एकमेव ‘हिंदुहृदयसम्राट’ आणि माझ्यासाठी एकमेव ‘शिवसेनाप्रमुख’ असलेले वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने बाळासाहेबांच्या कर्तृत्वाचा आणि वादळी आयुष्याचा एक भव्य पट नजरेपुढे येतो. कट्टर मराठीपण आणि कडवे हिंदुत्व ही बाळासाहेबांची खरी ओळख महाराष्ट्राच्या मनामनांत आजही घट्ट रुजलेली आहे.
बाळासाहेब ठाकरे हेच शिवसेना-भाजप युतीचे खरे शिल्पकार होते आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात राज्यात, राज्यभरातील नगर परिषदा-महापालिका आणि मुंबई महापालिकेत महायुतीची सत्ता प्रस्थापित होत आहे, याचे मला मनस्वी समाधान आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी आणि काश्मीरमधील ‘370 कलम’ रद्द करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमितभाई शाह यांनी पूर्ण केले. त्या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वातील ‘एनडीए’त शिवसेना सहभागी आहे, याचा अभिमान आहे.
शिवसेनाप्रमुखांचा विचार कुणी सोडला, कोण कुणाच्या गळ्यात गळे घालतेय, यावर मला काही सांगायचे नाही. शिवसैनिकांचा विचार, बाळासाहेबांचा वैचारिक वारसा आम्ही जीवापाड जपतोय. शिवसेनेचा विस्तार राज्याच्या कानाकोपऱ्यात करतोय. त्यामुळेच ‘गर्व से कहो हम शिवसैनिक हैं...’ असे आम्ही मोठ्या अभिमानाने आणि छातीठोकपणे सांगतोय. हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे, असे मी मानतो.
महाराष्ट्राच्या भूमीची गरज म्हणून एका राजकीय परिस्थितीत ‘बाळासाहेब ठाकरे’ नावाचे हे वादळ निर्माण झाले होते. त्या वादळाने पुढे अवघे राजकारण व्यापून टाकले. बाळासाहेबांच्या जडणघडणीत त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा आणि संस्कारांचा मोठा वाटा होता. त्यातूनच घडलेल्या बाळासाहेबांचा ‘व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख’ हा प्रवास प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा इतिहास आहे. मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बाळासाहेबांनी व्यंगचित्र हे शस्त्र म्हणून वापरायला सुरुवात केली, ती ‘फ्री प्रेस’ या वृत्तपत्रामधून. या शस्त्राला अधिक धार लावायची असेल, तर आपल्या मालकीचे व्यासपीठ पाहिजे, या विचारातून त्यांनी दि. 13 ऑगस्ट 1960 रोजी ‘मार्मिक’ हे साप्ताहिक सुरू केले. ही महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एका नव्या युगाची नांदी ठरली. राज्याच्या राजकीय अवकाशात ‘भगवा’ सूर्योदय झाला. भल्याभल्यांनी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची धास्ती घेतली. पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी अशा नेत्यांवर टीकेची धारदार रेघ ओढताना बाळासाहेब मराठी माणसांचा आणि हिंदुत्वाचा आधार झाले. जातिपातींच्या सीमा ओलांडून सर्वसमावेशक हिंदुत्वाचा ते आधार बनले. या आधाराला राजकीय स्वरूप देण्याची योग्य वेळ आली आहे, हे लक्षात आल्यावर बाळासाहेबांनी दि. 19 जून 1966 रोजी ‘शिवतीर्था’वर ‘शिवसेने’ची स्थापना केली. ‘मार्मिक’ आणि शिवसेना या दुधारी शस्त्राला बाळासाहेबांच्या खास शैलीतील वक्तृत्वाची जोड मिळाली आणि त्यातूनच शिवसेनेचा राजकीय सत्तेकडे प्रवास सुरू झाला. बाळासाहेबांची सभा म्हटली की, ‘तुडुंब गद’ हे समीकरणच झाले आणि ते शेवटपर्यंत कायम होते. आपल्या वक्तृत्वाने ते लाखोंच्या सभा अगदी सहज ताब्यात घेत. मराठीद्वेष्ट्या आणि हिंदुत्वविरोधी विचारांचा आपल्या ‘ठाकरी’ शैलीत खरपूस समाचार घेत. हळूहळू ते तमाम मराठी मध्यमवर्गाची मानसिक गरज बनले.
‘मार्मिक’मध्ये त्यांनी मराठी माणसांवरील अन्यायाची माहिती देत, आधी ‘वाचा आणि थंड बसा’ असे शीर्षक दिले होते, नंतर पुढे त्यालाच ‘वाचा आणि पेटून उठा’ असे शीर्षक दिले, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठी माणूस खऱ्या अर्थाने सजग झाला. मराठी माणसाला नोकऱ्या मिळतील, मराठी भाषेचे संवर्धन होईल, सर्वसमावेशक अशा मराठी संस्कृतीला मानाचे स्थान मिळेल, अशी आश्वासने महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी दिली गेली होती. मात्र, त्यानंतर ती पाळली गेली नाहीत. त्यामुळे ‘स्थानिक लोकाधिकार समिती’ स्थापन करून मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम सेनेने केले. पुढे अयोध्येतील बाबरी मशिदीचा ढाँचा उद्ध्वस्त करणाऱ्या सैनिकांना शाबासकी देण्यापासून ते मुंबईतील दंगलीत हिंदूंना आधार देण्यापर्यंत बाळासाहेबांनी कायम थेट भूमिका घेतली.
शिवसेनेची राजकीय रचना त्यांनी अतिशय हुशारीने आणि अत्यंत नियोजित पद्धतीने केली. कट्टर शिवसैनिक आणि शिवसेनेच्या शाखांना त्यांनी केंद्रस्थानी ठेवले. तोपर्यंत राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते केवळ संघटनात्मक राजकारणात रमले होते. स्वातंत्र्यलढा संपल्यावर आता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची गरज राहिलेली नाही, अशी काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांची मानसिकता तयार झाली होती. बाळासाहेबांनी मात्र त्याउलट भूमिका घेतली. “सामान्य माणसाच्या हितासाठी थेट रस्त्यावर उतरून सत्तेशी, प्रशासनाशी संघर्ष करेल, तोच खरा शिवसैनिक” असे म्हणत त्यांनी अशा शिवसैनिकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यास सुरुवात केली आणि राज्याच्या राजकारणाचा संपूर्ण रोखच बदलून गेला. मुंबई-ठाण्याच्या प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा उभी राहिली. शाखेत बाळासाहेबांच्या विचारांचे, त्यांच्या एका इशाऱ्यासरशी रस्त्यावर उतरणारे क्रियाशील सैनिक तयार झाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी अतिशय विचारपूर्वक ‘शिवसैनिक’ असा शब्द योजला. लष्करातील सैनिक हे कायम आदेशाचे पालन करण्याच्या मनोभूमिकेत असतात, बाळासाहेबांना शिवसैनिकाकडूनही तेच अपेक्षित होते. शिवसेनेच्या शाखांमुळे सामान्य मराठी आणि हिंदूंना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाले. शिवसेनेला प्रचाराचे एक शक्तिशाली असे माध्यम उपलब्ध झाले. सैनिकांची, शाखाप्रमुखांची एक फळी तयार झाली आणि त्या फळीमुळेच शिवसेना आजपर्यंत टिकून राहिली, वाढली. शिवसैनिकांच्या पाठीशी ते कायम ठामपणे उभे राहिले. त्यामुळेच त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार होणारी एक मोठी फळी सज्ज झाली. ‘80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण’ ही त्यांनी दिलेली दीक्षा आमच्यासारखे कट्टर शिवसैनिक निष्ठेने जपतात.
शिवसेनेचा राजकीय प्रवास ठाण्यातून सुरू झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. 1967 मध्ये ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सेनेने राजकारणात प्रवेश केला आणि त्याच्या पुढच्याच वष मुंबई महानगरपालिकेत प्रवेश केला. 1971 मध्ये डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे नेते मुंबईचे पहिले महापौर झाले. 1972 साली प्रमोद नवलकर विधानसभेत निवडून आले, तर त्याच्या पुढच्या वष सतीश प्रधान हे ठाणे महापालिकेचे पहिले महापौर झाले. त्यानंतर गेल्या 50हून अधिक वर्षांत शिवसेनेची राजकीय ताकद सतत वाढत गेली.
1989 मध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय युती झाली आणि 1995 साली शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. ही युती सलग 25 वर्षे टिकली. मात्र, पुढे काही नेत्यांनी स्वार्थापायी युतीच्या दुधात मिठाचा खडा टाकला. निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश करतानाच बाळासाहेबांनी जाहीर केले होते की, “मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही सत्तेचे पद स्वीकारणार नाही.” बाळासाहेबांच्या पश्चात या विचाराला मूठमाती दिली गेली. पुढे काँग्रेससारख्या राजकीय शत्रूशी हातमिळवणी करून सेनेच्या वैचारिक भूमिकेलाच तिलांजली दिली गेली. शिवसेनेतील सर्व प्रमुख नेत्यांच्या विनंतीवरून मला शिवसेनेची या वैचारिक गुलामगिरीतून सुटका करावी लागली, हा इतिहास सर्वश्रुत आहे. पक्षाची मूळ विचारधारा सांभाळण्याचे, शिवसेनेला राज्याच्या सर्व भागांत पोहोचवण्याचे भाग्य मला लाभले, याचा मला आनंद आहे.
माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला संघटनेची ताकद बाळासाहेबांनीच दिली. माझ्या आयुष्याला सर्व अर्थाने कलाटणी दिली, ती बाळासाहेब आणि माझे गुरू आनंद दिघे यांनी. माझ्या वैयक्तिक आयुष्यातील एका अतिशय कठीण क्षणी हे दोघेही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, मला मानसिक आधार दिला. त्यामुळे मी आज जो काही आहे, तो या दोघांमुळेच. बाळासाहेबांचे विचार हाच माझ्या जगण्याचा आणि राजकारणाचाही प्रमुख आधार आहे. राजकीय व्यासपीठावरून विरोधकांवर टोकाची टीका करणारे बाळासाहेब वैयक्तिक आयुष्यात माणसे जोडणारे होते. त्यांच्यासारखा दिलदार नेता शोधून सापडणार नाही. विरोधकांबद्दलही त्यांनी कधी कटुता बाळगली नाही. साहित्यिक, कलाकार यांच्या मैफलीत ते मोकळेपणी सहभागी व्हायचे आणि खुलायचे. ते शब्दाचेही पक्के होते, त्यांनी शब्द दिला आणि तो पाळला नाही, असे कधीच घडले नाही. ओठात एक आणि पोटात एक असे त्यांनी कधीच केले नाही. मनात येईल ते थेट बोलून मोकळे व्हायचे, हा त्यांचा विशेष स्वभाव होता. बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता इतिहासात एकदाच होत असतो, त्यांच्या विचारांचा धनुष्यबाण खांद्यावर वाहून नेण्याचे भाग्य मला लाभले आहे आणि ही जबाबदारी पेलण्याचे बळही मला त्यांच्याकडूनच मिळालेले आहे. आज बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांना माझा साष्टांग दंडवत!
- एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र