संदेसे आते हैं...! भावनिक खोलीचा ‘बॉर्डर २’ ( Film review )

25 Jan 2026 16:00:00
Border 2
 
१९९७ साली ‘बॉर्डर’ चित्रपटाने मोठाच इतिहास रचला होता. आजही या चित्रपटाची गाणी चाहत्यांची ओठी दिसतात. या पार्श्वभूमीवरच ‘बॉर्डर २’ हा चित्रपट दि. २३ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वरुण धवन, सनी देओल, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी अशा कलाकारांचा मोठा फौजफाटा चित्रपटात असून, या चित्रपटाच्या ट्रेलरचीसुद्धा बरीच चर्चा सिनेजगतात रंगली होती. तेव्हा आता चित्रपट नेमका कसा आहे? आणि पहिल्या बॉर्डरच्या तुलनेत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो का? याचा घेतलेला आढावा...
 
१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित बर्‍याच चित्रपटांची निर्मिती, मागील काही वर्षांत भारतीय चित्रपटसृष्टीत होत आहे. त्यातीलच एक म्हणजे ‘बॉर्डर २’. भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराच्या असीम शौर्याचे यथार्थ दर्शन या चित्रपटातून घडते. निर्मलजित सिंग सेखों (दिलजीत दोसांझ), मेजर होशियार सिंग दहिया (वरुण धवन) आणि लेफ्टनंट कमांडर महेंद्र एस. रावत (अहान शेट्टी) हे जिवलग मित्र जे भूदल, नौदल आणि वायुदल अशा तीन वेगवेगळ्या दलांमध्ये कार्यरत असतात. सन १९६१ साली ‘नॅशनल वॉर अ‍ॅकेडमी’मध्ये भेट झाल्यापासून, तिघांमधील मैत्री अधिकाधिक परिपक्व होत जाते. पुढे सेखोंच्या लग्नानिमित्त हे तिघेही पुन्हा एकत्र येतात खरे मात्र, हा आनंदाचा क्षण फारकाळ टिकत नाही. कारण, लग्नाच्या आनंदात असतानाच, सीमारेषेवरील परिस्थिती गंभीर झाल्याची बातमी येते. त्यामुळे तिघांनाही तत्काळ कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश मिळतात. या तिघांचे माजी प्रशिक्षक लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग कालेर (सनी देओल) यांच्यावर, पश्चिम सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी येते.
 
बहुतांश सैन्यदल पूर्व पाकिस्तानकडे रवाना झाल्यामुळे, पश्चिम सीमेवर मर्यादित संख्येने भारतीय सैन्य तैनात असते. याच संधीचा फायदा घेत पाकिस्तानी सैन्य राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधून घुसखोरी करण्याच्या तयारीत असते. या बिकट परिस्थितीत भारतीय जवान कसे तोंड देतात, कोणत्या रणनीती आखतात याचं थरारक चित्रण म्हणजेच ‘बॉर्डर २’.
चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केले आहे. पहिल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाला डोळ्यासमोर ठेवूनच हा चित्रपट बनवला असल्याने, भावना आणि देशभक्ती यांचा सुंदर मिलाप यावेळीसुद्धा त्यात अनुभवता येतो. प्रेक्षकांना भावनिकदृष्ट्या गुंतवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आले असून, नकळत प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडासुद्धा चित्रपटातील काही दृश्ये पाहून पाणावतात. पूर्वार्धात चित्रपटाची पकड अगदी मजबूत दिसून येते. खरा अडथळा चित्रपटाच्या दुसर्‍या टप्प्यात पाहायला मिळतो, म्हणजेच युद्धप्रसंग सुरू झाल्यानंतर जाणवू लागतो.
 
हे प्रसंग अपेक्षित तीव्रता आणि नैसर्गिक अ‍ॅशन सीन्स निर्माण करण्यात अपयशी ठरतात. मोठ्या पडद्यावर ते कृत्रिम वाटल्याने, त्यांचा अपेक्षित प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर पडताना दिसत नाही. दिलजीत दोसांझ यांच्यावर आधारित हवाई युद्धप्रसंग आणि अहान शेट्टीची पाण्यातील साहसी दृष्ये, ‘व्हीएफएस’चा दर्जा न सांभाळल्यामुळे अत्यंत कृत्रिम भासतात. विशेष म्हणजे प्रगत तंत्रज्ञान नसतानाही, पहिल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात युद्धप्रसंग विलक्षण प्रभावी होते. त्याउलट, पुरेसं तंत्रज्ञान असतानाही ‘बॉर्डर २’ याबाबतीत मोठ्या प्रमाणावर कमी पडतो. युद्धप्रसंग हे ‘बॉर्डर फ्रॅन्चायझी’चा गाभा असल्यामुळे, या दुसर्‍या भागात तो अजिबातच प्रभावी वाटत नाही. चित्रपटातील संवादसुद्धा प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवण्याइतके प्रभावी झालेले नाहीत. अगदीच मोजके एक-दोन संवाद याला अपवाद ठरतील. उदा. एका दृष्यामध्ये सनी देओल पाकिस्तानच्या एका अधिकार्‍याला फोनवर म्हणतो, "तुम्हारे पाकिस्तान में इतने लोग नहीं, जितने हमारे यहां ईद पर बकरे कटते हैं!” चित्रपटाचा उत्तरार्धही अनावश्यकपणे लांबवण्यात आला असून, त्यामुळे चित्रपटाचे कथानक रेंगाळल्याचा भास होतो.
 
चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग, अशी मातब्बरांची मोठीच फौज आहे. बाकी कलाकारांचे अभिनय सर्वसाधारण असले, तरीही अहान शेट्टीला अजून बरीच मेहनत घेण्याची नितांत गरज आहे. पहिल्या ‘बॉर्डर’मध्ये सुनील शेट्टीने निभावलेली उत्कृष्ट भूमिकेसमोर, अहानची भूमिका उठावदार ठरत नाही. इतकंच नाही, तर अनेक महत्त्वाच्या दृष्यांमध्येही अहानचा अभिनय फारच प्रभावहीन भासतो. चित्रपटातील गाण्यांविषयी बोलायचे, तर जुन्याच गाण्यांचा रिमेक यामध्ये पाहायला मिळतो. यामध्येही अजून मेहनत करण्याची गरज चटकन लक्षात येते.
 
एकूणच पाहता, ‘बॉर्डर २’ हा चित्रपट मूळ ‘बॉर्डर’च्या प्रभावाशी बरोबरी करण्यात अपयशी ठरतो. पण, भारतीय रसिकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात मात्र कमालीचा यशस्वी ठरताना दिसतो. सनी देओल आणि वरुण धवन यांनी दमदार अभिनय करत, संपूर्ण चित्रपट मोठ्या प्रमाणात स्वतःच्या खांद्यावर पेलला आहे. चित्रपटातील सर्वात मोठी कमतरता म्हणजे युद्धप्रसंग. ते आताच्या ‘एआय’च्या युगात आणखी प्रभावी नक्कीच होऊ शकले असते. तसेच उत्तरार्धात भावनिक खोलीचा अभावही स्पष्टपणे जाणवतो. जरी चित्रपटाला ‘बॉर्डर’ या मजबूत ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’मुळे सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी मोठ्या यशाच्या दृष्टीने त्याची वाटचाल मर्यादित राहण्याचीच शक्यता अधिक आहे. पण, ‘बॉर्डर २’ हा पूर्णपणे फॅमिली पॅकेज सिनेमा असल्याने, सहकुटुंब-सहपरिवार या जोडून आलेल्या सुट्ट्यांमध्ये तुम्हाला पाहता येईल.
 
दिग्दर्शक : अनुराग सिंग
 
कलाकार : सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी, सोनम बाजवा, मोना सिंग आणि इतर
 
निर्माते : भूषण कुमार, कृष्ण कुमार, जे.पी. दत्ता, निधी दत्ता
 
संगीत दिग्दर्शक : अनु मलिक, मिथुन, विशाल मिश्रा, सचेत-परंपरा, गुरमोह
 
रेटिंग : ३ स्टार
- अपर्णा कड
 
 
 
Powered By Sangraha 9.0