KRK खानने गोळीबारानंतर पोलीसांना दिलं चक्रावरणारं स्पष्टीकरण

24 Jan 2026 20:03:39


मुंबई : नेहमीच वादग्रस्त विधानं करणारा अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान उर्फ केआरके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अंधेरीतील ओशिवरा परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली असून, अटकेनंतर त्याने दिलेलं स्पष्टीकरण ऐकून पोलिसही काहीसे अवाक् झाले आहेत. “हवेमुळे गोळी पुढे जाऊन इमारतीपर्यंत पोहोचली,” असा अजब दावा केआरके यांनी केल्याचं समोर आलं आहे.

१८ जानेवारी रोजी ओशिवरातील रहिवाशी भागात चार राऊंड फायरिंग झाल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी शुक्रवारी केआरकेला ताब्यात घेतलं. घटनास्थळावरून त्यांची लायसन्सधारक बंदूक जप्त करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र अटक झाल्यानंतर केआरकेने दिलेली प्रतिक्रिया सर्वांनाच गोंधळात टाकणारी ठरली आहे.

ओशिवरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री रहिवाशी परिसरातील एका इमारतीतील वेगवेगळ्या फ्लॅट्सना दोन गोळ्या लागल्या. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात येऊन सखोल चौकशी सुरू झाली. या चौकशीत केआरकेचीही विचारपूस करण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्या लायसन्ससीड बंदुकीतून फायरिंग झाल्याची कबुली दिली, मात्र त्यामागचं कारण त्यांनी वेगळ्याच पद्धतीने मांडलं. बंदूक स्वच्छ करताना आणि तिची कार्यक्षमता तपासताना चुकून गोळी झाडली गेल्याचं त्याने सांगितलं.

“हवेमुळे गोळी पुढे गेली” असा दावा

केआरकेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या घरासमोर मोठं मँग्रोजचं जंगल आहे. बंदूक तपासताना त्यांनी त्या दिशेने फायरिंग केलं, जेणेकरून कुणालाही इजा होणार नाही किंवा नुकसान होणार नाही. मात्र, त्या वेळी हवा जोरात असल्याने गोळी अपेक्षेपेक्षा पुढे गेली आणि ओशिवरातील एका इमारतीला लागली, असा दावा त्यांनी केला आहे. आपला कोणालाही इजा करण्याचा हेतू नव्हता, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली, तरी अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं.

केआरकेच्या बंदुकीतूनच फायरिंग झाल्याची कबुली

घटनेची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी तात्काळ तपास हाती घेतला. फायरिंगसाठी वापरलेली बंदूक पोलिसांनी जप्त केली असून, केआरके यांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे, याचा शोध घेतला जात आहे. गोळीबार करताना सुरक्षा नियमांचं पालन झालं होतं का, परवान्याच्या अटींचा भंग झाला आहे का, यासह सर्व बाबींची तपासणी सुरू आहे.

वादांमुळे कायम चर्चेत असलेला केआरके

रहिवाशी भागात हेतूपूर्वक किंवा निष्काळजीपणे गोळीबार करणं हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे बॅलेस्टिक अहवाल, घटनास्थळाचं निरीक्षण आणि साक्षीदारांचे जबाब या आधारे तपास सुरू असल्याचं एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, केआरके हे त्यांच्या सिनेमांपेक्षा अधिक त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि कृतींमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. या प्रकरणामुळेही ते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.


Powered By Sangraha 9.0