रता घोष, राजीब सूर रॉय यांनी आपल्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रांमध्ये, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे आपल्याला दर्शन घडते. इथे कलेचा विचार हा कुठल्याही चौकटींमध्ये बंदिस्त नसून, मनाच्या प्रवाहाप्रमाणेच उन्मुक्त असल्याचे दर्शन घडते. अशा या उन्मुक्त चित्रांच्या आशयाचा आणि विषयाचा घेतलेला मागोवा..
 
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा!
स्वप्नांतिल पदर धुयाचा हातास कसा लागावा?
- सुधीर मोघे
 
जीवनाचा सर्वस्पर्शी अनुभव ज्या अवयवातून मानवाला अवगत होतो, तो अदृश्य अवयव म्हणजे मन. हे मन नेमकं काय आहे? का आहे? कसं आहे? याचा उलगडा, अद्यापही अनेकांना झालेला नाही. या मनावर नियंत्रण कसं मिळवायचं? एखाद्या व्यक्तीच्या मनाचा ठाव कसा घ्यायचा? अशा असंख्य प्रश्नांनी झगडणार्‍या माणसाला, मनाच वेध घेता आलेला नाही. परंतु, असं असूनही मन मानवी जीवनप्रवासातील एकमेव शाश्वत गोष्ट आहे. काहींच्या मते, मन हे जगातील सर्वात शक्तिशाली यंत्र आहे. एकाच वेळेला या मनात हजारो-लाखो विचार ठाण मांडून बसतात. अग्नी आणि चाकाचा शोध लावणार्‍या माणसानेच, आज कृत्रिम बुद्धिमत्तेचीही निर्मिती केली. मानवी मनातील संवेदनांमुळेच आज प्रगतीची शिखरं आपण गाठू शकलो आहोत. अशा या मनाचा अतिविशाल पट कॅनव्हासवर चितारायचा म्हणजे, त्यालादेखील संवेदनशीलतेची प्रखरता आवश्यकच. जोयदेव बाला, सुब्रता घोश आणि राजीब सूर रॉय या चित्रकारांच्या ठायी ही संवेदनशीलतेची प्रखरता तर आहेच मात्र, त्याचबरोबर त्यांच्या चित्रांमधून सनातन संस्कृती, वेदान्ताचे विचारामृत सातत्याने वाहते.
 
राजीब सूर रॉय यांच्या चित्रांमध्ये आपल्याला, पिवळ्या गर्दछायेत अवतरणारे मनाचे प्रतिबिंब दिसून येते. या चित्रांमध्ये मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांचे अत्यंत सक्षमपणे चित्रण केले आहे. सनातन संस्कृतीमध्ये अनेक देवी-देवतांना आपण पूजतो मात्र, त्यातही ज्याची मोहिनी आपल्या मनातून तसूभरही कमी होत नाही, असा एकमेव योगेश्वर म्हणजे श्रीकृष्ण. ‘महाभारता’मध्ये कुरुक्षेत्रावर युद्धाच्या वेळी अर्जुनाचं मन विचलित झाल्यावर, श्रीकृष्णाने त्याला ‘गीता’ सांगितली. हीच ‘भगवद्गीता’ मानवी मनासाठी सर्वोत्तम बोधवचन ठरली. हातात सुदर्शनचक्र घेऊन युद्धसमयी पांडवांच्या सोबत उभे राहणार्‍या या मधुसूदनाच्या हातात बासरीसुद्धा आहे. त्यामुळे जगाचा स्वामी हा केवळ कलासक्त नसून कलाकारसुद्धा आहे, याचीच प्रचिती आपल्याला येते. श्रीकृष्ण म्हटलं की, समर्पण करणारी राधासुद्धा आपल्याला आठवते. चित्रांच्या रूपाने ज्यावेळेस या दोन्हींचा संगम आपल्यासमोर येतो, त्यावेळेला मनाच्या एका वेगळ्याच अवस्थेचे दर्शन आपल्याला घडतं. या चित्रांचे वैशिष्ट्य असं की, कॅनव्हासवरती आपल्याला रंगांची एक मुक्त उधळण अनुभवायला मिळते. स्वतःला मोकळं सोडणं किंवा कशात तरी झोकून देणं, हे उत्कट आणि पराक्रमाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे आपल्या मनातील मोकळेपणाला साद घालणं, म्हणजेच राधा होणं आहे का? हासुद्धा विचार चित्रकार अत्यंत खुबीने मांडतो. यातील प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला ’राधाचुरा’ आणि ’कृष्णचुरा’ या फुलांच्या वेलींचे यथार्थ दर्शन घडते.
 
माणसाच्या मनाची अवस्था, बर्‍याचदा त्याच्या चेहर्‍यावर प्रकटते. भावनांच्या लपवाछपवीचा खेळ फारकाळ तो खेळू शकत नाही. मनाचा निर्मळपणा, स्थिरता हे सगळेच भाव, चित्रांमधील विविध चेहर्‍यांवर आपल्याला दिसतात. ज्याप्रकारे राधाकृष्णाच्या चित्रांमधून मन ही संकल्पना आपल्यासमोर आली आहे, अगदी त्याचप्रकारे बुद्धांची प्रतिमा भासावी, असे चित्रसुद्धा एक इथे आहे. एका बाजूला संसारातील चेहरे आणि या चेहर्‍यांकडे निरखून बघणारे बुद्ध, असा आशय अत्यंत सक्षमपणे चित्रकाराने मांडला आहे.
 
जोयदेव बाला यांच्या त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे, इथे आपल्याला केवळ एका स्त्रीचे दर्शन घडते. परंतु, त्या स्त्रीप्रतिमेच्या अनंत छटा आपल्याला अनुभवायला मिळतात. त्यांच्या चित्रांमध्ये प्रत्येक चेहर्‍यावर एक विभागणारी उभी रेष आहे. एका माणसाची दोन मनं त्याचं जीवन नियंत्रित करीत असतात, वेळोवेळी त्याला कोड्यात टाकत असतात, हा विचार अत्यंत सूक्ष्म; परंतु प्रभावी पद्धतीने या चित्रांमधून मांडण्यात आला आहे. सुब्रता घोष यांची चित्रंदेखील संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा आपल्यासमोर मांडतात. त्यांच्या प्रत्येक चित्रामध्ये आदिशक्ती असो वा श्रीगणेशांचे डोळे मिटलेले आहेत. यासंबंधित सांगताना ते म्हणतात की ज्यावेळी आपले डोळे मिटलेले असतात; अर्थात, ज्यावेळेला आपण अंतर्मुख होतो, त्याचवेळेला खर्‍या अर्थाने मनातील विचार प्रक्रिया सुरू होते.
 
या तीनही चित्रकारांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या परिसराशी एकनिष्ठ राहून त्यांनी आपली कलाकृती चितारली आहे. आधुनिक काळातील चित्रशैलीचा यावर प्रभाव जरी असला, तरी त्यातून संस्कृतीच्या अनंत छटा त्यांनी रेखाटण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. काळाच्या ओघामध्ये माध्यमं बदलतात मात्र, रंग-रेषांसोबत माणसांचं नातं तसंच राहत असल्याचा विचार त्यांनी मांडला. या सृष्टीची निर्मिती करणार्‍या भगवंताचं आणि माणसाचं नातं नेमकं काय; माणसाच्या मनाच्या गाभार्‍यात क्षणोक्षणी जे प्रतिबिंब उमटतं, ते कशामुळे या आणि अशा असंख्य गोष्टींचा, या चित्रप्रवासामध्ये घेतलेला शोध कौतुकास्पद असून, नव्या अनुभूतीचं दर्शन घडवणाराही आहे.
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.