हवाई ‘अरविंद’

    24-Jan-2026
Total Views |
Retired Sergeant Arvind Indulkar
 
बालपणापासून पाहिलेले भारतीय हवाईदलात रुजू होण्याचे स्वप्न आपल्या जिद्दीच्या जोरावर सत्यात उतरवणार्‍या निवृत्त सार्जंट अरविंद इंदुलकर यांचा परवाच्या ‘प्रजासत्ताक दिना’निमित्त परिचय करून देणारा हा लेख...
 
कारगिल युद्धाचा काळ. कोणत्याही क्षणी सीमेवर लढाईसाठी निरोप येऊ शकतो, अशी परिस्थिती. घरी पत्नी आणि दोन मुली. पैकी धाकटी तर अवघी काही महिन्यांची. रोज सकाळी निघताना पुन्हा घरी येण्याची शाश्वती तशी नाहीच. पण, पत्नीच्या चेहर्‍यावरचे स्मितहास्य कधी तसूभरही कमी झाले नाही आणि त्याच बळावर अरविंद यांनी देशकार्यासाठी आयुष्य वाहून घेतले.
अरविंद यांचे बालपण खोपोलीसारख्या खेड्यात गेले. घरची परिस्थिती गरिबीचीच. तरीही घरातील मोठा मुलगा म्हणून अरविंद यांच्या वडिलांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. पण, शालेय अभ्यासापेक्षा अरविंद यांना युद्ध, शस्त्र आणि विशेषतः विमानांबद्दल रंजक माहिती वाचण्यातच रस वाटत होता. घरी येणार्‍या वर्तमानपत्र, मासिकांमधील युद्धनीती-युद्धशास्त्राविषयीचा शब्द अन् शब्द ते वाचत असत. त्यांना वाचनाची आवड होतीच. घरातील आणि ग्रंथालयातील पहिल्या-दुसर्‍या महायुद्धांविषयी लिहिलेली जवळपास सर्वच पुस्तके अरविंद यांनी शाळेत असताना वाचून काढली.
 
आवड तर होती; पण आपल्याला खरेच हवाईदलात रुजू व्हायचे असेल, तर नेमके काय करायचे, याबद्दल मार्गदर्शन करणारे त्यांच्या ओळखीत कोणीही नव्हते. तेव्हा, ८०च्या दशकात तर ‘गुगल’ही नव्हते. वर्तमानपत्र वाचून आणि रेडिओ ऐकून त्यांना जाणवले की, आपल्याला पुस्तकी अभ्यासासोबत शारीरिक तंदुरुस्तीदेखील तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून त्यांनी रोज सकाळी धावायला जाणे आणि व्यायाम करणे सुरू केले. हवाईदलाच्या निमित्ताने का होईना, पण व्यायाम करतोय म्हणून वडिलांनीही त्यांना प्रोत्साहन दिले.
 
दहावीनंतर अरविंद यांनी पहिल्यांदा हवाईदलाची प्रवेशपरीक्षा दिली. परंतु, परीक्षेचे स्वरूप आणि मुख्यतः ‘निगेटिव्ह मार्किंग’चा नियम माहीत नसल्यामुळे ते सपशेल बाद झाले. तेव्हा वडीलही नुकतेच निवृत्त झालेले असल्यामुळे मोठ्या मुलाने कमावणे अपेक्षित असताना अरविंद यांनी हवाईदलाचा ध्यास घेतला होता. अर्जप्रक्रिया आणि परीक्षेसाठी खोपोलीवरून मुंबईला पुनःपुन्हा प्रवास करणेदेखील तेव्हा कठीणच होते. अशा परिस्थितीत परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याचे त्यांच्या मनावर दडपण होते.
पण, त्यानंतर तीन वर्षांनी अरविंद यांनी पुन्हा एकदा जिद्दीने हवाईदलाची प्रवेशपरीक्षा आणि वैद्यकीय चाचणी दिली. निवड झाल्याचा टेलिग्राम आला. वडिलांनी पैशांची जुळवाजुळव करून अरविंद यांना सगळ्या आवश्यक वस्तू घेऊन दिल्या आणि केवळ १७ वर्षीय अरविंद प्रशिक्षणासाठी चेन्नईला रवाना झाले.
 
तेथील प्रशिक्षणानंतर त्यांचे ‘एअरमॅन’ म्हणून आसामला प्रथम पोस्टिंग झाले. अरविंद तेथे ‘मशिनिस्ट’ होते. विमानाचे काही भाग बनवणे, ते दुरुस्त करणे असे काम ते पाहात असत. त्याच काळात आसाममध्ये होत असलेल्या ‘उल्फा’च्या हल्ल्यांमुळे तेथील वातावरण खूप तणावपूर्ण होते. एकदा तेथे सरावाला बाहेर पडलेले एक विमान कोसळले. म्हणून अरविंद यांच्यासह आणखी तिघेजण ते विमानाचे भाग गोळा करून आणायला गेले. काम अगदीच सोपे वाटल्याने ते फक्त एक दिवसाच्या शिध्यासह रवाना झाले. परंतु, परिस्थितीचे गांभीर्य तेथे पोहोचल्यावरच कळले. संपूर्ण जंगली भाग असल्यामुळे विमानाचे विखुरलेले भाग प्रथमतःदिसतच नव्हते. त्यानंतर शोधून सगळे भाग गोळा करायला त्यांना तीन दिवस लागले. राहण्याची-जेवणाची सोय काहीही नसल्यामुळे खूपच पंचाईत झाली. मिळेल ते खात आणि जळवांसह अन्य सगळ्या किड्यांच्या सान्निध्यात, भयाण जंगलात त्यांनी तीन दिवस काढले. अखेर सगळे भाग मिळाल्याचा निरोप पाठवल्यावर एक हेलिकॉप्टर त्यांना घ्यायला आले. पण, हेलिकॉप्टरमधील लोकांना हे दिसलेच नाहीत आणि ते परत निघून गेले आणि आणखी एक रात्र यांना जंगलात राहणे भाग पडले. पण, अखेर चौथ्या दिवशी त्यांची तेथून सुटका झाली.
 
आसामच्या पोस्टिंगनंतर त्यांनी आदमपूर, कानपूर आणि मग पुण्यातील हवाईतळात काम केले. पुण्यात काम करत असताना भूजच्या हवाईतळातील रन-वेवर प्रजासत्ताकदिनी भूकंप झाला. हवाईदलातील क्वार्टरमध्ये राहणारे सर्व अधिकारी सुटीनिमित्त घरीच होते आणि ते सगळे त्या भूकंपाचे बळी ठरले. झेंडावंदनासाठी शाळेत गेलेली लहान मुले तेवढी वाचली. आपल्या एवढ्या सहकार्‍यांचा एकत्र मृत्यू पाहणे, हा अरविंद यांच्यासाठी अतिशय हृदयद्रावक अनुभव होता. या संपूर्ण काळात त्यांच्या पत्नीची त्यांना खंबीर साथ लाभली.
 
कारगिलकाळात मोठे सैन्यदल सीमेवर रवाना झालेले असताना पुण्याचा हवाईतळ सांभाळणे आणि ‘बॅकस्टेज’वर राहून रसद पुरवणे इत्यादी कामे त्यांनी कौशल्याने पार पाडली. त्यांच्या २० वर्षांच्या सेवेतील शेवटचे चंदीगढचे पोस्टिंग त्यांच्या निवृत्तीनंतरच्या वाटचालीसाठी पोषक ठरले. त्या काळात विमानाचे सुटे भाग आयात न करता, स्वदेशी बनवण्याचे प्रयत्न चालू झाले होते. तेव्हा विविध कंपन्यांमध्ये जाऊन चौकशी करणे, त्यांना कागदावर मॉडेल डिझाईन करून देण्याचे काम अरविंद आपल्या टीमसह करत असत. त्यांनी ‘सार्जंट’पदावर पोहोचून निवृत्ती घेतली आणि आता ते हेच काम समुद्रातून तेल गोळा करणारे ‘रिग’ बनवण्याच्या कंपनीसाठी करतात.
 
हवाईदलातील सेवेमुळे त्यांच्या अंगात भिनलेले ‘टीम स्पिरिट’, व्यायामाची सवय आणि कडक शिस्तीमुळे ते आज मित्रमंडळींमध्ये ‘पागल फौजी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. निवृत्त सार्जंट अरविंद इंदुलकर यांना त्यांच्या देशसेवेबद्दल दै. ‘मुंबई तरुण भारत’चा कडक सॅल्यूट!
- ओवी लेले