AI-proof careers : एआयमुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार : अच्युत गोडबोले
25-Jan-2026
Total Views |
मुंबई : (AI-proof careers) "येणाऱ्या काळात एआयमुळे आपल्या जीवनात असे परिवर्तन येणार आहे त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे अनेकांच्या नोकऱ्या जातील मात्र त्याचबरोबर अशी अनेक क्षेत्र आहेत जिथे यामुळे नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. या बदलाला आपण सामोरं गेलं पाहिजे." असे प्रतिपादन विचारवंत लेखक अच्युत गोडबोले यांनी व्यक्त केले. " एआय तंत्रज्ञान आणि कला विश्व " यावर ते बोलत होते. यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना ते म्हणाले की " एआयची कार्यप्रणाली जर आपण लक्षात घेतली नाही , तर आपण मागे पडू. त्यामुळे मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ते आता जे करतायेत त्यांनी ते करत रहावे मात्र त्याच बरोबर वेगवेगळे क्षेत्रांचा सुद्धा धांडोळा घ्यावा. आज एकाबाजूला आपण या तंत्रज्ञानाचा उपभोग घेतोय. मात्र दुसऱ्या बाजूला असे अनेक लोक आहेत ज्यांना पाणी वीज सुद्धा मिळत नाही त्यांच्या उत्कर्षाकरता आपण तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा."
दि. २२ जानेवारी रोजी, सांस्कृतिक कार्य विभाग, पुलं देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आयोजित महाराष्ट्र राज्य उत्सव अंतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पुलं देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक मीनल जोगळेकर, प्रख्यात नृत्यांगना सोनिया परचुरे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पुलं देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक मीनल जोगळेकर म्हणाल्या की महाराष्ट्राला व्याख्यानांची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र मागच्या काही काळात ही परंपरा जरा मागे पडली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन उपक्रम आम्ही सुरू केला. समाजामध्ये वैचारिक घुसळन व्हावी, विचारांची देवाण-घेवाण व्हावी हा यामागचा हेतू. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की " गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून, सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणणारा उत्सव आहे. सर्व भाषिक सर्व प्रांतीय तथा सर्व स्तरावरील लोक एकत्र येऊन यामध्ये सहभागी होतात. केवळ महाराष्ट्र आणि भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार अनेक देशांमध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. म्हणूनच, मान्यतेची एक मोहर उमटावी म्हणून सरकारने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. आपला हा उत्सव सामाजिक एकतेचा विचार मांडणारा उत्सव आहे. "