‘टूर’...टूर...!

    24-Jan-2026
Total Views |
Pune Grand Tour
 
दोन वर्षांपूर्वी पुणे महानगरात ‘जी-२०’ देशांच्या प्रतिनिधींचा एक मोठा ‘इव्हेंट’ पार पडला होता. त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांच्या डागडुजीसमवेत सभोवतालची रंगरंगोटी आणि स्वागत तयारी केली होती. काही भिंती रंगविल्या होत्या, काही चौकांचे सुशोभीकरण केले होते. रस्ते-दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी केली होती. त्यासाठी विशेष निधी मंजूर करून घेतला होता. पाहुण्यांच्या स्वागतासाठी कमानी उभारल्या होत्या. शहर सुंदर दिसावे म्हणून जेवढे करता येईल, तेवढे करून पाहिले होते. आयुक्त विक्रमकुमार यांनी त्यासाठी पत्रकार परिषदेत ही पुण्यासाठी अत्यंत गौरवाची बाब असल्याचे सांगितले होते. त्यावेळी पुण्यातला कचरा दिसू नये म्हणून काय, काय भलतेच प्रताप केले होते. नेमके असेच काही आतादेखील ‘पुणे ग्रॅण्ड टूर’ या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यात करण्यात आले. यावेळी या स्पर्धेत असलेल्या सायकलस्वारांना पुणे आणि सभोवतालचा परिसर चांगला दिसावा अथवा त्या स्पर्धांसाठी आवश्यक वातावरणनिर्मिती केली जावी म्हणून प्रशासकीय पातळीवर यंत्रणा राबत असल्याचे बघायला मिळाले.
 
रस्ते तात्पुरते दुरुस्त झाले, चौक सुशोभित झाले, फुटपाथ काही काळ का होईना मोकळा श्वास घेताना दिसले आणि कोट्यवधी रुपये खर्च झाले. अशाप्रकारचे चांगले ‘इव्हेंट’ होत असताना आपले घर आधीच कायम नीटनेटके असावे, असे कधीच कुणाला वाटत नाही. कुणी पाहुणा येणार म्हणून काही दिवस धडपड करायची आणि एकदा तो कार्यक्रम आटोपला की, पुन्हा त्या महानगरातील अवस्थेकडे अगदी कायमस्वरूपी दुर्लक्ष करायचे, हे पुण्यासाठी भूषणावह वाटणारे इव्हेंटचे नियोजन करणार्‍यांसाठी दूषणावहच आहे. ‘जी-२०’चे प्रतिनिधी येऊन गेल्यावर रस्ते खड्ड्यातच गेले. आता सायकल इव्हेंट झाल्यावर रिक्त केलेले फुटपाथ सायकल चालविणार्‍यांसाठी रिक्त राहतीलच, याची हमी कोण घेणार? ऐन परीक्षांच्या दिवसात शाळांना सुटी दिली, ऐन कार्यालयीन कामांच्या वेळात वाहतुकीसाठी मार्ग बंद ठेवले, कोणतेही नीट नियोजन नसल्याने रस्ते बंद ठेवल्याने पुणेकरांची विशेषतः शाळांमध्ये पाल्यांना ने-आण करणार्‍या पालकांची तर व्यथित अवस्था होती, त्यात छोट्या दुकानदारांनादेखील व्यवसाय बंदचा नाही म्हणायला फटका बसलाच, म्हणून ही ‘टुर... टुर...!
 
हुरहुर...
 
प्रशासकीय राजवट संपून आता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये लोकशाही प्रक्रियेनुसार निवड केलेल्या नगर-प्रतिनिधींची राजवट सुरू होणार आहे. एकूणच गेली काही वर्षे ही महापालिकेची सभागृहे या नव्या लोकांसाठी प्रतीक्षातुर होती. त्यांना कधी हे लोक येथे येतात आणि आसनस्थ होतात, असे झाले होते. त्यांची ती हुरहुर आता कायमची मिटणार आहे. पुणे महापालिका सभागृहात एकूण १६२ आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकूण १२८ सदस्य आसनस्थ होणार आहेत. त्यांच्या कारकिर्दीत आता दोन्ही महानगरांचा कारभार नव्याने येणार्‍या महापौरांच्या नेतृत्वात चालणार आहे. पुण्यात पुन्हा एकदा ‘लाडकी बहीण’ महापौर होणार आहे. यापूर्वीदेखील या महापालिकेत महिलांनी सत्ता सांभाळली आणि महानगराचा कारभार चालविला आहे. यावेळीदेखील महिलाच महापौर होणार असल्याने हा मुकुट कुणाच्या शिरपेचात रोवला जातो, याची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. यासाठी सर्वसाधारण गटातून, महिला गटातून महापौर निवडला जाणार आहे.
 
पिंपरी-चिंचवडमध्येदेखील या पदावर महिला किंवा पुरुष विराजमान होणार आहे. भाजपने या दोन्ही महापालिकांमध्ये निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याने अर्थातच, या पक्षातील नगरसेवकांमध्ये कुणाची या महत्त्वाच्या पदावर वर्णी लागणार म्हणून उत्कंठा वाढत चालली आहे. पुण्याची महापालिका दि. १५ फेब्रुवारी १९५० रोजी अस्तित्वात आल्यानंतर जवळपास ७६ वर्षांनंतर स्थापना दिनाच्या आसपास नवा महापौर विराजमान होणार आहे. पुण्यात अनेक इच्छुकांमध्ये याबाबत हुरहुर असणे स्वाभाविक. पुण्याचा विस्तार जसा झपाट्याने होत आहे, तसाच विकासदेखील होत आहे. किंबहुना, लोकांना आवश्यक असणारी विकासकामे त्या गतीने करण्याचा प्रयास केला जात आहे. ही धुरा आतापावेतो केंद्र आणि राज्य सरकारकडे होती. आता या महापालिकेचेच प्रतिनिधी सत्ता सांभाळीत असल्याने वेगाने विस्तारणार्‍या या महानगरातील विकासकामांनादेखील वेगानेच पुढे नेणे अपरिहार्य आहे. हे कौशल्य ज्या उमेदवारामध्ये आहे, त्याच्या हातात महानगराचा कारभार असेल, हा विश्वास बाळगणे व्यर्थ ठरणार नाही. तथापि, लोकांमध्ये मात्र कायम हुरहुर असणार नाही, याची दक्षता या सर्वांनी घेतल्यास उत्तम, अन्यथा, ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे कारभार झाला, तर विरोधकांना तोंडसुख घ्यायला वाव मिळेल.
- अतुल तांदळीकर