मुंबई : (Marathi Language) "येणाऱ्या काळात आत्मघातकी संकुचित अस्मिता आणि अर्थशरण जागतिकता यांच्यापासून मराठी भाषेला धोका आहे. त्याचसोबत राजभाषेच्या ओझ्याखाली बोलीभाषा दबल्या जाऊ नये" असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य विभाग व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केले. "अभिजात मराठी भाषा: इतिहास, वर्तमान आणि भविष्य" या विषयावर ते बोलत होते. यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले की " मराठीमध्ये एकूण २१६ बोली भाषा आहेत. या बोलीभाषांचे स्वतःचे असे एक व्याकरण आहे , शब्दकोश आहे यावर काम करायचे आहे ज्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.
दि. २४ जानेवारी रोजी, सांस्कृतिक कार्य विभाग, पुलं देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित महाराष्ट्र राज्य उत्सव अंतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी गुंफले. यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना त्यांनी मराठी भाषेच्या अभिजात होण्याकडचा प्रवास उलगडून सांगितला. केंद्र सरकारच्या "भाषिणी ॲप" बद्दलच्या अभिनव प्रयोगाची माहिती त्यांनी लोकांना दिली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या एक वर्षानंतर अमरावती येथे अशा अभिजात भाषांचा पाहिल्यांदाच घडलेला परिसंवाद याची त्यांनी माहिती दिली. यावेळी भाषा व्यवहारावर भाष्य करताना ते म्हणाले की प्रमाणभाषा हे बोलीभाषेचेच आपत्य आहे. आपली भाषा म्हणजे आपली येणाऱ्या काळातील सॉफ्ट पॉवर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असे सुद्धा ते म्हणाले.