मुंबई (विशेष प्रतिनिधी) : जगाला मर्यादा शिकवण्यासाठी भारत नेहमीच तत्पर राहिला आहे. प्राचीन काळापासूनच आपण मर्यादांचे पालन आणि ज्ञान मिळवण्यासाठी संतांकडे जात आलो आहोत. संघस्थानांवर आम्ही दंड चालवण्याचे प्रशिक्षण घेतो; मात्र दंड का ठेवायचा, त्याचा उपयोग केव्हा करायचा, ही मर्यादाही शिकण्यासाठी संतांकडे जाणे आवश्यक असते. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
राजस्थानच्या नागौर येथील छोटीखाटू परिसरात १६२ व्या मर्यादा महोत्सवाच्या निमित्ताने भव्य आणि दिव्य असा कार्यक्रम संपन्न झाला. आचार्य महाश्रमण यांच्या पावन सान्निध्यात आयोजित या कार्यक्रमात सरसंघचालक बोलत होते.
उपस्थितांना संबोधत ते म्हणाले, समाजातील श्रेष्ठ लोक केवळ उपदेश देत नाहीत, तर ते आपल्या जीवनातही उतरवतात. त्यामुळेच भारतातील श्रेष्ठ व्यक्तींचे नेहमी अनुकरण झाले आहे. आजही समाजजीवनात आध्यात्मिक लोक याचे जिवंत उदाहरण आहेत. पैशामागे धावणे ही आपली परंपरा नाही. जो पैसा कमावतो, तो दान करतो. दान भारतीय जीवनशैलीचा भाग आहे; येथे तर जीवनदान देणारेही आहेत. कमावलेले कसे वाटायचे, हे ज्ञान असणे आवश्यक आहे.
पुढे ते म्हणाले, आपण सर्व बाह्यरूपाने वेगवेगळे दिसतो, पण मूळतः एकच आहोत. ‘सर्व आपलेच आहेत’ या भावनेने जीवन जगल्यास आपोआप मर्यादा येतात. सर्वांचे जीवन सुरळीत चालले पाहिजे, हेच धर्म आपल्याला शिकवतो. धर्म म्हणजे धारण करण्याची भावना आणि धर्मामागे सत्याची भावना असते. अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्तेय आणि अपरिग्रह यांचे प्रत्यक्ष ज्ञान व अनुभूती भारतातच झाली आहे.
सध्याच्या जागतिक परिस्थितीबाबत सांगताना ते म्हणाले की, आज अनेक देश ‘काहीही झाले तरी माझा स्वार्थ पूर्ण व्हायला हवा’ असे मानतात; पण भारत या मार्गावर ना गेला आहे, ना जाणार आहे. भारत संपूर्ण जगाची चिंता करतो. आपत्ती व संकटाच्या वेळी सेवा करणारा भारत हा एकमेव देश आहे. स्वतःचा वाटा कमी करूनही भारताने इतर देशांना मदत केली आहे. धर्म आपल्याला काय करावे व काय करू नये याचे ज्ञान देतो. हिंसा-अहिंसेचा संदर्भही धर्माच्या आधारावरच ठरतो. आज कृषिक्षेत्रात पाश्चिमात्य रसायनांच्या वापरामुळे कीटकांचा पूर्ण नाश केला जातो; मात्र भारतीय दृष्टीकोन निसर्गातील संतुलन राखण्याचा आहे. भारताने कधीही सामरिक, आर्थिक किंवा बळाच्या जोरावर कोणावरही दडपशाही केली नाही; उलट आपल्या उदाहरणातून हे जगासमोर मांडले आहे.
मर्यादा महोत्सवाच्या शुभारंभाच्या पूर्वसंध्येला आचार्य महाश्रमण यांनी सांगितले की, चांगली वाणी हीदेखील एक रत्न असते; मात्र अज्ञानामुळे काही लोकांना दगडांच्या तुकड्यांतच रत्न दिसते. कल्याणकारी वाणी आणि सम्यक ज्ञान देणारा सद्गुरू असतो, ज्यामुळे आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळते. भारतात ग्रंथ, शास्त्रे आणि संतांची वाणी आपली समज व सामर्थ्य वाढवते आणि जीवनाला दिशा देते. माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी प्रथम गुरुवरांनी प्रथम विधानाचा शुभारंभ केला, तर चौथे गुरु दयाचार्य यांनी मर्यादा महोत्सवाची सुरुवात केली, असेही त्यांनी नमूद केले.
राजतंत्र असो वा लोकशाही; दोन्ही ठिकाणी शिस्त आणि मर्यादा आवश्यक!
राजतंत्र असो वा लोकशाही; दोन्ही ठिकाणी शिस्त आणि मर्यादा आवश्यक आहेत. आपल्या सर्वांसाठी अंतिम साध्य शांती आहे. जर कोणी शांतीची भाषा समजत नसेल, तर कधी कधी कडकपणाची गरज भासते. शांतीसाठीही शिस्तीचे पालन आवश्यक असते. देशाच्या धोरणात अहिंसा असावी आणि आपण आक्रमण करू नये, ही आपली मूलभूत भूमिका आहे. सर्वांशी मैत्री असावी; मात्र देशाच्या सुरक्षेला धोका जाणवल्यास नागरिकांच्या संरक्षणासाठी सैन्याला शस्त्र उचलावी लागतात. संतांसाठी अहिंसेचे पालन अत्यावश्यक असू शकते; परंतु गृहस्थाच्या अवस्थेत देशरक्षणासाठी प्रसंगी शस्त्रांची गरज भासते. चांगुलपणा आणि शांती राखण्यासाठी कधी कधी कडकपणा वापरावा लागतो, असे आचार्य महाश्रमण यांनी सांगितले.