मनसेचे ‌‘कल्याण‌’ धोरण

23 Jan 2026 12:33:01

महानगरपालिका निवडणुका होऊन काही दिवसही उलटत नाहीत, तोवर मनसेला आपले ‌‘कल्याण‌’ महायुतीसोबतच आहे, हा साक्षात्कार झाला. कल्याण-डोंबिवलीत मनसेने उबाठाला सोडून शिवसेनेसोबत अन्‌‍ महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. कल्याण-डोंबिवलीत मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले. तेव्हा प्रभागातील विकासकामांसाठी आणि एकूणच शहराच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याची भूमिका मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी जाहीर केली. त्यावर साहजिकच संजय राऊतांनी आगपाखड केली. कारण, आता मनसेने जर हाच निर्णय मुंबई महानगरपालिकेत घेतला, तर मात्र राऊत यांचे तोंड बघण्यासारखे असेल. “आम्ही एकत्र आलोय, ते कायमच एकत्र राहाण्यासाठी,” असे ठाकरे बंधू आणि संजय राऊत कितीही वेळा घोळून सांगत असले तरी मनसेची ही खेळी आश्चर्याची नाही, तर इतिहासाची पुनरावृत्तीच म्हणावी लागेल. म्हणजे, खुद्द उद्धव ठाकरेंनी भाजपशी फारकत घेत काँग्रेस आणि शरद पवारांशी संधान साधून मुख्यमंत्रिपदाची खुच बळकावली होती. आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. पण, आयुष्यभर बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला विरोध केला; त्याच काँग्रेसच्या दावणीला उद्धव ठाकरेंनी 2019 साली शिवसेनेला बांधले आणि आज त्याचे परिणाम समोर आहेत.

एवढेच नाही तर उबाठाने राज्यात वेळोवेळी विरोधकांशी युत्या-आघाड्या केल्या. 2023 साली उद्धव ठाकरेंनी वंचित बहुजन आघाडीसोबतही युती केली होती. माजी मनसैनिक आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवडी विधानसभा पदाधिकारी संतोष नलावडे यांनी ‌‘अखेर खऱ्या शिवसेनेला मनसेची साथ‌’ असा मजकूर पोस्ट केला आहे. तसेच मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूव मनसेच्या संतोष धुरी यांनीही उबाठासोबतच्या युतीत आपल्या लोकांवर अन्याय होतोय, असे मत मांडले होते आणि हाती ‌‘कमळ‌’ घेतले होते.

एकंदरीतच काय तर, विकासाचे इंधन असल्याशिवाय मनसेचे ‌‘इंजिन‌’ धावणार नाहीच आणि उबाठा सोबत राहून आपली गाडी पुढे जाणार नाही, तर मागेच पळणार, हा साक्षात्कार राज ठाकरेंच्या मनसैनिकांना झालेला दिसतो. त्यामुळे आता मनसेचेही ‌‘कल्याण‌’ होईल, हे निश्चित!

राऊतांचा संधि‌‘साधू‌’ वाद

पालघर साधू हत्याकांडावर मौन साधणारे उबाठाचे खासदार संजय राऊत उत्तर प्रदेशातील शंकराचार्य यांच्यावरील लाठीमाराचा मुद्दा उचलून संधिसाधूपणा केला. कारण, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडूनच संजय राऊत काँग्रेसचे विचार धारण केल्याप्रमाणे आतापर्यंत वागत आहेत. मग, आता अचानक त्यांना हिंदू साधू-संतांविषयी इतकी आपुलकी, इतकी प्रेम उफाळून कसे काय आले? आता फक्त त्यांचे साधू-संतांवरील प्रेम किती काळापुरते टिकते, हे पाहायचे. कारण, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पूव ठाकरे बंधूंची पंचतारांकित मुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकरांनी घेतली. त्यात तर संजय राऊत स्पष्टपणे 33 कोटी हिंदू देवीदेवतांची खिल्ली उडवत होते; तर ठाकरे बंधूंच्या संयुक्त वचननाम्यातून ‌‘हिंदुत्व‌’, ‌‘हिंदुहृदयसम्राट‌’, ‌‘हिंदू‌’ हे शब्दच विशिष्ट समाजाला खूश करण्यासाठी वगळण्यात आले आहेत, असा आरोप शिवसेना नेते खा. राहुल शेवाळे यांनी केला होता. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या मतदानापूव ठाकरे बंधूंनी सहकुटुंब मुंबादेवीच दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊत पण होते. महाराष्ट्रात ‌‘जय श्रीराम‌’च्या घोषणा चालणार नाहीत, असेही राऊत म्हणाले. म्हणजे राऊत यांचे साधुप्रेम दिखावाच आहे, असेच म्हणावे लागेल.

मदुराई येथील तिरुपरंकुंद्रम टेकडीवरील कार्तिगाई दीप प्रज्वलन प्रकरणात न्यायालयाने हिंदू मंदिराच्या बाजूने निकाल देऊनही या निकालाविरोधात आणि न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग प्रस्तावावर उबाठा खासदारांनी सह्या केल्या होत्या, त्यावर मात्र राऊताचे हिंदुत्व आणि संत समर्थन दिसले नव्हते. ‌‘उद्धव जनाब खुदा का नेक बंदा‌’ या गाण्यात उबाठाकडून विशिष्ट समाजाला खूश करण्याचे प्रयत्न केले गेले. ‌‘एमआयएम‌’ची नवनियुक्त नगरसेविका सहर शेख हिने ‌‘पुरे मुंब्रा को हरा कर देना हैं‌’ असे संतापजनक विधान केले. त्यावर मात्र राऊत मूग गिळून बसले. पण, फक्त उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आहे म्हणून शंकराचार्य यांच्याबाबत मुद्द्याला राजकीय रंग देऊन तात्पुरते हिंदुत्वाचे राजकारण संजय राऊत करू पाहत आहेत. परंतु, जनतेने त्यांच्या या तात्पुरत्या ढोंगाला आधीच नाकारले आहे. कारण, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार उबाठाने केव्हाच सोडले आणि अंगावर हिरवे ओढले. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त उबाठाला पडलेला हिंदुत्वाचा विसर सर्वस्वी दुर्दैवीच!

- अभिनंदन परूळेकर
Powered By Sangraha 9.0