Balasaheb Thackeray: केवळ नोकरीसाठी अर्ज घेऊन फिरू नका, तर..., बाळासाहेबांचे रोखठोक, निर्भीड आणि तितकेच प्रभावी विचार!

23 Jan 2026 15:38:27

vrunda-lase---2026-01-23t122320-1769151208.jpg 
 
मुंबई : (Balasaheb Thackeray) आज शुक्रवार दि. २३ जानेवारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आजही बाळासाहेबांचे नाव आदराने आणि तितक्याच अभिमानाने घेतले जाते. राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक विश्वावर खोलवर ठसा उमटवणारे बाळासाहेब हे केवळ एक नेते नव्हते, तर मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आवाज होते. (Balasaheb Thackeray)
 
बाळासाहेबांचे विचार नेहमीच रोखठोक, निर्भीड आणि तितकेच प्रभावी होते. “अन्याय करणे जितके पाप आहे, त्यापेक्षा तो सहन करणे हे मोठे पाप आहे,” हा त्यांचा विचार आजही अन्यायाविरोधात उभं राहण्याची प्रेरणा देतो. “लाचारी पत्करून जगण्यापेक्षा स्वाभिमानाने मरणे केव्हाही श्रेष्ठ,” असे सांगत त्यांनी मराठी माणसाला झुकण्याऐवजी लढण्याची शिकवण दिली. (Balasaheb Thackeray)
 
हेही वाचा :  Narendra Modi: बाळासाहेब ठाकरे यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भावपूर्ण आदरांजली
 
“दुसऱ्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्यापेक्षा स्वतःची पाऊलवाट निर्माण करा,” हा सल्ला केवळ राजकारणापुरता मर्यादित नव्हता, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरला. तरुणांसाठी त्यांनी दिलेला संदेशही तितकाच महत्त्वाचा होता. “केवळ नोकरीसाठी अर्ज घेऊन फिरू नका, तर नोकरी देणारे बना,” या विचारातून उद्योजकतेचा विचार त्यांनी फार आधी मांडला होता. “माणूस विकला जातो, पण निष्ठा विकली जात नाही,” हा विचार आजच्या बदलत्या राजकीय वास्तवात अधिकच बोलका वाटतो. (Balasaheb Thackeray)
 
बाळासाहेबांचे हे विचार केवळ भाषणांपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आपल्या शब्दांनी आणि कुंचल्याने अन्यायावर प्रहार केला. “जोपर्यंत मराठी माणूस एकजूट आहे, तोपर्यंत त्याला कोणीही हरवू शकत नाही,” हा विश्वास त्यांनी आयुष्यभर जपला. आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. कारण हे विचारच मराठी अस्मितेचा महामंत्र असून, तो आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात धगधगत आहे. (Balasaheb Thackeray)
 
 
Powered By Sangraha 9.0