नवी दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप मुख्यालयात मंगळवारी जे घडले, ते केवळ एका पदाधिकार्याची निवड नव्हती, तर ती एका राजकीय-युगाच्या हस्तांतरणाची अधिकृत नोंद होती. दि. २० जानेवारी २०२६ हा दिवस भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात एका निर्णायक पिढी-परिवर्तनामुळे सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. वयाच्या अवघ्या ४५व्या वर्षी बिहारचे नितीन नबीन यांनी काल जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची, भारतीय जनता पक्षाची धुरा अधिकृतपणे स्वीकारली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांचा सत्कार करताना एक अत्यंत सूचक विधान केले, "जेव्हा पक्षाच्या कामाचा विषय येईल, तेव्हा नितीन नबीनजी माझे बॉस असतील.” हे विधान वरकरणी हलकेफुलके वाटत असले, तरी त्यात भाजपच्या संघटनात्मक रचनेचे आणि शिस्तीचे सार यामध्ये सामावलेले आहे. जे राजकीय पंडित, दिल्लीतील ल्युटन्स मीडिया आणि जुन्या पिढीतील विश्लेषक जे.पी. नड्डा यांच्यानंतर एखाद्या ६०-७० वर्षांच्या अनुभवी नेत्याकडे अध्यक्षपद जाईल, असे गृहीत धरून होते, त्यांच्यासाठी कालचा दिवस नक्कीच धक्कादायक ठरला. पण, गेल्या दशकात ज्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीचा बारकाईने अभ्यास केला आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय अनपेक्षित असला, तरी आश्चर्यकारक नाही.
धक्कातंत्र की सुविचारित रणनीती?
नितीन नबीन यांची नियुक्ती हे भाजपच्या त्या ठरलेल्या आणि आताशा स्थिरावलेल्या पॅटर्नचा भाग आहे, ज्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात सुरू आहे. २०२३च्या विधानसभा निवडणुका आठवा. राजस्थानमध्ये माध्यमांचे कॅमेरे वसुंधरा राजेंवर खिळलेले असताना मागील रांगेत बसलेल्या भजनलाल शर्मा यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून घोषित झाले होते. मध्य प्रदेशात ‘मामा’ शिवराज सिंह चौहान असताना मोहन यादव यांना संधी मिळाली किंवा गुजरातचे संपूर्ण मंत्रिमंडळ बदलून भूपेंद्र पटेल यांच्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला राज्याची धुरा देण्यात आली. या प्रत्येक निर्णयामागे एक समान सूत्र होते - भाजप नेतृत्वाने नेहमीच प्रस्थापितांना बाजूला सारून कामगिरी, संघटनात्मक निष्ठा आणि भविष्यवेधी नेतृत्व यांना प्राधान्य दिले आहे.
नितीन नबीन यांची निवड का? याचे उत्तर त्यांच्या वयात आणि त्यांच्या पार्श्वभूमीत दडले आहे. ते बिहारच्या बांकीपूरमधून सलग पाचवेळा आमदार राहिले आहेत, हे त्यांचे ‘इलेक्टोरल मेरिट’ आहेच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चा आणि विद्यार्थी परिषदेतून संघटनेत जमिनी-स्तरावर काम केले आहे. ज्या पक्षाची मूळ विचारसरणी ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘कॅडर बेस’ आहे, तिथे वडिलांच्या पुण्याईवर वारशाने पदे मिळत नाहीत, तर घामाने आणि निष्ठेने ती मिळवावी लागतात, हा संदेश कालच्या निवडीतून भाजपने आपल्या लाखो कार्यकर्त्यांना दिला आहे.
७५ वर्षांचा वारसा आणि नवी दिशा
विशेष योगायोग म्हणजे, यावर्षी भारतीय जनसंघाच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. १९५१ मध्ये जेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाची स्थापना केली, तेव्हा त्यांचा उद्देश स्पष्ट होता. हा पक्ष काँग्रेसमधील असंतुष्टांचा गट नसेल, तर एका वेगळ्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचा प्रवाह असेल. आज ७५ वर्षांनंतर एका ४५ वर्षीय नेत्याकडे पक्षाची सूत्रे सोपवून भाजपने हे सिद्ध केले आहे की, त्यांची विचारधारा जुनी असली, तरी त्यांचा चेहरा आणि ऊर्जा नित्य-नूतन आहे.
एक राजकीय विश्लेषक म्हणून या घटनेकडे पाहताना असे दिसते की, नितीन नबीन यांची निवड काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीच्या राजकारणावर सर्वात मोठा प्रहार आहे. जेव्हा विरोधी पक्षांमध्ये पदे ही केवळ आडनावावरून किंवा बड्या नेत्यांशी असलेल्या जवळीकीवरून ठरतात, तेव्हा भाजपने एका सामान्य कार्यकर्त्याला, ज्याच्या पाठीशी कोणतेही मोठे ‘गॉडफादर’ नाहीत, पक्षाचे सर्वोच्च पद देऊन लोकशाहीचा एक वेगळा आदर्श ठेवला आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी त्यांना ‘मिलेनिअल’ संबोधले, हे भारताच्या बदलत्या लोकसंख्येचे प्रतीक आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे, त्या देशाच्या सत्ताधारी पक्षाचा अध्यक्षही त्याच वयोगटाचे प्रतिनिधित्व करणारा आणि त्यांची भाषा बोलणारा असावा, हे धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
‘बिहार पॅटर्न’ आणि पूर्व भारताचे राजकारण
या नियुक्तीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, नितीन नबीन यांचे बिहारी असणे. भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच बिहारच्या नेत्याला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळाले आहे. उत्तर प्रदेशात भाजपने आपले स्थान बळकट केले आहे; पण पूर्व भारत विशेषतः बिहार, बंगाल आणि ओडिशा हे अजूनही भाजपसाठी पूर्णपणे जिंकता आलेले नाहीत. नितीन नबीन यांच्या निवडीमुळे बिहारमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह पाहायला मिळाला, त्याचा थेट परिणाम आगामी निवडणुकांवर होईल. ‘आरजेडी’ आणि ‘जेडीयू’च्या जातीवर आधारित समीकरणांना छेद देण्यासाठी भाजपने एका तरुण, आक्रमक आणि विकासाची भाषा बोलणार्या चेहर्याला पुढे केले आहे. हे केवळ प्रतीकात्मक नाही, तर बिहारच्या राजकारणातील कौटुंबिक मक्तेदारीला दिलेले हे खुले आव्हान आहे.
संघटनात्मक कौशल्य आणि ‘मिशन-२०२९’
डिसेंबर २०२५ मध्ये नितीन नबीन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली, तेव्हाच वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज आला होता. नितीन नबीन हे केवळ तरुण चेहरा नाहीत, तर ते डिजिटल-युगातील नेते आहेत. २०२९च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरचे भारताचे राजकारण हे पारंपरिक सभांपेक्षा डिजिटल वॉर-रूम्स, डेटा अॅनालिटिस आणि सोशल इंजिनिअरिंगवर जास्त अवलंबून असेल. अशा वेळी तंत्रज्ञानाची उत्तम जाण असलेला आणि तरीही, जमिनीशी नाळ जोडलेला नेता पक्षाला हवा होता. नबीन हे या दोन्ही जगांमधील दुवा आहेत.
संघटनेच्या दृष्टीने विचार केल्यास अध्यक्ष आणि संघटन महामंत्री यांचा समन्वय महत्त्वाचा असतो. नबीन हे संघाच्या मुशीतून तयार झालेले स्वयंसेवक आहेत, त्यामुळे संघाशी त्यांचा समन्वय अत्यंत नैसर्गिक असेल. भाजपला केवळ सत्तेत राहायचे नाही, तर आपला विस्तार सर्वव्यापी करायचा आहे आणि त्यासाठी संघटनेवर पकड असलेला तरुण अध्यक्ष आवश्यक होता.
महाराष्ट्रासाठी आणि प्रादेशिक पक्षांसाठी धडा
महाराष्ट्राच्या राजकारणातून पाहताना या घटनेचे महत्त्व अधिकच प्रकर्षाने जाणवते. आपल्याकडे आजही अनेक पक्षांमध्ये नेतृत्वासाठी वारसदार असावा लागतो. शिवसेनेतील फूट असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील काका-पुतण्या संघर्ष असो, हे सर्व सत्तेच्या वारसाहक्कासाठी होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे हे ‘मॉडेल’ महाराष्ट्रातील तरुणांना नक्कीच आकर्षित करेल. जर तुम्ही काम केले, तर तुमचे आडनाव काय आहे हे महत्त्वाचे नाही, हा संदेश महाराष्ट्रातील भाजपच्या दुसर्या फळीतील नेत्यांसाठीही तितकाच आश्वासक आहे.
आव्हानांचे डोंगर आणि अग्निपरीक्षा
मात्र, नितीन नबीन यांच्यासाठी हा रस्ता फुलांचा नाही. त्यांनी पदभार स्वीकारला असला, तरी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. केंद्रात भाजप सलग तीन टर्म सत्तेत आहे. त्यामुळे लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि काही प्रमाणात असलेली नाराजी सांभाळण्याचे कसब त्यांना दाखवावे लागेल. तसेच ‘एनडीए’च्या मित्रपक्षांना सोबत घेऊन चालताना पक्षाचा विस्तार थांबू न देणे, ही तारेवरची कसरत त्यांना करावी लागेल.
निष्कर्ष
‘पार्टी विथ अ डिफरन्स’ ही केवळ एक घोषणा नसून ती कृती आहे, हे भाजपने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या युगातून पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या युगात आला. आता नितीन नबीन यांच्या निवडीने पक्ष पुढील २० वर्षांच्या प्रवासासाठी सज्ज झाला आहे. या निर्णयाने भाजपने आपल्या विरोधकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. जेव्हा विरोधी पक्ष भूतकाळात अडकले आहेत, जुन्याच घोषणा आणि जुन्याच चेहर्यांना पॉलिश करत आहेत, तेव्हा भाजप भविष्यातील नेतृत्वाची पेरणी करत आहे. नितीन नबीन हे त्या पेरणीतून उगवलेले पहिले जोमदार पीक आहे. ही निवड केवळ एका व्यक्तीची नाही, तर ती नव्या भारताच्या राजकीय आकांक्षांचे प्रतिबिंब आहे. राजकीय पटावरच्या या चालीचा ‘चेकमेट’ कोणाला होणार आणि २०२९च्या कुरुक्षेत्रात हा तरुण सेनापती पक्षाला कसा विजय मिळवून देणार, हे काळच सांगेल. पण, तूर्तास भारतीय राजकारणात एका ‘नबीन’ पर्वाचा आरंभ झाला आहे, हे नक्की!
- मल्हार पांडे