आपल्याकडे मासळी बाजार म्हटला की, डोळ्यांसमोर उभे राहते ते अस्वच्छता, उग्र वास आणि शक्य तितक्या लवकर त्या जागेपासून दूर जावेसे वाटेल, असेच काहीसे वातावरण. मात्र, जगात अशीही उदाहरणे आहेत, जिथे शासनाची दूरदृष्टी, योग्य धोरणे आणि आधुनिक नियोजन यांच्या जोरावर मासळी बाजार हा केवळ व्यापाराचा केंद्रबिंदू न राहता, जागतिक पर्यटनाचे आकर्षण ठरला आहे. ऑस्ट्रेलियातील नवीन सिडनी फिश मार्केट हे त्याचे जिवंत उदाहरण.
सिडनी हार्बरच्या निळ्याशार पाण्यावर उभारलेला हा भव्य प्रकल्प दि. १९ जानेवारी रोजी अधिकृतपणे खुला झाला आणि उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल ४० हजार नागरिक व पर्यटकांनी येथे भेट दिली. सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकारलेला हा प्रकल्प ऑस्ट्रेलियाच्या समुद्री खाद्य उद्योगासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरला असून, त्याला अधिकृतपणे ‘जगातील सर्वोत्तम मासळी बाजार’ असे गौरवान्वित करण्यात आले आहे. ही केवळ वास्तूची यशोगाथा नाही, तर शासनाच्या धोरणात्मक नियोजनाची आणि सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या यशाची ठळक साक्ष आहे.
न्यू साऊथ वेल्स सरकारने शहर विकास, पर्यटन, रोजगारनिर्मिती आणि शाश्वत पर्यावरण या चारही बाबी एकत्रितपणे डोळ्यांसमोर ठेवून हा प्रकल्प राबवला. सिडनी ऑपेरा हाऊस आणि सिडनी हार्बर ब्रिजनंतर सिडनी हार्बरवरील तिसरा महत्त्वाचा ‘लॅण्डमार्क’ म्हणून या मासळी बाजाराने आपली ओळख निर्माण केली आहे. समुद्राच्या लाटांवर तरंगत असल्याचा भास देणारी ही वास्तू आज सिडनीच्या जागतिक प्रतिमेला अधिक भक्कम करत आहे. ‘डॅनिश आर्किटेक्चरल स्टुडिओ ३एसएन’, ‘बीव्हीएन आर्किटेक्चर’ आणि ‘आस्पेट स्टुडिओज’ यांनी साकारलेली ही रचना माशांच्या खवल्यांपासून प्रेरित भव्य छतामुळे जागतिक आर्किटेक्चर क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली. सुमारे २०० मीटर लांबीचे ‘फ्लोटिंग रूफ’, त्यावर बसवलेले ४०० सोलर पॅनेल्स, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक डिझाईन यामुळे हा प्रकल्प शाश्वत शहरी विकासाचे आदर्श उदाहरण बनतो. शासनाने पर्यावरणपूरक बांधकामाला प्राधान्य देण्याचे धोरण इथे प्रभावीपणे राबवले आहे.
२६ हजार चौ. मीटर क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या या नव्या फिश मार्केटमध्ये मासळीची खरेदी-विक्री हा फक्त एक भाग. ‘लाईव्ह फिश ऑक्शन’, थेट ‘क्रस्टेशियन टँक्स’, दररोज ५० हजार किलो बर्फनिर्मिती करणारी अत्याधुनिक यंत्रणा, सिडनी सी-फूड स्कूलमधील प्रशिक्षण व्यवस्था, तसेच साध्या टेक-अवेपासून ते आलिशान वॉटरफ्रंट रेस्टॉरंट्सपर्यंतचा अनुभव येथे मिळतो. १९ होलसेल विक्रेते आणि ४०हून अधिक रिटेल व फूड ऑपरेटर्समुळे हे ठिकाण आज एक सजीव आर्थिक केंद्र बनले आहे.
१९६६ मध्ये उभारलेला जुना मासळी बाजार दरवर्षी सुमारे ३० लाख पर्यटकांना आकर्षित करायचा. नव्या मासळी बाजारामुळे ही संख्या थेट ६० लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पर्यटन, रोजगार, स्थानिक व्यवसाय, गुंतवणूक आणि महसूलवाढ यांना मोठी चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पामुळे हजारो छोट्या कुटुंबीय मासेमार व्यवसायांना थेट फायदा होत आहे, हे शासनाच्या समावेशक विकास धोरणाचे मोठे यश आहे.
जुन्या बाजाराच्या परिसरात सार्वजनिक मोकळी जागा, हरित क्षेत्र, नवीन घरे आणि लांब किनारी पदपथ विकसित करण्यात येत असून, शहर नियोजनात नागरिकांच्या जीवनमानाला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नवीन सिडनी फिश मार्केट हा केवळ एक प्रकल्प न राहता, संपूर्ण शहर विकासाचे प्रभावी मॉडेल ठरत आहे. आज नवीन सिडनी फिश मार्केट म्हणजे समुद्र, संस्कृती, आधुनिक तंत्रज्ञान, रोजगारनिर्मिती आणि सक्षम शासकीय धोरणांचा संगम आहे. हे केवळ ऑस्ट्रेलियासाठी नाही, तर जगभरातील शहरांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. जिथे सार्वजनिक धोरणे योग्य दिशेने राबवली, तर असा मासळी बाजारही जागतिक ‘आयकॉन’ बनू शकतो.