ग्रामीण रुग्णांचा आरोग्यदूत...

23 Jan 2026 13:16:16

पुण्यातील डॉ. सुयोग काळभोर आणि त्यांचे डॉक्टरमित्र ठरवून ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याचे धडे देतात. अशा या ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्यदूत ठरलेल्या डॉ. काळभोर यांच्याविषयी...

डॉ. सुयोग काळभोर हे मूळचे पुण्याचे. पुण्याच्या शुक्रवार पेठ भागात लहानाचे मोठे झाले. लहानपणापासून डॉक्टर होण्याचे सुयोग यांचे स्वप्न होते. शालेय शिक्षण आणि विद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशाची वाट धरली. पण, परदेशात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर तेथे काम करण्यात त्यांना रस नव्हता. परदेशातील अनेक मोठ्या रुग्णालयांकडून त्यांना विचारणा होत होती. परंतु, मायदेशात काम करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार, ते पुण्यात आले. आधी त्यांनी विविध रुग्णालयांमध्ये रुग्णसेवा केली.

रुग्णालयांमध्ये काम करताना त्यांना खेडेगावातील नागरिक रुग्णालयात मोठ्या प्रमाणात येत असल्याचे लक्षात आले. त्यांना लागणाऱ्या उपचारांवर अजूनपर्यंत खेडेगावात अद्ययावत उपचारपद्धती पोहोचली नसल्याचेदेखील त्यांना जाणवले. एकीकडे नागरी भागातील अत्याधुनिक उपचारपद्धती आणि ग्रामीण भागात गरजू रुग्णांपर्यंत ही सुविधा नसल्याचे विसंगत चित्र त्यांनी हेरले. या ग्रामीण भागातदेखील शहराप्रमाणेच उपचारपद्धती असाव्यात. शिवाय, या भागातील रुग्णांना याबाबत मार्गदर्शनाशिवाय उपचारासाठी मदत करावी, यासाठी डॉ. सुयोग काळभोर यांनी निर्धार केला. यासाठी त्यांनी आपल्या मित्रमंडळींनादेखील तयार केले. आपल्या मित्रांना भेटून खेडेगावात आपण सर्वांनी काम करण्याचे त्यांनी ठरविले.

पुण्याजवळील खेडेगावात हे डॉक्टरमित्र दौरा करतात. केवळ व्यावसायिक लाभासाठी नव्हे, तर हे लोक तेथील गावकऱ्यांना भेटून सहज गप्पा मारतात आणि गप्पा मारताना आरोग्यविषयक माहिती देतात, त्यांचे आरोग्याशी निगडित विविध विषयांवर प्रबोधन करतात. शेतात काम करताना हाडांची काळजी घेण्यासाठी नेमके काय करावे, त्वचेची काळजी कशी घ्यावी, याची माहिती ते देतात. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन प्राप्त होते. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळ देता यावा, यासाठी सुयोग यांनी लोणी येथे काम करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी याच परिसरात आपला दवाखानादेखील सुरू केला आहे.

क्लिनिकच्या समोरून आषाढात पालखी जाते, यावेळी वारकऱ्यांना ते मोफत उपचार देतात. या काळात ते वारकऱ्यांसाठी उपचार किट, हाडांची तपासणी, तसेच चालून-चालून पायाला दुखापत झालेल्या किंवा पायाला त्रास होत असलेल्या वारकऱ्यांवरही उपचार करतात आणि गावातील नागरिकांनादेखील या उपक्रमात सहभागी करतात. परतीच्या पालखीच्या वेळीदेखील उपचार उपक्रम नित्य आयोजित केला जातो. सोलापूर रस्त्यावरील विविध गावांमध्ये ते सेवा देत असतात. तसेच, ग्रामस्थांच्या मागणीमुळे त्यांनी वाघोली भागातील नागरिकांना भेटता यावे म्हणून या परिसरातदेखील ‌‘उपचार मार्गदर्शन केंद्र‌’ सुरू केले आहे; तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे म्हणून त्याविषयावरदेखील त्यांनी आता मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात घरगुती गणपतीसाठी दरवर्षी सामाजिक संदेश किंवा महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारा देखावा साकारला जातो. हा देखावा बघण्यासाठी शेजारील गावातील नागरिक येतात. गणपतीची मिरवणूक असते, त्यात नेमक्या आरोग्यविषयक उपचारावर भर असतो.

“सध्याच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांना कुटुंबासोबत बोलायलादेखील वेळ नाही. आपल्या मनातील गोष्टी बोलण्यासाठी जवळ कोणीच नसते. त्यामुळे मन मोकळे होत नाही. यामुळे नागरिकांमध्ये आजारपण वाढत आहे. त्यासाठी कुटुंबाने दिवसातून वेळ मिळेल तसे एकत्र आले पाहिजे,” असा मौलिक सल्लादेखील सुयोग देतात. तसेच ते रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करतात. कोणताही आजार मुळासकट घालवण्यासाठी चर्चा आणि गप्पा हाच उत्तम उपचार आहे, असे ते मानतात.

गावातील मुलांना, तरुणांना एकत्र करून ‌‘रील्स‌’ बनवणे, त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित करणे, यामुळे सुयोग हे लोणी, इनामदार वस्ती, उरुळी कांचन या परिसरातील नागरिकांना घरातील सदस्याप्रमाणेच वाटतात. शहरातील रुग्णांना मोठ्या प्रमाणात उपचार मिळतात. परंतु, खेडेगावात आपल्याला काय त्रास होतोय, याचे लवकर निदान होत नाही. त्यामुळे खेडेगावात आधुनिक उपचारपद्धती पोहोचवल्या पाहिजेत, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. यासाठी विविध संस्थांना ‌‘गावाकडे चला‌’ म्हणून आवाहन ते करतात. खेडेगावात वैद्यकीय शिबीर सुरू करतात. नागरिकांना वैद्यकीय सुविधा मोफत पुरवतात. विविध रुग्णालयांमध्ये खेडेगावातील नागरिकांना उपचार मिळावेत म्हणून स्वतः प्रयत्न करतात. शहराच्या पूर्व भागात सगळ्या रुग्णालयांसोबत ते काम करतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचा अनेक संस्थांनी गौरव केला आहे. त्यांच्या कार्यात त्यांच्या पत्नीचीही साथ लाभली आहे. डॉ. सुयोग यांच्या या कार्यास दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून शुभेच्छा.

- शशांक तांबे
(अधिक माहितीसाठी संपर्क: 7066739939)

Powered By Sangraha 9.0