जीवश्च-कंठश्च घनिष्ठ मित्र गमावल्याचे दुःख

    25-Jan-2026
Total Views |

भारतीय जनता पक्ष, मुंबईचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री राज पुरोहित यांचे नुकतेच निधन झाले. राज पुरोहित यांचे घनिष्ठ मित्र माजी आमदार अतुल शाह यांनी, त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा...

मी आणि राज पुरोहित एकाच वयाचे, आमच्यात फारसा फरक नव्हता. फारतर दीड वर्षाचा फरक असेल. कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी तो मुंबईत सरकारी वसतिगृहात राहात होता. ‘आणीबाणी’च्या काळात, कुलाब्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत आमची भेट झाली. आमची त्यावेळी झालेली मैत्री, तब्बल ४४ वर्षांपेक्षा जास्त काळ घट्ट राहिली. क्वचितच असा दिवस असेल, जेव्हा आमचे फोनवर बोलणे होत नसे; नाहीतर रोज बोलणे ठरलेले. मला गाणी लिहायला आवडायची. त्यावर राज मला म्हणायचा, ‘अरे तू माझ्यावर कधी गाणे लिहिणार?’ राज पुरोहितला परदेश-प्रवासाची फार आवड. मी त्याच्यासोबत अमेरिकेला गेलो होतो आणि तब्बल एक महिना तिथे राहिलोही होतो. न्यूयॉर्क ते कॅलिफोर्निया असा आम्ही प्रवास केला. तिथे ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ आणि ‘अमेरिकन असोसिएशन ऑफ इंडियन्स’ अशा संस्थांशी आमचा संपर्क आला. राजने त्यात इतकी रुची घेतली की, तो त्यांचा सल्लागार झाला. आम्ही लंडन आणि श्रीलंकेला देखील एकत्र गेलो होतो. राजला विविध गोष्टी शिकण्याची खूपच आवड होती. त्याचा स्वभाव हसतमुख अन् प्रेमळ असल्याने, तो चटकन कुणालाही आपलेसे करी.

चौपाटीवर ‘आदर्श रामलीला समिती’चे कार्य अनेक वर्षे चालले. स्वरूपचंद गोयल हे त्याचे संस्थापक-सदस्य होते. दहा दिवस तो कार्यक्रम दरवर्षी चाले. तसेच ‘ब्रीज मंडळ’ आयोजित कृष्णलीला पण चालायची. या दोन्ही कार्यक्रमांत आम्ही सक्रिय सहभाग घेत असू. राज त्या समितीसाठी मन लावून काम करायचा. एकवर्षी चौपाटीवर कोणताच कार्यक्रम घ्यायचा नाही, असे ‘हेरिटेज कमिटी’ने ठरविले. या निर्णयाविरोधात आम्ही राज पुरोहितच्या नेतृत्वात, चौपाटीवर उपोषणही केले होते. आम्ही त्यावेळी सरकारला सांगितले की, रामलीला, कृष्णलीला या धार्मिक परंपरा आहेत आणि या उपोषणानंतर, ते कार्यक्रम पुन्हा सुरू देखील झाले. राज पुरोहित हा गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचा निस्सीम चाहता. दक्षिण मुंबईमध्ये मी आणि राज पक्षकामासाठी कायम उपलब्ध असे कार्यकर्ते होतो. त्यामुळे नेत्यांमध्ये आमची भेट वाढली होतीच, शिवाय जवळीकसुद्धा निर्माण झाली होती.

मुंबईमध्ये राजचे गुरू स्वरूपचंद गोयल हे होते. काळबादेवीला एक छोटेसे कार्यालय होते, तिथे जयवंतीबेन मेहता, स्वरूपचंद गोयल, विनोद गांधी, विनोद गुप्ता हे सगळेच जमायचे. मी आणि राजने दक्षिण मुंबईत भाजपचे काम सुरू केले. नंतर १९९९ साली मी, राज पुरोहित आणि मंगल प्रभात लोढा आमदार होतो आणि खासदारकीला जयवंतीबेन मेहता निवडून आल्या. यापूर्वी, त्या हरल्या होत्या. दक्षिण मुंबईची उमेदवारी जेव्हा जयवंतीबेन मेहता यांना मिळाली, तेव्हा मी आणि राज पुरोहित यांनी मरीन लाईन्सवर स्वतःच्या हाताने चुना आणि ब्रशने ‘व्होट फॉर बीजेपी’, ‘व्होट फॉर जयवंतीबेन मेहता’ असे लिहिले होते. यामुळे निवडणूक वातावरणात आम्ही पुढे गेलो. खिशात जास्त पैसे नव्हते; पण उत्साह खूप होता. नानूबाई पटेल यांच्यानंतर, पहिली आमदारकीची निवडणूक राज पुरोहित याने लढवली आणि नंतर त्याने मागे पाहिलेच नाही. सलग पाचवेळा तो आमदार म्हणून निवडून आला. नागपूरच्या अधिवेशनासाठी राज जी खोली नागपूरमध्ये वापरत होता, ती एकच खोली त्याने दर अधिवेशनकाळात कायम ठेवली होती. त्या खोलीचे आणि राजचे भावनिक नाते निर्माण झाले होते. इतका साधेपणा त्याने जपला होता.

मुंबईत एकेकाळी १९ हजार, ५०० मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न खूप मोठा आणि बिकट होता. यासाठी राजने ‘भाडेकरू एकता संघटना’ सुरू केली.पुनर्विकासाचा प्रश्न समजून घेऊन, राजने ‘३३ बाय ७’चा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. ज्यात विकासकांना इन्सेंटिव्ह आणि जुन्या भाडेकरूंना चांगले घर असा प्रस्ताव ठरला. या निर्णयामध्ये राजचा सिंहाचा वाटा होता. राज एवढा कल्पक होता की, या सगळ्या इमारतीत लोक राहायला येतील, कारण दक्षिण मुंबईमध्ये घर घेतले की, समुद्र लगेच दिसतो, असे त्याचे म्हणणे होते आणि ते खरेही ठरले. ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ आणि ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्टील मर्चंट्स’, ’कापड बाजार’ अशा अनेक संस्था आणि अनेक व्यापार्‍यांशी त्यांचे चांगले संबंध होते. कारण त्यांच्या अडचणी सोडवण्यास तो पुढाकार घ्यायचा. त्यामुळे त्याची लोकप्रियताही व्यापार्‍यांमध्येही वाढली होती.

मुंबईचे पक्ष कार्यालय असो की, प्रदेश कार्यालय राज कार्यकर्त्यांची अल्पोपाहाराची सोय आवडीने आणि आवर्जून करायचा.अंधेरी, चेंबूर, मुलुंड, बोरिवलीवरून येणारा कार्यकर्ता काहीतरी खाऊन गेला पाहिजे, कारण खूप लांबून येऊन तो पक्षकार्य करीत असतो असा विचार तो बोलूनही दाखवायचा. एवढ्या लहान-मोठ्याबाबींकडे तो स्वत: लक्ष देई. राज पुरोहित हा राजस्थानचा होता. त्यामुळे राजस्थानमध्ये निवडणूक लागली की, भारतीय जनता पक्षाचे नेते त्याला राजस्थानमध्ये प्रचारासाठी बोलवायचे. गुजरात, गोवा याठिकाणीसुद्धा राज पुरोहितने, निवडणुकीत पक्षकाम केले आहे. राजस्थानमध्ये वसुंधराराजे सिंधिया यांच्यासोबत आणि गोव्यात मनोहर पर्रिकर यांच्यासोबत राजने काम केले आहे. गुजरातमधील सुरत याठिकाणी पूर्णेश मोदी हे तत्कालीन अध्यक्ष होते. त्यांच्यासोबतसुद्धा राजने काम केले आहे. तिथे दर निवडणुकीत त्याला बोलावले जाई आणि तो मन लावून पक्षकाम देखील करत असे.

एकदा विधानसभेदरम्यान ‘एलबीटी’ (लोकल बॉडी टॅस)विरोधात त्याचे भाषण गाजले होते. याबाबत त्याने खूप प्रयत्न केले अन् तो कर कसा अन्यायकारक आहे, हे निदर्शनास आणले. नंतर सरकार आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘एलबीटी’ हटवला. असा हा माझा जीवश्च-कंठश्च मित्र हा व्यापारी वर्गातील अडचणी, गरीब लोकांच्या अडचणी, भाडेकरूंचे प्रश्न यासाठी लढा देण्यास कायम पुढे असायचा. कार्यकर्त्यांसोबत प्रेमाने राहा म्हणणार्‍या राज पुरोहितमध्ये, नेतृत्वाचे अन् मैत्रीचे सगळे गुण होते.

- अतुल शाह