ं

गेले काही महिने सोने व चांदी यांचे भाव वाढतच चालले आहेत. शेअर बाजार, काही अंशी म्युच्युअल फंडांच्या योजना यातील गुंतवणुकीपेक्षा, सोने-चांदीतील गुंतवणुकीमुळे, गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. पण, सोने-चांदी खरेदी करणं आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सोने व चांदी यांचे भाव वाढायला बरीच कारणे आहेत; पण यांपैकी बरीच कारणे ही आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे निर्माण झाली आहेत. त्यांचा या लेखात केलेला ऊहापोह...
गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये सोन्याने ८० टक्के परतावा दिला; तर चांदीने तब्बल १५० टक्के परतावा दिला. सोन्याचा भाव गेल्या वर्षीच्या प्रारंभी दहा ग्रॅमसाठी ७१ हजार, ५०० रुपये होता; तो वर्षअखेरीस १ लाख, ३९ हजार रुपयांवर पोहोचला. झाला. चांदीचा भाव किलोला नऊ हजार रुपयांवरून वाढून २ लाख, ३२ हजार रुपये झाला. दि. १ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात ‘कॉमेक्स’वर २ हजार, ६२३ डॉलर प्रतिऔंस होता; तर चांदीचा भाव २८.९७ डॉलर प्रतिऔंस होता. चांदीचा औद्योगिक वापर वाढल्याने भाववाढ होत राहील, असे सांगितले जाते. भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला आहे. यापुढेही जर रुपया घसरत राहिला, तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षाही सोन्याची जास्त भाववाढ भारतात होईल. साधारणपणे, एक किलो सोन्याच्या भावामध्ये ८० किलो चांदी विकत घेता येते, असा ‘थम्ब रुल’ मानला जातो. हे ग्राह्य धरले, तर सध्या सोने-चांदीचे प्रमाण खूपच व्यस्त झाले आहे. उदाहरणार्थ, दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी एक किलो सोने देऊन ६० किलो चांदी मिळाली असती. याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठांत सोने-चांदीच्या दरांमध्ये प्रचंड फरक पडला आहे. दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी मात्र सोन्याचा भाव थोडा कमी झाला आणि चांदीचा भाव स्थिर राहिला; त्यामुळे एक किलो सोन्याच्या बदल्यात ६५ ते ६७ किलो चांदी मिळत होती. ८० किलोचे प्रमाण योग्य मानले, तर त्यासाठी सोने व चांदी दोन्हींचे भाव उतरायला हवेत.
चीनने आता चांदीची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या निर्णयामुळे, चांदीच्या पुरवठ्यावर ताण येणार. ‘जे. पी. मॉर्गन’ने फार मोठ्या प्रमाणावर चांदीची खरेदी केली आहे. परिणामी, ती सर्व चांदी ‘सर्क्युलेशन’च्या बाहेर गेली आहे. ‘ईटीएफ’च्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर चांदीची खरेदी होते. त्यामुळे तीही ‘सर्क्युलेशन’मधून बाहेर जाते. मेक्सिकोमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे श्रमजीवी वर्गाची समस्या निर्माण झाली. त्यामुळे तिची उत्पादनक्षमता कमी झाली. थायलंडमधील एक शुद्धीकरण कारखाना बंद झाला आहे. असा सर्व बाजूंनी चांदीच्या पुरवठ्यावर ताण होता. या विषयातील जाणकारांच्या मते, आजच्या दिवशी जवळपास दहा लाख औंस चांदीचा तुटवडा बाजारपेठेत आहे. चांदीला असलेल्या मागणीपेक्षा तिचा पुरवठा खूपच कमी आहे. आतापर्यंत गरजेपुरताच चांदीचा पुरवठा होता. मात्र, विविध आंतरराष्ट्रीय कारणांमुळे चांदी अधिक दुर्मीळ झाली. ही परिस्थिती येत्या भविष्यात अशीच राहील, असे अंदाज आहेत. गुंतवणूकदार ‘ईटीएफ’च्या माध्यमातून चांदीत गुंतवणूक करीत राहिले, तर ‘अंडरलाईन अॅसेट’ म्हणून चांदीची खरेदी केली जाते आणि ती ‘सर्क्युलेशन’मधून बाहेर जाते. यानंतर ज्यावेळी ‘ईटीएफ’ची विक्री केली जाईल, त्यावेळी ती चांदी ‘सर्क्युलेशन’मधून बाजारपेठेत येऊ शकेल.
आपण सोने-चांदी प्रमाण एक किलो : ८० किलो हे योग्य मानले, तर चांदीच्या भावाच्या तुलनेत सोन्याचा भाव ५०० डॉलर झाला; तर आताच्या भावाप्रमाणे सोने-चांदी प्रमाण एक किलो सोने बरोबर ८० किलो चांदी होऊ शकेल. सोने इतके महागले, तर ग्राहकांवर त्याचा खूप ताण येईल. गेल्या काही महिन्यांत सोने ८० टक्कांनी व चांदी जवळपास दीडपट वाढली आहे. हा वेग धोकादायकही ठरू शकतो. ‘जे. पी. मॉर्गन’ने ‘प्रॉफिट बुकिंग’साठी एकदम प्रचंड चांदी खरेदी केली. अमेरिकेत वर्षअखेरीस गुंतवणूकदारांसाठी ‘एनएव्ही’ जाहीर करावे लागतात; त्यांना परतावा द्यावा लागतो. त्यामुळे तेथेही चांदी खरेदी केली गेली असणार. चांदीचा भाव जर एकदम कमी झाला, (शक्यता फार कमी) तर भारतातील गुंतवणूकदारांचे फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे येथील गुंतवणूकदारांनी ‘ईटीएफ’च्या माध्यमातून थोड्या-थोड्या प्रमाणात चांदी खरेदी करावी. ‘ईटीएफ’मध्ये व्यवहारशुल्क लागत नाही. या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ‘ईटीएफ’ हे उत्तम माध्यम आहे.
डिजिटल खरेदी : डिजिटल सोने-चांदी खरेदीबाबत विचार करताना, ‘सेबी’ने यापूर्वीच सांगितले आहे की, मौल्यवान धातूंच्या व्यवहारांकरिता कोणत्याही प्रकारचे नियमन-नियामक लागू नाहीत. त्यामुळे अशा खरेदीमध्ये काही प्रमाणात धोका असल्याचे ‘सेबी’ने सूचित केले आहे. यांचे वरचेवर वाढणारे दर पाहता, ‘फिजिकल मार्केट’ आणि ‘फ्युचर मार्केट’ यांच्या भावातील तफावत वाढत आहे. त्यातून पोर्टलच्या माध्यमातून होत असलेल्या व्यवहारांनीही तोटा होण्याची शक्यता जास्त असते. या सर्व बाबी पाहता, डिजिटल सोने-चांदी खरेदी करण्यापेक्षा चांगल्या म्युच्युअल फंड कंपन्यांचे जे ‘ईटीएफ’ आहेत, त्यांत गुंतवणूक करावी; हे सुरक्षित माध्यम आहे. ‘ईटीएफ’ योजनांवर ‘सेबी’चे नियंत्रण असते. तसेच त्यांच्याकडून जोखीम तंत्रज्ञानाचे उत्तम व्यवस्थापन केले जाते. तसेच त्यांचे विपणन व्यवस्थापन तंत्रज्ञान अधिक परिपक्व आहे. हे मुद्दे गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयास हवे. डिजिटल गोल्ड किंवा सिल्वर खरेदी करताना, माहिती नसलेल्या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करू नये; हे डिजिटल प्लॅटफॉर्म कुठल्याही नियमनाखाली येत नाहीत, असे ‘सेबी’ने स्पष्ट केले आहे. गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरून सोने-चांदीत गुंतवणूक करताना काळजी घ्यावी; विनाकारण जोखीम घेऊ नये. डिजिटल सोने-चांदी खरेदी करताना सावधगिरी बाळगावी. दि. १ एप्रिल २०२६ पासून बँका, तसेच बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) चांदी तारण ठेवून कर्ज देणार आहेत.
२०२६ मधील शेअर बाजाराची संभाव्य वाटचाल
अमेरिकी बाजार खाली आले, तर परदेशी संस्थांची तिथली गुंतवणूक (काही हिस्सा) भारताकडे यावी. या वर्षाच्या अखेर निफ्टी किमान २८ हजार, ५०० ते २९ हजार अंश होईल, असा अंदाज आहे. निफ्टी त्यापुढे जाऊ शकतो. त्यात टेलिकॉम, फार्मा, संरक्षणक्षेत्र व रेल्वे, तसेच शेती, वाहनउद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू यांची मागणी वाढेल. सरकार व रिझर्व्ह बँका पाठीशी उभ्या असल्यामुळे वित्तीय कंपन्या, खासगी व सरकारी बँका, तसेच ‘मायक्रो-फायनान्स’ क्षेत्र रडारवर हवे. ‘श्रीराम फायनान्स’मध्ये ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्यामुळे हे वित्तीय क्षेत्र जोरात आहे. ‘स्मॉल कॅप’ने उतारा न दिल्यामुळे ते क्षेत्रही आकर्षक असेल. लागोपाठ तीन वर्षे ‘एसआयपी’चा परतावा कमी झाल्यास गुंतवणूकदार पुन्हा ठेवबाजाराकडे वळू शकतील. ‘आयपीओ’चा रेटा असाच चालू राहिल्यास व त्यात ५० टक्के कंपन्यांचा परतावा समाधानकारक नसल्यास यांच्या घोडदौडीलाही लगाम बसेल. नव्या इश्यूबरोबर प्रवर्तकांचा ‘ऑफर फॉर सेल’चाही जोर वाढत आहे. अशा ‘आयपीओ’पासून दूर राहा. ‘ऑफर फॉर सेल’मुळे शेअर खाली येऊ शकतो. २०२६ मध्ये शेअर बाजार व ‘हायब्रीड फंड’ यांतच गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे, असे जाणकारांचे मत आहे.