द्रमुक स्वत:ला ‘निधम पक्ष’ म्हणवून घेत असेल, तर त्याने निदान मद्रास उच्च न्यायालयाच्या निकालानंतर उदयनिधी स्टॅलिनला मंत्रिमंडळातून हटविलेच पाहिजे. पण, तसे घडण्याची शक्यता दिसत नाही. कारण, द्रमुक हाही मुस्लीम लांगूलचालनवादी पक्ष. हिंदुद्वेष हाच त्याचा पाया. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमधील हिंदूंनी उदयनिधीसारख्या हिंदुद्वेष्ट्यांना मतपेटीतून हद्दपार करुन सनातनची ताकद दाखवून द्यावी!
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र व मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी दोन-अडीच वर्षांपूर्वी केलेल्या सनातनविरोधी वक्तव्याची मद्रास उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली असून, त्यांचे भाषण हे द्वेषमूलक (हेट स्पीच) असल्याचे म्हटले आहे. दि. 2 सप्टेंबर 2023 रोजी एका कार्यक्रमात उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा नाश करण्याचे आवाहन केले होते. “सनातनचा विरोध करण्यात अर्थ नाही, तर तो नष्टच केला पाहिजे. कारण, डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांचा आपण विरोध करीत नाही, तर त्यांचा समूळ उच्छेद करतो. सनातन हाही या रोगांसारखाच असून, त्याचा समूळ उच्छेदच केला पाहिजे,” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांचे पक्षातील सहकारी व मंत्री ए. राजा यांनीही सनातन हा एचआयव्ही व कुष्ठरोगासारखा गलिच्छ रोग असल्याचे मत व्यक्त केले होते.
मद्रास उच्च न्यायालयाने उदयनिधी स्टॅलिन यांच्या मतावर कोरडे ओढताना म्हटले आहे, “उदयनिधी यांचे सनातनविरोधी मत हा सनातन धर्मावर हल्ला आहे.” गेल्या 100 वर्षांपासून ‘द्रविड कळघम’ आणि नंतर ‘द्रविड मुन्नेत्र कळघम’ यांच्याकडून सनातनवर हल्ले केले जात आहेत. उदयनिधी हे ‘डीएमके’शीच संबंधित आहेत. उदयनिधी यांच्या वक्तव्याचा मतितार्थ पाहता, हा सनातनवरील हल्लाच मानला पाहिजे. न्यायालयाने असेही म्हटले आहे की, आपल्याकडे सामान्यत: वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांऐवजी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांवरच कारवाई होताना दिसते. त्यामुळे जे मूळ वक्तव्य करतात, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली गेली पाहिजे.
द्रमुक पक्ष स्वत:ला द्रविड संस्कृतीशी जोडतो. पण, त्यांची द्रविड संस्कृती ही हिंदू किंवा सनातन धर्मावर टीका करणे आणि त्याच्याविषयी तिरस्कार पसरविणे यापुरतीच मर्यादित आहे. द्रविड संस्कृती हासुद्धा सनातन संस्कृतीचाच भाग आहे. पण, द्रमुकचे आदर्श कोण; तर रामस्वामी पेरियार नायकर. हे पेरियार कमालीचे हिंदुद्वेष्टे होते. त्यामुळे त्यांच्याच हिंदुद्वेषावर हा पक्ष आधारित आहे. गेल्याच महिन्यात तामिळनाडूतील तिरुपरंकुंद्रम येथील ‘कार्तिगाई दीपम्’ या पारंपरिक उत्सवावर बंदी घालण्याचा करंटेपणा याच द्रमुक सरकारने केला होता. भगवान कार्तिकेय यांचे मंदिर असलेल्या या टेकडीवरील दीपमाळेत दीपप्रज्वलन करण्याची शेकडो वर्षांची परंपरा प्रस्थापित आहे. पण, यंदा अचानक तसे दीपप्रज्वलन करण्यास राज्य सरकारने मनाई केली. तेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले आणि उच्च न्यायालयाकडून त्यासाठी मंजुरी आणावी लागली होती. न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही द्रमुक सरकारने तो न मानण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. ‘सीआरपीएफ’च्या जवानांच्या संरक्षणात न्यायालयाच्या निर्णयानुसार याचिकाकर्ते रामा रविकुमार हे दीपप्रज्वलन करण्यास चालले असताना त्यांना जिल्हा प्रशासनाने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून अडविले. पण, भगवान मुरुगन यांच्या याच सहा टेकड्यांवर देशद्रोही संघटना ‘पीएफआय’ची राजकीय शाखा असलेली ‘डेमोक्रॅटिक पाट ऑफ इंडिया’ने पशुबळी देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता, तेव्हा जिल्हा प्रशासनाला कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे का वाटले नाही? रामनाथपूरमचे ‘मुस्लीम लीग’चे खासदार के. नवास कन्नी यांनी तर या टेकड्या ‘वक्फ बोर्डा’च्या मालकीच्या असल्याचाही धक्कादायक दावा केला आहे. या टेकड्यांचे नाव बदलून ‘सिकंदर टेकड्या’ असे ठेवण्याचाही प्रयत्न केला गेला. थोडक्यात, द्रमुकचे सरकार सनातनविरोधातील शक्तींना मोकळे रान देण्याचा प्रयत्न करताना दिसते.
यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने मुस्लीम व ख्रिस्ती मतांच्या बेगमीसाठी हिंदूविरोधी भूमिका घेणे त्याला क्रमप्राप्त आहे. मद्रास उच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीशांनी या दीपमाळा प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निकाल दिला होता, त्या न्या. स्वामीनाथन यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचाही प्रयत्न काँग्रेस आणि द्रमुकने केला होता. काँग्रेससह सर्वच हिंदुद्वेषी पक्षांची कार्यपद्धती ही सारखीच दिसते. आता हा सनातनद्वेष त्यांना निवडणुकीत तारू शकेल की नाही, याची शंकाच आहे. कारण, तामिळनाडूत मुस्लीम लोकसंख्या तितकी महत्त्वाची नाही. त्या राज्यात असंख्य मंदिरे असून, सामान्य जनता आजही सनातन धर्माचे आणि प्राचीन परंपरांचे उत्साहाने पालन करते.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे ज्याप्रमाणे मराठी अस्मितेचा मुद्दा भावनिक करून मते मागण्याचा प्रयत्न करतात, तसेच तामिळनाडूत द्रमुक पक्ष द्रविड संस्कृतीचा मुद्दा भावनिक करून मते मागतो. पण, स्टॅलिन यांच्यापेक्षा द्रविड संस्कृतीचा अधिक आदर आणि आविष्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केला आहे. वाराणसीत ‘काशी-तामिळ संगम’ हा कार्यक्रम असो की, लोकसभेत ‘सेंगोल’ची स्थापना असो की, तामिळनाडूतील अनेक मंदिरांमध्ये जाऊन मोदी यांनी केलेली पूजा असो, तामिळ संस्कृतीचा मान स्टॅलिनपेक्षाही त्यांनीच राखला आहे. तरीही, त्यांची सनातनद्वेषी भूमिका लपून राहिलेली नाही. चेन्नईच्या किल्पॉक परिसरातील वाडेस रस्त्याचे नाव बदलून त्याला कुख्यात हिंदूविरोधी इव्हांजेलिकल ख्रिस्ती बिशप एझरा सर्गुणम यांचे नाव देण्यात आले. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित एका कार्यक्रमात वैदिक कर्मांना करण्यासही द्रमुक सरकारने प्रतिबंध केला होता.
एवढेच नाही तर मुस्लीम मतांच्या भिकेसाठी द्रमुकने ‘सीएए’, तिहेरी तलाक आणि ‘वक्फ बोर्ड सुधारणा’ कायद्यांनाही कडाडून विरोध केला होता. इतकेच नव्हे, तर शालेय अभ्यासक्रमातही इस्लामी तत्त्वांचा समावेश केला. मागासवगय आरक्षणाच्या कोट्यात मुस्लिमांनाही आरक्षण दिले. द्रमुकचा सहयोगी पक्ष असलेल्या ‘व्हीसीके’ पक्षाने दीर्घकाळ शिक्षा भोगत असलेल्या फक्त मुस्लीम कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली होती. एकंदरीतच, द्रमुकला हिंदूविरोध करून मुस्लीम व अन्यधमय मते मिळवायची आहेत, हे स्पष्ट दिसते.
आपण संविधानाचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पाट वगैरे कथित सेक्युलर पक्षांनीच या संविधानाची पायमल्ली सर्वाधिक वेळा केली आहे. न्यायालयाचा आदेश आल्यावरही द्रमुक सरकारने दीपम उत्सव साजरा करण्यास मनाई घटनेच्या कोणत्या कलमानुसार केली? आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरोधात स्पष्ट निकाल दिल्यावर खरेतर त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला गेला पाहिजे. पण, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासही मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तयार नाहीत. ते काय आपल्या पुत्रावर कारवाई करणार? जनतेनेच आता आगामी निवडणुकीत द्रमुकला सत्तेबाहेर भिरकावून दिले पाहिजे!