महाराष्ट्रात नुकताच माघी गणेशोत्सव साजरा झाला. श्रीगणेश हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. त्यामुळे गणेश पूजनाला महत्व येथे फार. प्रथम पूजेचा मान असल्याने, गणेशाचे पूजन सनातन हिंदू धर्मातही सर्वच ठिकाणी होते. मात्र गणेशाचे नेमके स्वरूप ब्रम्हांडाच्या पातळीवर काय? हे समजून घेणेही आवश्यक आहे. गणेशाच्या या स्वरुपाचा घेतलेला आढावा....
माघी गणेश जयंतीचा शुभ मुहूर्त म्हणजे केवळ एका दैवताचा जन्मोत्सव नव्हे, तर वेदकाळापासून चालत आलेल्या आणि वैदिक ऋषींनी मांडलेल्या एका महान विश्वात्मक तत्त्वाचा हा जागर आहे. नुकत्याच झालेल्या माघी उत्सवाच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्रात गणरायाचा जयघोष निनादला. एरव्ही आपण या आराध्य दैवताकडे केवळ संकटांचे निवारण करणारा विघ्नहर्ता किंवा मनोकामना पूर्ण करणारा सुखकर्ता म्हणून पाहतो. तथापि, श्रद्धेच्या या परीघापलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा गणेश हे केवळ पूजनीय रूप राहात नाही, तर ते विश्वाच्या उत्पत्तीचे आणि संचालनाचे एक वैज्ञानिक तत्त्व म्हणून सामोरे येते.
या नावाचा अर्थ उलगडताना भृशुंडी ऋषींच्या तेजोवर्धन स्तोत्राचा आधार घेतल्यास, एक विलक्षण विचार समोर येतो. त्यांच्या मते गणेश हे नाव केवळ नामवाचक नसून ती एक वैश्विक व्याख्या आहे. यातील ‘ग’कार हा मायेचा, म्हणजेच आपल्याला भुरळ घालणार्या सिद्धीचा निदर्शक आहे, तर ‘ण’कार हा त्या मायेचे स्वरूप जाणणार्या आणि धारण करणार्या बुद्धीचा निदर्शक आहे. सामान्य माणूस या मायेत अडकतो, पण जो या सिद्धी (ग) आणि बुद्धी (ण) या परस्परविरोधी शक्तींचा स्वामी आहे, ज्याचे या दोन्हींवर अबाधित नियंत्रण आहे, तोच खरा गणेश. याच प्राचीन चिंतनाला नंदिनी साने यांनी आपल्या ‘आदिपूज्य गणराज ब्रह्मणस्पती’ या ग्रंथात, आधुनिक विज्ञानाची, विशेषतः गणिताची जोड दिली आहे. त्या सांगतात की, गणितातील ‘संच सिद्धांता’नुसार (set theory) जसे समान गुणधर्म असलेल्या घटकांचे संच असतात, तसेच हे ब्रह्मांड विविध गणांनी भरलेले आहे. हे गण अणू-रेणूंचे असतील किंवा विशाल आकाशगंगांचे; या प्रत्येक गणाचा एक चालक असतो. या अशा अनंत गणांचा जो सर्वोच्च अधिपती आहे, तोच गणपती. गणितात अनंत (infinity) या संकल्पनेला जे अनन्यसाधारण महत्त्व आहे, तेच स्थान अध्यात्मात या आद्य गणपतीला आहे. ज्याप्रमाणे अनंत ही संकल्पना सर्व संख्यांना सामावून घेऊनही त्यांच्यापलीकडे असते; तसेच हे गणेश तत्त्व सर्व चराचरांत भरूनही त्याहून वेगळे, म्हणजेच विराट पुरुष स्वरूपात आहे.
भारतीय तत्त्वज्ञानात या संकल्पनेचा उगम विश्वनिर्मितीच्या सिद्धांतात सापडतो. कामेश्वर शिव हे निर्गुण ब्रह्म आणि ललिता देवी हे सगुण ब्रह्म; जेव्हा हे शांत शिवतत्त्व आणि क्रियाशील शक्तितत्त्व एकत्र येते; तेव्हा त्या मिलनातून विश्वातील पहिला ध्वनी उमटतो. तो ध्वनी म्हणजेच अनाहत नाद किंवा ‘ॐ’कार होय. म्हणूनच ‘ॐ’काराला शिव-शक्तीचा पुत्र मानले जाते. गंमत पाहा, हा ध्वनिरूप ‘ॐ’ जेव्हा आपण कागदावर लिहितो किंवा त्याला आकार देतो, तेव्हा त्याचे स्वरूप गणपतीच्या गजमुखासारखे, सोंड वळवलेल्या हत्तीसारखे दिसते. याच कारणामुळे गणपतीला साक्षात ‘शब्दब्रह्म’ किंवा ‘नादब्रह्म’ म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, भंडासुराने टाकलेले जयविघ्न यंत्र हे केवळ एक अस्त्र नसून, ते आपल्या देहाचे रूपक आहे. आपले शरीर आणि मन हे पंचमहाभूते, प्राण, इंद्रिये, इच्छा, कर्म आणि अज्ञान अशा मिळून बनलेल्या पुर्यष्टकात अडकलेले असते. एकूण २७ गुणांचा हा मानवी पसारा आहे. सामान्य माणूस या २७ गुणांच्या चक्रातच अडकून पडतो, ज्यामुळे त्याला त्यापलीकडे असलेल्या २८व्या शिवतत्त्वाची किंवा आत्मज्ञानाची ओळख होत नाही. हे २७ गुणांचे विघ्न दूर करून जीवाला २८व्या पायरीवर, अर्थात मोक्षाकडे नेण्याचे कार्य गणेश तत्त्व करते. म्हणूनच महागणेशाचा मूळमंत्र हा २८ शब्दांचा आहे, जो साधकाला देहबुद्धीच्या मर्यादा ओलांडून शिवतत्त्वाशी एकरूप करतो.
अध्यात्माच्या या सिद्धांताला जेव्हा आधुनिक विज्ञानाची पुष्टी मिळते; तेव्हा मात्र आपण थक्क होतो. ‘ॐ’ अक्षराच्या रचनेचे वैज्ञानिक विश्लेषण केल्यास, तीन आश्चर्यकारक साम्यस्थळे आढळतात, जी मानवी उत्क्रांतीचा आणि विश्वाच्या पसार्याचा आलेख मांडतात. ‘ॐ’ काढताना आपण जी पहिली वक्राकार रेष (उ-कार) काढतो, तिचा आकार मानवी पेशींमधील ‘डीएनए’च्या (double helix structure) वेटोळ्यांसारखा दिसतो. जीवशास्त्राच्या दृष्टीने ’डीएनए’ हा जीवसृष्टीचा मूळ नकाशा आहे. ज्ञात विश्वात मानव हा प्रगत जीव असल्याने, हा उ-कार केवळ शाईची रेष नसून ते मानवाच्या भौतिक अस्तित्वाचे आणि जडणघडणीचे प्रतीक आहे. मांडुय उपनिषदात यालाच जागृती अवस्था म्हटले आहे, जी स्थूल शरीराशी निगडित आहे.
या उकाराला जोडून जी रेष पुढे सरकते, ती भौतिकशास्त्रातील ऊर्जेचे वहन करणार्या ‘साईन वेव्ह’सारखी भासते. विज्ञानाचा नियम आहे की, विश्वातील कोणतीही ऊर्जा-मग तो ध्वनी असो, प्रकाश असो किंवा विद्युत लहरी-ती नेहमी लहरींच्या माध्यमातूनच प्रवास करते. ‘ॐ’मधील ही रेष जडशरीरात सळसळणार्या प्राणशक्तीचे आणि विश्वाला व्यापून उरलेल्या चेतनेचे दर्शक आहे. हेच ते सूक्ष्म शरीर, जिथे स्थूलतेचा लोप होऊन ऊर्जेचा संचार सुरू होतो. पण, खरी मेख तर पुढेच आहे आणि ती म्हणजे या आकृतीच्या माथ्यावर असलेला बिंदू! आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर हा ’सिंग्युलॅरिटी’चा किंवा अणुपेक्षाही सूक्ष्म कणाचा (sub-automic particle) बिंदू आहे, जिथे काळ आणि अवकाश (time and space) यांचे नियम संपतात आणि केवळ शुद्ध अस्तित्व उरते. ‘डीएनए’सारख्या जडत्वापासून सुरू झालेला हा प्रवास, लहरींच्या माध्यमातून, अतिसूक्ष्म अशा बिंदूपर्यंत पोहोचणे, हेच गणेश तत्त्वाचे सार आहे.
आता मूळ प्रश्न हा उरतो की, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या, वेगाच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वावरणार्या तरुणाईने, या गणेशाला केवळ परंपरा मानून का म्हणून जपावे? तर त्याचे उत्तर श्रद्धेत कमी आणि विज्ञानात जास्त आहे. आजच्या पिढीला प्रत्येक गोष्टीसाठी तर्क हवा असतो आणि गणेश हेच त्या तर्काचे, शुद्ध बुद्धीचे सर्वोच्च रूप आहे. आपण आज ज्या डेटाच्या-माहितीच्या महापुरात जगत आहोत, तो डेटा म्हणजेही विविध प्रकारचे गण आहेत. या माहितीच्या गोंधळातून नेमके ज्ञान वेचून काढण्यासाठी जी विवेकबुद्धी लागते, ती म्हणजेच गणपती! आपल्या डीएनएमध्ये मानवी क्षमतांच्या ज्या मर्यादा आहेत, त्या तोडून आपली चेतना (consciousness) वैश्विक ऊर्जेशी जोडण्याचे तंत्रज्ञान म्हणजे गणेश उपासना. जेव्हा आपण या तत्त्वाला वंदन करतो, तेव्हा आपण एखाद्या दगडी मूर्तीला नाही, तर स्वतःच्याच मेंदूच्या आणि जाणिवेच्या प्रगत क्षमतेलाच साद घालत असतो. मेंदूच्या डाव्या भागातील तार्किक क्षमता आणि उजव्या भागातील भावनिक जाणीव यांच्यात सुसंवाद निर्माण करणारे हे तत्त्व आहे मात्र, केवळ कोरड्या तर्काने आयुष्य रूक्ष होते आणि केवळ भावनेने ते दिशाहीन ठरू शकते; या दोन्हींचा सुवर्णमध्य साधत जगण्याला विवेकाचे (wisdom) अधिष्ठान प्राप्त करून देणे, हेच या तत्त्वाचे मुख्य कार्य आहे. म्हणूनच, केवळ कर्मकांडात अडकून न पडता, श्रद्धेला विज्ञानाचे डोळस अधिष्ठान देऊन आपल्या अंतरातील त्या विराट पुरुषाशी अनुसंधान साधणे, हीच या बुद्धिदात्याची खरी उपासना आणि माघी गणेश जयंतीचे खरे औचित्य ठरेल.
॥ॐ गं गणपतये नमः॥
- आसावरी पाटणकर