
महाराष्ट्राने देशाला इतिहास अभ्यासकांच्या रूपाने जे रत्न दिले, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ रा. श्री. मोरवंचीकर. त्यांचे निधन म्हणजे इतिहासप्रेमी, अभ्यासकांच्या मनाला चटका लावणारीच बाब. पैठणनगरीच्या संशोधनापासून ते जलसंस्कृतीच्या अभ्यासपर्यंत त्यांनी केलेले कार्य, पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे यामध्ये शंकाच नाही. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा घेतलेला आढावा...
महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ रा. श्री. मोरवंचीकर यांचे निधन दि. १७ जानेवारी रोजी, छत्रपती संभाजीनगर येथे झाले. गेला काहीकाळ त्यांची प्रकृती खालवलेली असल्याने, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. सातवाहन राजवंश, महाराष्ट्राच्या इतिहासात पैठणचे स्थान, महाराष्ट्रातील जलसंस्कृती आणि भक्ती संप्रदाय अशा विविध विषयांवर मोरवंचीकर यांचे योगदान महत्त्वपूर्ण असेच. दि. ६ डिसेंबर १९३७ रोजी त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली या गावात झाला. मोरवंचीकरांनी आपले इतिहास विषयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण, पुणे येथे पूर्ण केले. पुढे ते पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि कालांतराने छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, इतिहासाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत झाले. त्यांच्या नावावर १६ पुस्तके, २००हून अधिक शोधनिबंध आहेत. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना ‘पीएचडी’साठी मार्गदर्शनही केले. पैठण येथील बाळासाहेब पाटील आणि तेर येथील रामलिंगाप्पा लामतुरे यांच्याशी त्यांचे मैत्री होते. पुढे त्या-त्या ठिकाणच्या इतिहास संग्रहालयाच्या जडणघडणीतही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ‘paithan through ages’ हा त्यांच्या ‘पीएचडी’चा विषय. याच विषयाला धरून त्यांची दोन पुस्तके आणि ‘भारत इतिहास संकलन समिती’साठी संपादकीय अंक आणि अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. सन १९९४-९६ मध्ये पैठण येथील उत्खननातील त्यांचा सहभाग, त्यांच्या संशोधन कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला.
परंपरेने पैठणला ‘दक्षिण काशी’ म्हणून संबोधतात. सातवाहन नावाचा कोणी एक राजा पैठणला कुंभारवाड्यात आईसोबत राहत होता. त्याची मातीच्या मूर्तीची सेना होती. उज्जैनच्या राजाची स्वारी झाल्यावर त्याने आपली मातीची सेना जिवंत करून राजाला हरवले.पुढे तोच पैठणचा राजा आणि कुळाचा मूळपुरुष झाला, अशी रम्य कथा आजही पैठणला सांगितली जाते. याच प्रतिष्ठान नगरी म्हणजे पैठणहून, ऐतिहासिक सातवाहनांची सुमारे चार शतकांची राजवट भारताला लाभली. पुढे ‘वाकाटक’ काळ ते ‘राष्ट्रकूट’ काळातसुद्धा, पैठण एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून कायम होते. ‘यादव’ काळात त्याचे धार्मिक महत्त्व आणखी वाढले आणि ‘दक्षिण काशी’ म्हणून पैठण नावारुपाला आले. याचसोबत पैठणचे धर्मपीठ उदयाला आले. पुढे चक्रधरस्वामी आणि संत ज्ञानेश्वर यांच्या संबंधित धर्मसभा किंवा शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी मूळचे पैठणचे गागाभट्ट यांना पाचारण करणे, याला असे विस्तृत धार्मिक अधिष्ठान आहे. सोबत एकनाथ आणि इतर संतांचे कार्य पैठणला झाले आहेच. पुरातत्वीय उत्खननाने पैठण परिसर आणि एकंदरीत गोदावरी नदीच्या वरच्या खोर्याचे ऐतिहासिकत्व अधिकच विस्तृत झाले.
उत्तरेहून दक्षिणेकडे जाणार्या दक्षिणापथाचा केंद्रबिंदू पैठण हाच होता. याच मार्गावर अजिंठा, पितळखोरा, नाणेघाट, तेर अशी अनेक ऐतिहासिक स्थळे उदयाला आली. अनेक धर्म-पंथ परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या काशी, उज्जैन, अयोध्या सारख्या मोजक्या क्षेत्रांत पैठणचे स्थान आहे, हे विशेष. अशाप्रमाणे प्राक ते आधुनिक काळात पैठण हे भारतातील महत्त्वाचे धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्र होते, ते कसे हे त्यांनी आपल्या लिखाणातून मांडले. पैठण येथेच ‘पैठणी’ नावाच्या महावस्त्राचा उगमसुद्धा झाला. पैठणीची वीण, धागे, विविध आकृतिबंध अशी अनेक अंगेसुद्धा त्यांनी आपल्या लिखाणातून लोकांसमोर आणली.
सच्चं भण गोदावरि | पुव्वसमुद्देण साविया संति |
साताहण कुलसरिसं, जति ते कुले कुहं अत्थि |
उत्तरतो हिमवंती, दाहिणतो, सालिवाहणोराया |
समभार भरक्कंता तेण न पल्हत्थर पुहवी ॥
पूर्व समुद्राची शपथ घेऊन हे गोदावरी खरे सांग की, तुझ्या काठी सातवाहन कुलासारखे दुसरे घराणे आहे काय? (अर्थात नाही) (कारण सातवाहन घराणे इतके मोठे आहे की,) पृथ्वीचा समतोल उत्तरेला हिमालय व दक्षिणेला ‘सातवाहन’ असल्यामुळे साधला आहे व त्यामुळेच ती स्थिर आहे, असे गौरवपूर्ण उद्गार असलेल्या सातवाहन राजवटीवर, त्यांनी ‘सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या नावाचे पुस्तक लिहिले. इंग्रजांच्या काळात इतिहासाची पुनर्मांडणी सुरू झाली, तेव्हा सातवाहनांचे सुरुवातीला काही शिलालेख आणि पुराणातील उल्लेख असाच पुरावा आपल्या हाती उपलब्ध होता. त्यानुसार, सातवाहन हे दक्षिण भारतातील, महाराष्ट्र आणि कदाचित आंध्रातील एक राजवट असल्याचा निष्कर्ष समोर आला. पुढे पैठण आणि दक्षिण भारतातील इतर ठिकाणी उत्खनन होत गेले, तसे सातवाहन राजवटीचे विविध पैलू समोर आले.
बौद्ध स्थापत्याच्या कला आणि काळसंगतीच्या शास्त्रीय रीतीसुद्धा विकसित होत गेल्या. त्यामुळे सातवाहन कालखंडातील बृहत महाराष्ट्रातील लेण्यांची, स्तूपांची निश्चिती होत गेली. त्यात मुंबईजवळचे कान्हेरी ते कार्ले-भाजे, पिताळखोरा ते विदर्भातील पौनी आणि आजच्या तेलंगणमधील नागर्जूनकोंडा इ. असा मोठा भूभाग सातवाहनांच्या कालखंडातील आहे, हे लक्षात येत गेले. ‘शुंग सातवाहन’ काळ हा बौद्ध आणि इतर पंथीय लयन-स्थापत्याचा भरभराटीचा काळ होता, हेसुद्धा स्पष्ट झाले. सोबतच त्यांची कलाशैली आपले वैशिष्ट्य धरून होती आणि भारतीय कलापरंपरेला फक्त एकाच सुवर्णकाळाचे बंधन नव्हते हे सांगणारी पण होती, हे अधोरेखित झाले. लेणी आणि मृण मूर्तीमधून सातवाहन काळातील कला समृद्ध आहे, हे लक्षात आले. तेर आणि भोकरदन येथील स्त्रीप्रतिमा आणि रोमन साम्राज्यातील पोम्पेई येतील स्त्रीप्रतिमा, हा आपल्या जागतिक व्यापार आणि कला-वैशिष्ट्ये दोन्हींचा सुंदर-सुबक पुरावा आहे. याचसोबत नाणेसंचयसुद्धा गवसत होते. या सगळ्याची संगती लागून ‘सातवाहन’ सुमारे ४०० वर्षे नांदलेला आणि गोदाकाठचा ‘इतिहास-तपस्वी’ विस्तृत भूभागावर राज्य असलेला राजवंश होता, हे स्पष्ट झाले.
त्या काळातील भारताच्या जागतिक व्यापाराचा केंद्रबिंदू पैठण होते. पश्चिम किनार्यावर विविध बंदरांतून रोमन साम्राज्याशी भारताचा व्यापार होत होता आणि याच व्यापारीमार्गावर, विविध बौद्ध लेणीसुद्धा निर्माण केली गेली. भारतात सापडलेली रोमन नाणी, मद्यकुंभ, विविध देवमूर्ती, तसेच ‘नाणक शास्त्रीय’ आणि ‘पेरिपल्स’ सारखे ग्रांथिक पुरावे याची साक्ष देतात. आजच्या जागतिकीकरणाच्या प्रवाहासारखाच हा इतिहासातील समांतर प्रवाह होता. ‘सातवाहन’ काळ हा सुबत्ता, स्थैर्य आणि भरभराटीचा काळ होता. तसेच ‘सातवाहन’ काळातील धर्मपरंपरा आणि अनेक धर्मांना त्यांचा असलेला राजाश्रय, हे त्याचे वैशिष्ट्य होते. त्याचसोबत ‘गौतमीपुत्र’ किंवा ‘वाशिष्ठीपुत्र’ असे मातानाम लावणारे राजे आणि नाणेघाट येथे स्वतः सोबत आपला पिता महारठी त्र्यणकयीर याच्या अभिलेखित मूर्ती घडवणारी राणी नागणिका, हे त्याकाळच्या सामाजिक स्थितीकडे आपले लक्ष वेधते. ‘गाथासप्तशती’सारखे ‘सातवाहन’ काळात घडणारे ग्रंथ हे प्राकृत भाषेतील मौलिक साहित्यिक ठेवा तर आहेतच; पण त्यातून दिसणारे आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जग कसे होते, याचा दस्तावेजसुद्धा आहे. गाथेतून, त्यांतून दिसणारे मुक्त आचरण प्राचीन भारतीय व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्त्रीसक्षमता याबद्दल आपले समज विस्तारते. त्यामुळे ‘सातवाहन’ फक्त महाराष्ट्रातील एक राजवट म्हणून मर्यादित नसून, भारताच्या इतिहासावर प्रभाव असलेली महत्त्वाची राजवट होती, असे प्रतिपादन त्यांच्या लिखाणातून त्यांनी केले.
आजचा मराठवाडा हा कायम दुष्काळी प्रदेश नव्हता, हे ऐतिहासिक आणि पुरातत्वीय संशोधनातून समोर आलेले आहेच. महाराष्ट्रातील विशेषतः मध्य महाराष्ट्रातील जलव्यवस्थापन हा केंद्रबिंदू धरून त्यांनी भरपूर लिखाण केले. ‘सातवाहन’ काळात पनीयपोढी आणि न्हानपोढी दान दिल्याचे शिलालेख आहेत.सोबत पाणी वहन आणि संचय करण्याचे त्याचे विकसित स्थापत्य होते, ते आजही आपल्याला बघता येते. अशा विविध अंगांचा अभ्यास करून त्या काळातले जलव्यवस्थापन कसे प्रगत होते, हे त्यांनी दाखवून दिले. सोबतच देवगिरी किल्ल्यावर मध्ययुगीन काळातील जल-स्थापत्य याचे वैशिष्ट्यसुद्धा त्यांनी खुलवून सांगितले. इथेच न थांबता न्या. चपळगावकर यांना सोबत घेऊन, ‘महाराष्ट्र जल परिषद’ याची स्थापनासुद्धा त्यांनी केली. देश-विदेशातील अनेक व्यासपीठे, परिषद यात त्यांनी पाण्याबद्दल आपली भूमिका मांडली. वर्तमानातील जल-समस्या हा त्यांचा जिव्हाळाचा विषय होता.
आध्यात्मिक विचार आणि लिखाण हासुद्धा मोरवंचीकरांचा लिखाणाचा अजून एक पैलू होता. वारकरी भक्त संप्रदायातील विविध ग्रंथ, संत आणि त्यांच्या योगदानावर त्यांनी विविध माध्यमांतून विपुल लिखाण केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील इतिहासतज्ज्ञांची एक पिढी उभी राहिली आहे. त्यात डॉक्टर हेबाळकर, डॉक्टर अरुणचंद्र पाठक अशी प्रसिद्ध नावे तर आहेतच; पण सोबत लोणारसारख्या दुर्लक्षित ऐतिहासिक स्थळावरची ‘पीएचडी’सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली, हे विशेष.
- सचिन दीक्षित