वसंते सा सुहृद्या च...

23 Jan 2026 13:04:39

आज वसंत पंचमी. भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि निसर्गाच्या नवचैतन्याचा हा उत्सव. शिशिर ऋतूच्या पानगळीनंतर सृष्टी जेव्हा नव्या पालवीने सजते, तेव्हा ‌‘ऋतुराज‌’ वसंताचे स्वागत करण्यासाठी वसंत पंचमी साजरी केली जाते. त्याविषयी...

वसंत पंचमीचा सण म्हणजे निसर्ग, संगीत, कला आणि ज्ञानाचा संगम आहे. या दिवशी सृष्टीमध्ये एक विलक्षण बदल जाणवू लागतो. कडाक्याची थंडी ओसरू लागते आणि वातावरणात एक सुखद उबदारपणा येतो. वसंत ऋतूमध्ये सृष्टी जणू पिवळ्या रंगाची शाल पांघरते. शेतात डोलणारी पिवळीधमक मोहरीची फुले आणि झाडांवरील आम्रसंभार (मोहर) वातावरणात एक वेगळाच सुगंध दरवळतात. म्हणूनच, या दिवशी पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व असते.

हिंदू धर्मात वसंत पंचमी हा दिवस ज्ञान, कला आणि बुद्धीची देवता माता सरस्वती हिचा ‌‘प्रकट दिन‌’ मानला जातो. या दिवशी विद्यालयात, घरात सरस्वतीपूजन केले जाते. लहान मुलांच्या शिक्षणाची सुरुवात ‌‘पाटीपूजन‌’ करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.

वसंते सा सुहृद्या च,
वीणावाद्यविनोदिनी|
ददातु विमलं ज्ञानं,
नमस्ते शारदे शुभे॥
अशा वंदनेने सर्वजण आपल्या शिक्षणाची सुरुवात करतात.

भारताच्या विविध प्रांतात हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. तेलंगण राज्यात गोदावरी नदीच्या काठी बासर या गावी सरस्वतीचे मंदिर आहे. तेथे मुलांच्या ‌‘विद्यारंभ‌’ संस्कारासाठी वसंत पंचमीला अनेक विद्याथ येतात व हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. वेदकाळापासून मानव हा निसर्गपूजक आहे. ‌‘ऋग्वेदा‌’त सगळ्या देवता या निसर्गाचे घटक आहेत. मूतरूपातील ‌‘दैवतशास्त्र‌’ पुराणकाळात विकसित झाले. म्हणूनच, सरस्वती हे फक्त देवीचे रूप नसून आपल्याकडे भारतात ही महत्त्वाची नदी होती; परंतु ती लुप्त झाली, असे मानले जाते. या नदीचा उल्लेख ऋग्वेदात 75 वेळा आला आहे, तर गंगेचा मात्र एकदाच. अगदी ऋग्वेदात सरस्वतीसाठी ‌‘नदीतमे‌’, ‌‘देवितमे‌’ अशी विशेषण वापरली आहेत. व्यासांनी ‌‘भागवत पुराणा‌’ची रचना केली, ती बद्री या ठिकाणी. ‌‘महाभारता‌’तील युद्ध सरस्वती आणि या दोन नद्यांच्या मधल्या भूमीवर लढले गेले, असा उल्लेख ‌‘महाभारता‌’त येतो. या नदीमुळे एकेकाळी थरचे वाळवंट हिरवेगार होते, म्हणून या नदीच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न व्हावेत असे वाटते. भारतीय सभ्यता ही सरस्वतीच्या तीरावर विकसित झाली. सरस्वतीचे पाणी आटल्याने तिच्या तटावर राहणारे लोक अन्यत्र स्थलांतरित झाले. काहींनी आजही सरस्वतीच्या स्मृती जपल्या आहेत आणि त्यांना ‌‘सारस्वत‌’ असे म्हणतात. सरस्वती नदी सहा कोटी वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात होती. भूमी परिवर्तनामुळे सोळाशे किलोमीटर लांबीच्या हिमालयापासून सिंधुसागरापर्यंत वाहणाऱ्या सरस्वती नदीचे पाणी आटले, ही घटना सुमारे इस पूर्व 4000 मध्ये घडली असावी, असे मानले जाते.

‌‘बेहोवा‌’ हे नाव ऋतुराजाच्या नावावरून पडले. अनेक ऋषींचे आश्रम सरस्वती नदीच्या काठी होते. ही नदी पुढे पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यांतून वाहत कच्छच्या रणाला मिळते. बाराशेहून अधिक गावे या नदीच्या तटावर होती. या नदीचे पात्र तीन ते 12 किलोमीटरपर्यंत रुंद आढळते.

1980 ते 1990च्या दशकात माननीय मोरोपंत पिंगळे आणि प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर वाकणकर यांनी ‌‘सरस्वती शोधयात्रा‌’ काढली या उपक्रमाला उद्योजक ‌‘पद्मश्री‌’ दर्शनलाल जैन आणि चेन्नईचे श्री कल्याण रमण यांनी मोलाचे साहाय्य केले. त्यांच्यासारख्या अनेकांच्या प्रयत्नाला यश येऊन आज भारतीय असे सांगू शकतात की, सरस्वती नदी ही अस्तित्वात होती आणि भारतीय सभ्यतेचा उद्भव सरस्वती नदीच्या काठावर झाला. 2015 मध्ये ‌‘हरियाणा सरस्वती धरोहर विकास बोर्ड‌’ याची स्थापना झाली, तेव्हापासून सरस्वती नदीच्या पुनरुज्जीवनाचा व तिच्या प्रवाहाला पुन्हा संचित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. ही नदी जिंद फतेहबाद आणि सिरसापर्यंत 400 किमीवर पसरते. तिथे गेल्या तीन वर्षांपासून यशस्वीपणे पाण्याचा प्रवाह पुन्हा मोकळा केला आहे. ‌‘आयआयटी‌’, रुरकी, ‌‘जीएसआय‌’, ‌‘ओएनजीसी‌’, ‌‘इस्रो‌’, ‌‘भारतीय भूगर्भ सर्वेक्षण‌’, ‌‘केंद्रीय भूजल मंडळ‌’ इत्यादी संस्था व पुरातत्वशास्त्र, भूगर्भशास्त्र, जलविज्ञान, हिमनदी शास्त्र, भूगभय जल इत्यादी शास्त्रांनी हे सिद्ध केले आहे की, आता सरस्वती नदी हे सत्य आहे. उपग्रहांच्या द्वारे प्राप्त चित्रे, भूजल संशोधन, वेगवेगळी शोध पत्रे, ‌‘सर्व्हे ऑफ इंडिया‌’चे मानचित्र आणि महसूल रेकॉर्ड हे सर्व सरस्वती नदीच्या सत्यतेला प्रमाणित करतात. या सर्व संशोधनात संस्कृत भाषेचे मोठे योगदान आहे.]

अशा रीतीने ‌‘वसंत पंचमी‌’ हा सण केवळ मूर्त रूपातील सरस्वती देवीच्याच पूजनाचा नसून अमूर्त, लुप्त अशा सरस्वती नदीच्या पूजनाचासुद्धा आहे. नव्या पिढीत ही धारणा विकसित करणे, ही काळाची गरज आहे. भारतात दोन्ही प्रकारची शास्त्रे विकसित झाली लौकिक आणि अलौकिक. दोन्ही प्रकारची शास्त्रे ही पारमार्थिक व भौतिक दृष्टीने माणसाला अत्यंत महत्त्वाची आहेत. लौकिक शास्त्र भौतिक, तर अलौकिक शास्त्र ही मुक्ती प्रदान करतात, यासाठी माध्यम आहे संस्कृत भाषा. म्हणून, सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी संस्कृत शिकायला ‌‘वसंत पंचमी‌’पासून सुरुवात करावी आणि या शुभ मुहूर्तावर संकल्प करावा की, मी पुढे सर्व शास्त्रे शिकेन.

- ख्याती देशपांडे
9673671176


Powered By Sangraha 9.0