महापौर पदासाठी भास्कर जाधवांचे भावनिक कार्ड; थेट शिंदेंनाच घातली गळ

23 Jan 2026 19:08:28


मुंबई : ( Bhaskar Jadhav and Eknath Shinde ) मुंबई महापालिकेत यश न मिळाल्याने महापौर पदापासून मुकावे लागलेल्या उबाठा गटाने आता भावनिक कार्ड खेळणे सुरु केल्याचे दिसते. उबाठा गटाचे जेष्ठ नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे यांना पाठींबा देण्याची मागणी केली आहे.

भास्कर जाधव म्हणाले की, "माझ्या मनात याविषयी प्रचंड, प्रचंड दु:ख आहे. हे वर्ष बाळासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्याच वर्षी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा महापौर मुंबई महापालिकेत असणार नाही. त्यामुळे जे कुणी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातो आणि आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार असे सांगतात, त्या सर्वांना आवाहन वजा विनंती करतो की, हे बाळासाहेबांचे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यामुळे तुमची बाळासाहेबांवर खरी श्रद्ध आहे का? बाळासाहेबांवर विश्वास होता का? त्यांच्यासमोर नतमस्तक होऊ इच्छिता का? जर तुम्ही हे करत असाल तर ते उद्धव ठाकरे यांना सांगितले पाहिजे.
 
तसेच एकनाथ शिंदे यांनी भाजपला सांगितले पाहिजे की, केंद्रात आणि महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला पाठींबा दिला असून हे बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे मुंबईवर बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे खऱ्या शिवसेनेचा झेंडा फडकला पाहिजे. त्यासाठी आम्ही आमचे राजकीय मतभेद बाजूला सारून शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उद्धव ठाकरे जो उमेदवार देतील, त्याला मदत करू, हे सांगण्याचे धाडस एकनाथ शिंदे यांनी दाखवले पाहिजे."
 
हेही वाचा : मुंबईकरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे सरकार आणून त्यांना वंदन केले आहे – नवनाथ बन
 
शिंदेंनी कमीपणा घेतला पाहिजे

"एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला पाहिजे. यादिवशी तुम्ही तुमचा गर्व, मान-अपमान बाजूला सारुन बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी कमीपणा घेत महापौर निवडीसाठी शिंदे यांनी ठाकरेंना पाठींबा दिला पाहिजे," असेही भास्कर जाधव म्हणाले.

महापौर पदासाठी उबाठा गटाची गळ

एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर पडल्यापासून ते आजतागायत त्यांना शिव्याशाप देणे किंवा त्यांच्यावर टीकाटिपण्णी करणाऱ्या उबाठा गटाने आता मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी शिंदेंनाच गळ घातली आहे. त्यामुळे महापौर पदाच्या हव्यासापोटी ठाकरे कुठलीही भूमिका घेऊ शकतात, असे यातून स्पष्ट दिसते.



Powered By Sangraha 9.0